मर्ढेकरांची कविता - पिंपांत मेले ओल्या उंदिर
पिंपांत मेले ओल्या उंदिर ;
माना पडल्या, मुरगळल्याविण ;
ओठावरती ओठ मिळाले ;
माना पडल्या आसक्तीविण.
गरीब बिचारे बिळात जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळी
गात्रलिंग अन् धुऊन घेउन,
जगायची पण सक्ती आहे ;
मरायची पण सक्ती आहे.
उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठावरती जमले तेंही
बेकलायटी, बेकलायटी !
ओठावरती ओठ लागले ;
पिंपात उंदिर न्हाले ! न्हाले !
बा. सी. मर्ढेकर
प्रा नाडकर्णी यांनी संपादीत केलेल्या ह्या कवितेवरील लेखांच्या पुस्तकात श्री. भाउ पाध्ये यांचा लेख वाचनात आला. या लेखात त्यांनी कवितेतील उंदिर म्हणजे हिटलरच्या नाझी छळछावण्यातील कैदी असावेत असा निष्कर्ष काढला आहे. त्याला पुष्टी देणाऱ्या मुद्दयांचा विचार केला आहे.
ज्यू व उंदिर
हिटलरच्या आदेशावरुन त्याचा प्रचारमंत्री गोबेल्स याने जर्मनीमधील तत्कालीन दिग्दर्शक फ्रीट्ज हिपलर कडून दी इटर्नल ज्यू हा ज्यू विरोधी प्रचार करणारा चित्रपट , १९४० साली तयार करून घेतला. मूळ जर्मन चित्रपटाचे नाव Der Ewig Jude असे आहे. त्याचा अर्थ भटक्या ज्यू (Wandering Jew) असा आहे. नाझी प्रचारात ज्यूंचा उल्लेख vermin (उपद्रवी जमात ) असा केला आहे. नाझी प्रचाराप्रमाणे २००० वर्षांपूर्वी , ज्यूंनी मध्यपूर्वेकडून इजिप्त मध्ये, उंदरांप्रमाणे स्थलांतर केले आहे. त्यानंतर तेथून त्यांनी विविध “ आश्वासक प्रदेशात “ स्थलांतर केले. ह्या चित्रपटातील पहील्या काही दृष्यात, काही उंदिर गटारातून बाहेर पडताना दाखविले आहेत. त्याचबरोबर पोलंडमधील गर्दीच्या रस्त्यावरील ज्यूंचा जमाव दाखवलेला आहे. त्यांचे चेहेरे विद्रूप दाखविलेले आहेत. निवेदक असे सांगतो की ज्याप्रमाणे उंदिर ही प्राणीजगतातील उपद्रवी जात आहे, त्याप्रमाणे ज्यू ही मानवी जगतातील उपद्रवी जमात आहे व ते उंदराप्रमाणेच रोगराई आणि लाचलुचपतीचा प्रसार करतात. निवेदक पुढे असेही सांगतो की, ज्यूंच्यात माणसांत सामावून जावून त्यांचे शोषण करण्याची जी क्षमता आहे, ती उंदरांच्यात नाही. ह्या चित्रपटात ज्यूंचे रहाणीमान, धर्म , त्यांच्या पध्दती वगैरेचे चित्रण आहे. ह्या चित्रपटाचे मुख्य उद्दीष्ट ज्यूंविरोधी विषारी प्रचार करणे हेच आहे.
