Sunday, June 24, 2012

मर्ढेकरांची कविता - आला आषाढ श्रावण


          आला आषाढ – श्रावण,
         आल्या पावसाच्या सरी ;
          किती चातकचोचीने
          प्यावा वर्षाऋतू तरी !
काळ्या ढेकळांचा गेला
गंध भरून कळ्यांत ;
          काऴ्या डाबरी रस्त्याचा
        झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओलीं चिरगुटें झालीं;
        ओल्या कौलारकौलारीं
        मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
        आणि पोपटी रंगाची
        रान दाखविते नक्षी.
ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
        धावणाऱ्या क्षणालाही
        आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
                  येतां आषाढ श्रावण
         निवतात दिशा-पंथ.
         आला आषाढ-श्रावण
          आल्या पावसाच्या सरी;
          किती चातक – चोचीने
          प्यावा वर्षाऋतु तरी !

                  बा. सी. मर्ढेकर
मर्ढेकरांची ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. या कवितेत आषाढ श्रावण महिन्यात येणाऱ्या पावसाने ओल्या झालेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पहाणारे पक्षी पावसाचे पाणी पीत आहेत, मेघ लाली हुंगत आहेत वगैरे, वगैरे. परंतु या कवितेतील काही ओळी खटकतात. उदा.  ओशाळला येथे यम. पावसाने न्हाईलेल्या सृष्टीचे वर्णन करताना अचानक यमाची कवितेत आठवण का यावी ?  यमही ओशाळावा अशी कोणती घटना त्या पावसात ओल्या झालेल्या सृष्टीत घडली आहे सजीवांचे प्राण हरण करणे ही यमाच्या दृष्टीने रूटीन गोष्ट आहे. समजा पावसामुळे आलेल्या पुरामुळे शे दोनशे माणसे मरण पावली असे असतील, असे गृहीत धरले,  तरी त्यातही यमाने ओशाऴावे असे काही नाही. तसेच वीज ओशाऴली थोडी ह्या ओळीतील वीज का ओशाळली आहे ?  आषाढ श्रावणातील पाऊस हा रिमझीम पाऊस असतो. त्या पावसात कधी वीजांचा कडकडाट नसतो. वळवाच्या पावसात वीजा चमकत असतात. मग वीजेलाही ओशाळायला लावेल असा प्रकाश या पावसात पडला होता का ? ती तर अशक्य धटना आहे. आषाढ श्रावणात कुंद हवा असते व सूर्यप्रकाश सुध्दा कमीच असतो. मग वीजेलाही ओशाळवयाला लावेल असा प्रकाश कोणता ?    तसेच तापलेल्या तारा कोणाच्या मनातील आहेत ?  या पावसात निवणारे दिशा पंथ कोणते ?  पावसाने डांबरी रस्ता धुतला गेल्यामुळे एक वेळ निर्मळ होणे शक्य आहे, परंतु तो निवांत कसा होईल
विचार करून सुध्दा  ह्या प्रश्नांची सर्मपक  उत्तरे मिळाली  नाहीत. शेवटी अशा निश्कर्षापाशी पोहोचलो, की मर्ढेकरांच्या इतर अनेक कवितांसारखा हा प्रतिमांचा खेळ असावा. अनेक संदर्भ शोधता शोधता अखेर दुसऱ्या महायुध्दा काळात जाऊन पोचलो. तिथे मला या पावसाचा संदर्भ सापडला. व कवितेचा अर्थ हळूहऴू लक्षात येऊ लागला. हा पाउस काही आपला नेहमीचा पाऊस नाही. हा विनाशाचा पाऊस  आहे.  अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी या शहरांवर अणुबॉंब  टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी पाऊस आहे. ही कविता कळण्यासाठी खालील संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.
  दुसऱ्या महायुध्द निर्णायक अवस्थेला पोचले होते. दोस्त राष्ट्रांचा युरोपमध्ये विजय झाला होता. जर्मनीने पराभव मान्य केला होता. इटलीसुध्दा पराभूत झाला होता. जपान मात्र पराभव मान्य करायला तयार नव्हता.  1945 च्या जुलै महीन्यात जर्मनीतील पोस्टडॅम येथे दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद भरली होती. त्या परिषदेस अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, रशियाचे राष्ट्रप्रमुख जोसेफ स्टॅलिन हे  हजर होते. या परिषदेत इतर प्रश्नांबरोबरच जपानच्या शरणागतीच्या अटी ठरविण्यात आल्या. ह्या अटींच्या मसुद्याला पोस्टडॅम डिक्लेरेशन असे नाव आहे. जपानला या अटी कळवण्यात आल्या व शरणागती पत्करण्याकरीता अंतिम मुदत देण्यात आली व शरणागती न पत्करल्यास कोणते गंभीर परिणाम जपानला भोगावे लागतील याचा ईशारा देण्यात आला. यात जपानला शरण न आल्यास जपानवर अतिशय विनाशकारी अशा अस्त्राचा वापर करण्यात येइल अशी धमकी अमेरीकेने दिली होती. त्यात अणुबाँबचा कुठेही उल्लेख नव्हता. पण अणुबाँब टाकण्याची गर्भीत धमकी होती कारण पोस्टडॅम परिषद चालू होण्यापूर्वी एक दिवस आधीच अमेरीकेने अणुबाँबची चाचणी घेतली होती. व ती यशस्वी झाली होती. अमेरीकेच्या विमांनानी सामान्य जपानी जनतेच्या माहीतीकरीता जपानच्या शहरांवर पत्रकेही टाकली. त्या पत्रकात असे लिहीले होते की, जपानच्या जनतेनी त्यांच्या सम्राटाला शरणागती पत्करायची विनंती करावी.  जपान सरकारने अमेरीकेच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देऊन, ते त्यांना मान्य नसल्याचे ध्वनित केले. याची परिणीती अमेरीकेने, 6 ऑगस्ट 1945 रोजी, जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकण्यात झाली. ह्या अणुस्फोटामुळे हिरोशिमा शहराचा बरासचा भाग ऊध्दवस्त झाला व लाखो लोक मृत्युमुखी पडले. हजारो लोक जखमी झाले. तसेच किरणोत्सर्गाचे भयानक परिणाम निरपराध तेथील  नागरीकांना भोगावे लागले.
त्याच दिवशी अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन ह्यांनी रेडीओवर भाषण करून व एक पत्रक काढून जपानवर अणुबाँब टाकल्याचे जाहीर केले. त्यात त्यांनी जपान शरण न आल्यास त्यांना ह्या पृथ्वीतलावर पाहिला नसेल अशा सर्वनाशाच्या पावसाला” ( Rain of Ruin) सामोरे जावे लागेल , अशी धमकी जपानला दिली. ( If they do not now accept our terms they may expect a rain of ruin from the air, the like of which has never been seen on this earth. Behind this air attack will follow sea and land forces in such number that and power as they have not yet seen and with the fighting skill of which they are already well aware.) ह्या आवाहनाला सुध्दा जपान सरकारकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे, 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील नागासकी या शहरावर अमेरीकेने दुसरा अणुबाँब टाकला. त्यादिवशी हॅरी ट्रुमन ह्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात खालील उद्गार काढले.
I realize the tragic significance of the atomic bomb... It is an awful responsibility which has come to us... We thank God that it has come to us, instead of to our enemies; and we pray that He may guide us to use it in His ways and for His purposes.
—President Harry S. Truman, August 9, 1945
त्यानंतर जपानच्या मंत्रीमंडळात शरणागती पत्करायची की नाही , ह्या मुद्दयावरून दोने तट पडले. अखेर जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला.
आता कवितेकडे वळू.
          आला आषाढ – श्रावण,
         आल्या पावसाच्या सरी ;
          किती चातकचोचीने
          प्यावा वर्षाऋतू तरी !