नाझी छळछावण्या व गॅस चेंबर्स (Nazi Concentration Camps)
हिटलरने १९३३ साली सत्तेवर आल्यानंतर लगेच छळछावण्यांची स्थापना केली. त्यांची संख्या दुसऱ्या महायुध्दापर्यंत १०० पर्यंत गेली. त्यात दोन प्रकार होते. एक जवळच्या कारखान्यांकरीता लागणाऱ्या वेठबिगार मजूरांकरीता. दुसरा होता नको असलेल्या माणसांना मारण्याकरीता. दुसऱ्या
महायुध्दात दोस्तांच्या सैन्याला विजय मिळाल्या नंतर, त्यांनी ह्या छळछावण्या ताब्यात घेउन तेथील कैद्यांना मुक्त केले. सोव्हीएट फौजांनी पोलंडमधील लुबीन शहराजवळील एक छळछावणी ताब्यात घेतली. या छळछावणीचे नाव मैदनेक (maidanek) असे होते. यावेळी अलेक्झांडर वर्थ हा बी.बी.सी. व लंडन संडे टाइम्सचा वार्ताहार त्यांच्याबरोबर गेला होता. ह्या छळछावणीची स्थापना १९४१ साली झाली होती. तेव्हापासून तेथे दीड लाख कैद्यांची हत्या करण्यात आली होती. वर्थने त्याचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. प्रथमदर्शनी त्या इमारती एखाद्या मजूरांच्या वसाहतीसारख्या वाटल्या. परंतु आत गेल्यावर खरी कल्पना आली. तेथे एक मोठे प्रवेशद्वार होते. आत गेल्यावर दोन्ही बाजूला मोठ्या बराकी होत्या. कैदी मोठ्या प्रमाणावर आल्यावर त्यांना बराकीत नेण्यात येत असे. या बरांकीना कॉंक्रीटच्या भिंती होत्या व त्या भिंतीतून पाण्याचे नळ बाहेर आले होते. कपडे काढून ठेवण्यासाठी बाकांची सोय केलेली होती. बहुधा त्यांना येथे येउन स्नान करण्याकरीता नम्र विनंती करण्यात येत असावी. लांबच्या प्रवासानंतर आंघोळ केल्यानंतर आपल्यावर काय वेळ येणार आहे त्याची बिचाऱ्यांना काय कल्पना. स्नान उरकल्यावर त्यांना पुढच्या खोलीत जाण्यास सांगण्यात यायचे. पुढच्या खोल्या म्हणजे चौकोनी आकाराच्या लहान बंद बराकी होत्या. त्यांना खिडक्या नव्हत्या. पुरूष, स्त्रीया व लहान मुलांना नग्नावस्थेत आत पाठविण्यात येई. जे जाणार नाहीत त्यांना जबरदस्तीने आत ढकलण्यात येई. एकावेळेला एका बराकीत २०० ते २५० माणसांना कोंबण्यात येई. त्यानंतर दार बंद करण्यात येई. त्या बराकीत अंधार असे. छतातून थोडा प्रकाश येत असे. दाराला बाहेरून बघण्यसाठी छोट्या भोकाची (Peep Hole) सोय होती. कैद्यांना आत कोंडल्यानंतर , गरम हवा व सायक्लॉनचे स्फटीक आत फवारण्यात येत. त्यापासून विषारी वायु तयार होउन ५ ते १० मिनीटात सर्व कैदी मरत. तेथे अशा बऱ्याच बराकी होत्या . एका वेळेस सुमारे २००० माणसांना खलास करण्याची सोय तेथे होती. दाराला तीन इंच व्यासाचे वर्तूळाकार स्पायहोल मध्ये शेक़डो छोटी छोटी भोके होती. ह्या स्पायहोलमधून नाझी एस्. एस् गार्डस् कैदी मरताना बघत असत. ह्या स्पायहोलना काचा असल्यामुळे एस्. एस्. गार्डसना विषारी वायूचा काहीच त्रास होत नसे. कैद्यांना त्यांचा मरण सोहळा कोणी बघत आहे याची कल्पना तरी असेल का.
वर्थने हा रीपोर्ट लंडनला पाठवला असता त्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. बीबीसी ने सुध्दा ही बातमी प्रसारीत करण्यास नकार दिला. त्यांना हा कम्यूनिस्ट प्रचार वाटला. त्यानंतर बूचेनवाल्ड
(Buchenwald), डकाउ (Dachau) व पश्चिम आघाडीवरल ईतर छळछावण्या ताब्यात आल्यानंतर हा रीपोर्ट खरा आहे असे आढळून आले. पोलंडमधील ऑस्चिविझ येथील छळछावणीचे कायमस्वरूपी संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे व ते सर्वांसाठी खुले आहे.