आषाढ व श्रावण ह्या महीन्यात दरवर्षीच पाउस येतो. मग हा पाउस वेगऴा कसा ?  येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हा विनाशाचा पाउस आषाढ आणि श्रावणात झाला.  6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमावर अणुबाँब टाकला तो दिवस आषाढ महीन्यातील होता. हिंदु पंचांगाप्रमाणे त्या दिवशी आषाढ महीन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी होती. 9 ऑगस्ट 1945 ला नागासकीवर अणुबाँब टाकण्यात आला त्या दिवशी श्रावण महीन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा होती.  मर्ढेकरांनी आषाढ व श्रावण हे महीने  कवितेच्या पहिल्याच ओळीत चपखलपणे बसवून, हा पाउस तोच विनाशाचा पाउस असल्याचा संकेत दिला आहे. किती चातकचोचीने, वर्षा ऋतु प्यावा तरी ! “.  ह्या ओळी उपरोधीक अर्थाच्या आहे. शेवटी असलेले ऊद्गारवाचक चिन्ह उपरोधीक अर्थ अधोरेखित करण्यासाठी वापरले असावे. चातक पक्षी हा पावसाचेच पाणी चोचीने पीत असतो अशी कविकल्पना आहे. त्यामुळे तो पावसाची वाट आतुरतेने बघत असतो. हा विनाशाचा पाउस आहे. अणुस्फोटानंतर हिरोशिमा शहरावर एक तासानंतर काळ्या रंगाचे थेंब असलेला पाऊस झाला. ह्या पावसात किरणोत्सर्गी द्रव्ये होती. त्यामुळे हे पाणी विषारी होते. स्फोटात भाजलेली अनेक माणसे तहानेनी तळमळत होती. त्यांनी तहान भागविण्याकरीता हे पाणी पिले. त्या पाण्यातील किरणोत्सर्गी द्रव्याची बाधा होऊन ती माणसे मृत्युमुखी पडली.

काळ्या ढेकळांचा गेला
गंध भरून कळ्यांत ;
          काऴ्या डांबरी रस्त्याचा
        झाला निर्मळ निवांत.

ह्या कडव्यातील काळी ढेकळे शेतात असणारी काळी ढेकळे नाहीत. ती आहेत अणुबाँबच्या स्फोटामुऴे जळून उध्दवस्त झालेल्या हिरोशिमा शहरातील उरलेली ढेकळे. ह्या स्फोटात हिरोशिमा शहरातल्या बहुतांश इमारतींना आगी लागल्या व लाकडी असलेल्या इमारती जळून गेल्या. कळ्यांची प्रतिमा तेथील लहान मुलांकरीता वापरली असावी.  ढेकळांचा गंध कळ्यात कधी भरेल ? त्या कऴ्या मातीत मिळाल्यावरच. बाँबस्फोटानंतर तेथील रस्ते, पावसामुळे धुतले गेले होते. त्या काळ्या डांबरी रस्त्यावर, काऴ्या थेंबाचाच पाऊस पडल्यामुळे ते निर्मळ झाले असावेत. काळ्या डांबरावर काळ्या रंगाचेच पावसाचे पाणी पडल्यामुळे कदाचित ते जास्तच स्वच्छ दिसत असावेत. तसेच माणसेच न ऊरल्यामुळे ते रस्ते निर्मनुष्य म्हणजेच निवांत झाले होते. खाली हिरोशिमा शहराची बाँबस्फोटाच्या आधीचे व नंतरचे  विमानातून घेतलेले  छायाचित्र दिलेले आहे. त्यात डांबरी रस्त्यांची स्थिती दिसत आहे.

 हिरोशिमा – अणुबाँब स्फोटापूर्वीचे छायाचित्र


 

    
                      हिरोशिमा – अणुबाँब स्फोटानंतरचे छायाचित्र 
                   ” काऴ्या डांबरी रस्त्याचा , झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओलीं चिरगुटें झालीं;
        ओल्या कौलारकौलारीं
        मेघ हुंगतात लाली

ह्या पावसातील चिंब झालेल्या चिरगुटांचा संदर्भ वेगळा आहे. ही चिरगुटे स्फोटात भाजलेल्या लोकांचे कपडे असावेत. ते कपडे उष्णतेमुळे  त्यांच्या अंगालाच चिकटून बसले होते. 
        ओल्या कौलारकौलारीं
        मेघ हुंगतात लाली.
        
    नागासकी शहरातील बहुतेक घरे लाकडाची होती व त्यावर कौले होती. ही कौले त्या पावसामुळे ओली झाली होती. ह्या कडव्यातील मेघ म्हणजे नेहमी पावसात असतो तो ढग नव्हे. हा ढग आहे अणुबाँबच्या स्फोटानंतर तयार झालेला ढग. ह्या ढगाला शास्त्रीय परिभाषेत मश्ऱूम क्लाउड (Mushroom Cloud)  असे नाव आहे. हा ढग लाली हुंगतो आहे. ही लाली स्फोटात मृत वा जखमी झालेल्या माणसांच्या रक्ताची लाली  आहे. 


 

                        Mushroom cloud after atomic bombing on Hiroshima and Nagasaki


ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
        आणि पोपटी रंगाची
        रान दाखविते नक्षी.

वरील कडव्यात उल्लेख केलेल्या पानातल्या रेषा , ओले पक्षी या  प्रतिमा आहेत. ही प्रत्यक्षातील पावसात ओली झालेली झाडांची पाने वा ओले पक्षी नव्हेत. ही ओली पाने म्हणजे अमेरीकेच्या विमानांनी जपानी शहरांवर टाकलेली पत्रके (leaflets) असावीत. पाने हा शब्द इंग्रजीतील leaflets या शब्दावरुन घेतला असावा. (Leaf = पान) पानातील रेषा म्हणजे पत्रकातील मजकूरा मागे दडलेला गर्भितार्थ. ह्या रेषांचा संदर्भ इंग्रजीतील to read between the lines या वाकप्रचाराशी असावा. ही पाने ओली आहेत. पण ती काही विनाशाच्या पावसाने ओली झालेली नाहीत. त्या पत्रकात जपानी जनतेने त्यांच्या सरकारला व सम्राटाला शरणागती पत्करण्याची विनंती करावी असे भावनिक आवाहन केलेले आहे. असे भावनीक ओलेपण त्या पानात असल्यामुळे, ओली पाने असे शब्द वापरलेले असावेत.  अशा ह्या ओल्या पानातील  रेषा, ओले पक्षी वाचत आहेत. हे पक्षी कोणते आहेत. हे पक्षी म्हणजे जपानी युध्दसमितीतले सदस्य असावेत. जपानने कोणताही युध्दविषयक निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली होती. सुप्रीम वॉर कॉन्सिल (Supreme War Council)  असे या समितीचे नाव होते. या समितीचे सहा सदस्य होते. आण्विक हल्ल्यानंतर  जपानने शरणागती पत्करावी की नाही या मुद्द्यावरून या सदस्यात खडाजंगी झाली. ह्या समितीतील तीन जहाल मतवादी सदस्य शरणागती पत्करू नये अशा मताचे होते, तर उरलेले तीन मवाळ मताचे सदस्य शरणागती पत्करावी या मताचे होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करी बळावर प्रश्न सोडवण्याची तरफदारी करणाऱ्या राजकारण्यांना ससाणे (Hawks) म्हणतात व लष्करी बळाचा वापर न करण्याच्या मताच्या राजकारण्यांना  कबुतरे (Doves)  म्हणतात. ही समिती ससाणे व कबुतरांच्यात विभागली गेले असा उल्लेख  आहे. हे  पक्षी ओले झालेले आहेत म्हणजेच विनाशाच्या पावसामुऴे (अणुहल्ल्यामुळे) हतबुध्द झालेले आहेत. ज्याप्रमाणे ओला झालेला पक्षी लौकर उडू शकत नाहीत, त्याप्रमाणे हे संमिती सदस्य तात्काल शरणागती पत्करण्याचा  निर्णय घेउ शकत नव्हते. अखेर जपानचे सम्राट हिरोहिटो ह्यांच्यासमोर निर्णयासाठी हा प्रश्न ठेवण्यात आला. जहाल गटांच्या सदस्यांनी सम्राटांना सांगितले की जपानी लष्कर व जपानी जनता शरणागती पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटचा माणूस जीवंत असेपर्यंत लढण्याची तयारी आहे. व जपानी जनता पराभव पत्करण्यापेक्षा हाराकीरीने मरणाला जवळ करेल. शरणागती पत्करल्यास लष्करात बंड होईल. परंतु हिरोशिमा, नागासकीत झालेली मनुष्यहानी व त्याचवेळी रशियाने जपानच्या ताब्यात असलेल्या मांचुरियावर केलेला हल्ला या गोष्टींचा विचार करून आणखी मनुष्यहानी टाळण्यासाठी जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला. आणि पोपटी रंगाची, रान दाखविते नक्षी , ह्या ओळींचा संदर्भ बहुधा रशियाने मांचुरियावर केलेल्या आक्रमणाशी असावा.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
        धावणाऱ्या क्षणालाही
        आली ओलसर गोडी.