जर्मन स्त्री एस्. एस्. गार्ड ईर्मा ग्रीस (Irma Grese)
ईर्मा ग्रीस ही एक जर्मन , स्त्री एस्.एस् गार्ड होती. ती २१ वर्षाची दिसायला सुंदर असलेली तरूणी होती. तिचे डोळेही निळे होते. परंतु ती अतीशय क्रूर होती. तिने चार छळछावण्यात काम केले होते. मार्च १९४५ मध्ये ती बेन्सनच्या छळछावणीत रूजू झाली. तिच्या अधिपत्याखाली तीस हजार स्त्री कैदी होत्या. ज्या ज्या ठिकाणी तिने काम केले, त्या त्या ठिकाणी तिने कैद्यांवर अननवित अत्याचार केले. कैद्यांना चाबकाचे फटके मारून ठार करणे, त्यांच्यावर भुकेले कुत्रे सो़डणे, त्यांची गॅस चेंबरमध्ये नेण्या करीता निवड करणे अशी तिच्या अत्याचाराची काही उदाहरणे आहेत. ती दिवसाला ३० कैदी मारण्याकरीता जबाबदार होती. तीच्याकडे कैद्यांच्या कातडीपासून बनविलेल्या लँपशेड्स होत्या. ती कैद्यांवर मानसिक व शारीरीक अत्याचार करण्याचे विकृत सुख (परपीडनातून – sadist ) मिळवायची. तीच्याक़डे नेहमी चाबूक व पिस्तुल असायचे. तिचे बेन्सन छळछावणीतील डॉक्टर जोसेफ मेंगेले याच्याशी प्रेमसंबंध होते. हा डॉक्टर कैद्यांवर अनेक प्रकारचे जनुकीय व वैद्यकशास्त्रीय प्रयोग करायचा. त्याला ती त्याच्या प्रयोगांकरीता लागणाऱ्या कैद्यांची निवड करण्यास मदत करायची. तिला जून १९४५ मध्ये ब्रिटीश सैन्याने ताब्यात घेतल्यांनंतर , न्यूरेंबर्गच्या लष्करी न्यायालयात तिच्यवर खटला भरण्यात आला. त्यात ती दोषी ठरून , तिला १३ डिसेंबर १९४५ ला, वयाच्या २१ व्या वर्षी फाशी देण्यात आले. तीला फाशी देणारा तुरुंगरक्षक जेव्हा तिला फाशी देण्याकरीता बराकीतून बाहेर काढण्याकरीता गेला, तेंव्हा तीने जर्मन भाषेत एकच शब्द उच्चारला, तो म्हणजे “लवकर” ( Quick). तीला कोणतीही पश्चात्तापाची भावना नव्हती
नाझी कॉन्सनट्रेशन कँप्स डॉक्युमेंटरी फिल्म
ही फिल्म १९४५ साली लंडनमध्ये संपादीत करण्यात आली. या फिल्मचा काही भाग आलफ्रेड हिचकॉक या प्रसिध्द दिग्दर्शकाने संपादीत केला आहे. ही फिल्म सहा भागात असून , प्रत्येक भागात एकेका छळछावणीचे चित्रण आहे. जर्मनीच्या शरणागतीनंतर ब्रिटीश, अमेरीकन व रशीयन सैन्यांने जर्मनीत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर गेलेल्या कॅमेरामनच्या पथकाने तेथील कॉन्सनट्रेशन कँप्सचे पध्दतशीर चित्रीकरण केले. ह्या फिल्म मध्ये अनेकवेळा प्रेतांचे ढीग दाखवलेले आहेत. प्रेतांचे व मानवी अवयवांचे ढीग बुल़डोझरच्या सहाय्या ने हलविताना दाखविले आहेत. भट्टीत जाळल्यानंतर उरलेल्या मानवी देहांच्या राखेचे व हाडांच्या ढीगाचे चित्रण आहे. एका कैद्याने तेथील परीस्थितीचे वर्णन केले आहे. जवळपासच्या गावातील सामान्य जर्मन जनतेला हे सर्व दाखवण्याकरीता आणले गेले होते, त्याचेही चित्रण आहे. त्यांना मानवी त्वचेपासून तयार केलेल्या लँपशेड्स व आक्रसून लहान करून ठेवलेली मानवी मुंडकी दाखवण्यात येत आहेत. काही कैद्यांवर उपचार करण्यात येत आहेत, तर काहींना आंघोळी घालण्यात येत आहेत. जीवंत असलेल्या कैद्यांची अवस्था हाडांच्या सापळ्याप्रमाणे झालेली दाखविली आहे. अमेरीकन सैन्यप्रमुख जनरल आयसेनहॉवर व इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीचे पण चित्रण आहे.
या प्रकल्पाचे सांकेतीक नाव होते "F3080” या प्रकल्पाचे उद्दीष्ट होते जर्मनांनी केलेले अत्याचार जगासमोर आणणे. फेब्रुवारी १९४५ मध्ये या प्रकल्पाची सुरूवात झाली. मानसशास्त्रीय युध्द विभाग Psychological Warfare Division of SHAEF (Supreme Headquarters Allied Expeditionary Force) यांनी हा प्रकल्प चालू केला होता. मे १९४५ मध्ये ब्रिटीश माहीती मंत्रालय व अमेरीकन युध्द माहीती कार्यालय यांनी ह्या फिल्मचे संकलन चालू केले. या फिल्मचे तीन वेगळे व्हर्शन्स करण्यचा प्रस्ताव होता. एक जर्मन जनतेला दाखविण्या करीता. दूसरा जर्मन युध्दकैद्यांकरीता आणि तीसरा उर्वरीत जगाकरीता. मानसशास्त्रीय युध्द विभागाचा प्रमुख सिडने बर्नस्टाईनने ह्या फिल्मचे उद्दीष्ट निश्चित केले होते. ते ह्याप्रमाणे होते. केवळ नाझी व एस्. एस् गार्डस ह्या अत्याचारांना जबाबदार नसून संपूर्ण जर्मन जनता ह्या अत्याचारांना जबाबदार आहे असे सिध्द करणे व जर्मन जनतेला जगासमोर मान खाली घालायला लावणे. ही फिल्म संपूर्णपणे त्यावेळी काही कारणामुळे जनतेसाठी खुली होउ शकली नाही. फिल्ममध्ये ज्यूंचा कोठेही वेगळा किंवा खास उल्लेख नव्हता. त्यात कैद्यांचा प्रत्येक युरोपीय देशातील पुरूष, स्त्रीया व मुले असा होता. प्रत्यक्षात ज्यूंचा मोठ्या प्रमाणावर संहार झाला होता. ज्यूंचा उल्लेख न करण्यामागे प्रचाराचे राजकीय उद्दीष्ट होते. ब्रिटीश माहीती मंत्रालयाच्या मार्गर्दर्शक तत्वाप्रमाणे, नाझींनी त्यांचे राजकीय विरोधक, ज्यू व इतर लोक असा भेदभाव न करता सर्व निरपराध लोकांवर अत्याचार केले आहेत असे जगाला दाखवून द्यायचे होते. त्यामुळे जर्मनीच्या संपूर्ण युरोप मधून ज्यूंच्या समूळ उच्चाटनाच्या नीतीचा या फिल्ममध्ये उल्लेख नव्हता. ह्या फिल्ममध्ये असे एक दृष्य आहे की ज्यात जनरल आयसेनहॉवर अमेरीकन काँग्रेसदस्य व पत्रकारांना विनंती करतो , की त्यांनी अमेरीकेचे प्रतिनीधी बनून सर्व जगाला या नाझी अत्याचारांची माहीती द्यावी.
यातील काही भाग वापरून मेमरी ऑफ द कँप्स ही फिल्म बनविण्यात आली व १५ जून १९४५ मध्ये प्रसारीत करण्यात आली. मूळ फील्म मे १९८५ मध्ये आम जनतेसाठी प्रसारीत करण्यात आली. ही फिल्म न्यूरेंबर्ग खटल्यातील युध्दगुन्हेगारांना दाखविण्यात आली होती. ते सुध्दा ही फिल्म बघताना अश्रू आवरू शकले नाहीत.
मर्ढेकर हे त्या काळात (१९४३ ते १९४७) ऑल इंडीया रेडीओत प्रोग्रॅम डायरेक्टर होते. बी. बी. सी. व ऑल इंडिया रेडीओ या संस्था जरी वेगळ्या असल्या तरी त्या ब्रिटीश सरकारच्याच अधिपत्याखाली होत्या. एकूणच मर्ढेकरांचे त्या काळातील एक्सपोजर बघता, त्यांना ह्या प्रचाराची चांगलीच माहीती असावी, असा तर्क काढण्यस जागा आहे.
कविता व वरील संदर्भ
श्री. भाऊ पाध्ये यांच्या म्हणण्याप्रमाणे कवितेतील उंदिरांची प्रतिमा नाझी छळछावण्यतील कैद्यां करीता वापरली असावी. मर्ढेकरांना जर्मन प्रचार चित्रपट दी इटर्नल ज्यू ची माहीती असावी. व नाझी प्रचारात ज्यूंचा उल्लेख उंदिर म्हणून केला जातो ह्याची पण माहीती असावी. त्यामुळे कैदी म्हणजे उंदिर असे गृहीत धरले तर कवितेच्या पुढील ओळींचे पुर्नसंदर्भीकरण (re contextualization) होते.
ओले पिंप म्हणजे छळछावण्यातील गॅस चेंबर्स असा अर्थ निघू शकतो. हे पिंप ओलेच का ? कारण गॅस चेंबर्सच्या भिंती आतील शॉवर्सच्या पाण्यामुळे ओलसर रहात असतील. गॅसचेंबरमध्ये मेल्यानंतर कैद्याच्या माना पडलेल्या असतात व त्या माना सुध्दा मुरगाळल्याशीवाय पड़ल्या असतात. त्या कैद्यांनी तोंडात विषारी वायु जाउ नये म्हणून ओठावर ओठ दाबून धरले असतील. त्यांना त्यांच्या स्वतःच्या मरणाविषयी कोणतीही कल्पना नसताना ते मेले असतील व त्यामुळे मरताना त्यांच्या माना आसक्ती शिवाय पडल्या असतील. ह्या कैद्याना गरीब बिचारे असे म्हटले आहे कारण हे ज्यू कैदी निरपराध आहेत. केवळ ज्यू असणे हाच त्याचा अपराध आहे. बिळात जगले याचा अर्थ घाबरून जगले. ज्यूंच्या वसाहतीसुध्दा वेगळ्या होत्या. ग़ॅस चेंबरमध्ये विषारी वायु नाकातोंडात जाउन मरताना, त्यांनी उचकी देउनच मरणाला जवळ केले असेल.
दिवस सांडला घाऱ्या डोळी
गात्रलिंग अन् धुऊन घेउन,
दिवस सांडला घाऱ्या डोळी ह्या ओळीला जर्मन स्त्री एस्. एस् गार्ड इर्मा ग्रीस चा संदर्भ आहे. तिचे डोळे घारे होते. दिवसभर हे कैदी तिच्या नजरेखाली असत. एखादे क्रूर मांजर ज्याप्रमाणे उंदराला खेळवून मारते, त्याप्रमाणे ती कैद्यावर विविध प्रकारचे अत्याचार करून त्यांना मारत असे. कैद्यांना गॅसचेंबरमध्ये नेण्याआधी , त्यांना काहीच कल्पना नसे. बऱ्याच कैद्यांना युरोपमधील विविध भागातून गोळा करून, रेल्वे गाड्यातून गुराढोरांप्रमाणे कोंबून छळछावण्यात आणण्यात येत असे. त्यातील बरेच कैदी असल्या प्रवासात झालेल्या हालांमुळे अर्धमेले होत असत. त्यांच्या अंगात कसलेही त्राण उरलेले नसे. गात्रलिंग हा शब्द या अर्थी आला असावा. त्यानंतर त्यांना स्नानाची सोय असलेल्या बराकीत नेण्यात येत असे. तत्पूर्वी त्यांना कपडे काढून ठेवण्यास सांगण्यात येत असे. नंतर त्यांना सामुदायिक स्नान (शॉवरखाली) घालण्यात येत असे. धुऊन घेऊन हा शब्द कवितेत या अर्थाने वापरला गेला असावा. ज्याप्रमाणे जनावरांना धुण्यात येते, त्याप्रमाणे कैद्यांना धुण्यात येत असे.
जगायची पण सक्ती आहे ;
मरायची पण सक्ती आहे.
कैद्यांना मारायचे की नाही हे त्यांच्या शारीरीक अवस्थेप्रमाणे ठरविण्यात येई. जे कैदी ध़डधाकट आहेत, त्यांना मजूरी तत्सम शारीरीक कष्टाच्या कामाकरीता जीवंत ठेवण्यात येई. दुबळे, रोगी असलेल्या कैद्यांना मारण्यात येई. जेव्हा एखादा कैदी कष्ट करण्यायोग्य रहात नसे, तेव्हा त्याची रवानगी गॅस चेंबरमध्ये होत असे. काही कैद्यांवर डॉक्टर जनुकीय व वैद्यकीय प्रयोग केले जात. त्या कैद्यांना प्रयोग संपेपर्यंत जीवंत ठेवण्यात येई.
उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
छळछावण्यातील वातावरण उदास असायचे. रोज काही कैद्यांना मरणाला सामोरे जावे लागायचे. आपली वेळ कधी येणार त्याची वाट बघत बसावे लागत असे. जहरी डोळे ला गॅस चेंबर्सच्या भोकांचा (पीप होल्सचा) संदर्भ असावा. त्या भोकातून कैदी कसे मरतात हे गार्डना बघण्याची सोय होती. त्या भोकांना, बघणाऱ्या गार्डना विषारी वायुचा त्रास होउ नये म्हणून, काचा बसवलेल्या असत. जहरी चा संदर्भ विषारी वायुशी असावा.
मधाळ पोळें
ओठावरती जमले तेंही
बेकलायटी, बेकलायटी !
ओठावरती ओठ लागले ;
पिंपात उंदिर न्हाले ! न्हाले !
वरील ओळींचा संदर्भ वर उल्लेख केलेल्या नाझी कॉन्सनट्रेशन कँप्स डॉक्युमेंटरी फिल्म व दोस्त राष्ट्रांच्या प्रचारनीतीशी आहे. दोस्त राष्ट्रांनी या फिल्ममध्ये ज्यूंचा वेगळा उल्लेख करण्याचे टाळले आहे. त्या फिल्ममध्ये जनरल आयसेनहॉवर उपस्थित पत्रकारांना व अमेरीकन काँग्रेसच्या प्रतीनिधींना असे आवाहन करतो की त्यांनी अमेरीकेचे प्रतिनीधी बनून सर्व जगाला या नाझी अत्याचारांची माहीती द्यावी. ओठावर जमलेलेले मधाळ पोळे म्हणजे ही प्रचाराकरीता वापरलेली गोड भाषा आहे.(फारसी भाषेला फारसी वाङ्गमयात मधाच्या पोळ्याची उपमा दिली आहे कारण विद्वानांच्या मते ती भाषा गोड असून, काव्याकरीता योग्य आहे कवि माधव ज्युलियन ह्यांच्या काव्यावर फारसी भाषा व काव्याचा प्रभाव होता. मर्ढेकरांच्या सुरवातीच्या कवितांवर माधव ज्युलियनांचा प्रभाव होता.) तो मध कीतीही गोड असला तरी तो कृत्रिम आहे. बेकलाईटी हा शब्द कृत्रीम अशा अर्थाने वापरला असावा. बेकलाईट हे एक प्रकारचे प्लॅस्टीक आहे. बेकलाईट पासून बनविलेले दागिने १९३० सालापासून १९६० पर्यंत युरोपात प्रचलित होते. ओठावरती ओठ लागले ह्या ओळीचा संदर्भ इंग्रजी क्लोज लीप्ड् (Close lipped) किंवा टाइट लीप्ड (tight lipped) ह्या विशेषणाशी असावा. ह्याचा मराठी अर्थ , माहीती असलेल्या सर्वच गोष्टींची वाच्यता न करणारा म्हणजेच अ़डचणीत आणू शकणाऱ्या माहीतीबध्दल सोयीस्कररीत्या मौन पाळणारा, असा होतो. हे विशेषण मुत्सद्याबध्दल (tight lipped Diplomat) वापरण्यात येते. वर उल्लेख केलेल्या नाझी कॉन्सनट्रेशन कँप्स डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये ज्यूंवर झालेल्या अत्याचारांचा वेगळा खास उल्लेख टाळला आहे. ह्या फिल्ममध्ये दोस्तांच्या सैनिकांनी मुक्त केलेल्या कैद्यांना स्वयंसेवक आंधोळी घालताना दाखविलेले आहे. ह्याचा संदर्भ कवितेतील शेवटच्या ओळीतील न्हाले ह्या शब्दांशी आहे. ह्या शब्दांपुढील उदगारवाचक चिन्हांचा अर्थ, “न्हाहून धन्य झाले” असा उपरोधीक निघू शकतो.
ही कविता का लिहीली असावी ?
दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ऑल इंडिया रेडीओवर उच्च पदावर काम करीत असल्यामुळे मर्ढेकरांना बऱ्याच युध्दकालीन घटनांची माहीती असावी. अशा घटनांची कल्पना सामान्य मराठी माणसाला व तत्कालीन साहित्यक्षेत्रातील व्यक्तींना माहीती असण्याची शक्यता नव्हती. सरकारी अधिकाऱ्यांवर अशा बातम्या गोपनीय राखण्याची जबाबदारी असते. त्यामुळे मर्ढेकर हे कोणालाच सांगू शकत नव्हते. त्यांमुळे अशी कविता लिहून, त्या कवितेद्वारे त्यांच्या भावना मांडल्या असाव्यात. आणखी असाही एक उद्देश असू शकतो , की ह्या कवितेद्वारे ज्यूंवर झालेले अत्याचार लोकांपर्यंत पोहोचावेत.
शिंडलरस् लिस्ट चित्रपटातील काही द्रुष्ये
शिंडलरस् लिस्ट हा एक ऑस्करविजेता गाजलेला इंग्रजी चित्रपट आहे. त्या चित्रपटात नाझी छळछावणीचे चित्रण आहे. त्यातील एका द्रुष्यात , ऑसविच छळछावणीत ज्यु स्त्रीयांना घेउन आगगाडी येताना दाखविली आहे. . ही आगगा़डी तेथे पोहोचल्यावर या स्त्रीयांना तेथे उतरविण्यात येते. नाझी स्त्री एस. एस गार्ड या स्त्रीयांचे केस कापतात व त्यांना कपडे काढून आंघोळीकरीता जाण्यास सांगतात. त्या गॅस चेंबरमध्ये गेल्यावर दार बंद केले जाते. त्यानंतर बंद दारावरील काचेने बंद केलेले वर्तुळाकार भोक ( पीप होल ) दिसते. कॅमेराचा फोकस बराच वेळ पीप होलवर केंद्रीत केला आहे. त्यानंतर कॅमेरा पीप होल मधून बघीतल्यावर जसे दृष्य दिसेल, त्या पध्दतीने गॅस चेंबरच्या आत असलेल्या स्त्रीयांचे दृष्य चित्रीत करतो. ह्या स्त्रीयांना त्यांच्या भवितव्याची कल्पना आलेली असते. त्यांच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती दिसत असते. तेवढ्यात वर असलेल्या शॉवरमधून पाण्याचे फवारे त्यांच्या अंगावर उडू लागतात. “उदासतेला जहरी डोळे, काचेचे पण ;” कवितेतील या ओळीतील डोळे म्हणजे, ही काचेने बंद केलेली पीप होलस् असावीत.
एका दृष्यात पुरूष ज्यु कैद्यांना आगगाडीत कोंबण्यात येते. त्यानंतर त्यांना होज पाईपच्या सहाय्याने पाणी मारून अक्षरशः धुण्यात येते. कवितेतील “गलितगात्र अन् धुउन घेउनी” ह्या ओळीचा संदर्भ असा असावा.
चंद्रशेखर बेलसरे