हिरोशिमा व नागाकीवरील अणुबाँबच्या स्फोटात सुमारे दोन लाखांच्यावर निरपराध  माणसे मारली गेली. अणुस्फोटातून निर्माण झालेल्या अति उष्णते मुळे  अनेक माणसे भाजून व होरपळून मेली. त्यांना अक्षरशः यमयातना भोगावा लागल्या. उरलेल्या माणसांना किरणोत्सर्गाची बाधा होऊन, त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याचे परीणाम भोगावे लागले. तेथील दृष्य बघून प्रत्यक्ष यमसुध्दा ओशाळला असता. ह्या अणुस्फोटामुळे हजारो विजा एकाच वेळी चमकल्यावर जो प्रकाश निर्माण होइल, एवढा प्रकाश पडला. तो प्रकाश पाहून वीज सुध्दा ओशाळली असती.  
   ह्या अणुबाँब स्फोटानंतर जपानने शरणागती पत्करली व सतत चार वर्षे चाललेले दुसरे महायुध्द अखेर समाप्त झाले. त्यामुळे हा क्षण गोड झाला असावा. परंतु ही गोडी किंवा शांतता स्फोटात मारल्या गेलेल्या लाखो निरपराध माणसाच्या  रक्ताने माखलेली आहे. ओलसर हा शब्द त्या अनुषंगाने वापरला असावा.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
                  येतां आषाढ श्रावण
         निवतात दिशा-पंथ.

जपानने शरणागती पत्करायचा निर्णय जपानच्या लष्करातील अनेक अधिकाऱ्यांना मान्य नव्हता. अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जपानी लष्कराच्या काही तुकड्यांनी बंड केले व जपानच्या सम्राटांचा राजवाड्याला वेढा घातला. तेथील सुरक्षासैनिकांना ठार करून सम्राटांना ताब्यात घेतले व त्यांनी शरणागतीला मान्यता देऊ नये असा आग्रह धरला. परंतु त्यापूर्वीच सम्राटांचे शरणागती जाहीर करणारे ध्वनीमुद्रीत भाषणाची रेकॉर्ड राजवाड्यातून गुप्तपणे बाहेर काढण्यात आली होती व ते जपानची शरणागती जाहीर करणारे भाषण रेडिओ जपानवरून दि. 15 ऑगस्ट 1945 रोजी प्रसारीत करण्यात आले. त्यानंतर शरणागती पत्करण्यास विरोध असणाऱ्या लष्करी अधिकारी, सैनिक व काही जपानी नागरीकांनी हाराकीरी करून मरण पत्करले. नंतर बंड हळूहळू थंड झाले. मनी तापलेल्या तारा, जरा निवतात संथ  ” या ओळींचा संदर्भ वरील घटनाक्रमाशी असावा. जपानच्या जनतेची व लष्कराची मानसिकता शरणागती न पत्करण्याची होती. ती संथपणे बदलत जाऊन दि. 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने समारंभपूर्वक शरणागती पत्करली .
निवतात दिशा पंथ ह्या ओऴीचा संदर्भ नागासकी शहरावर झालेल्या अणुबाँब हल्ल्यात उध्वस्त झालेल्या चर्चशी आहे. नागासकी हे जपानमधील ख्रिश्चन धर्माचे महत्वाचे केंद्र होते. पंधराव्या शतकापासून तेथे जपानमधील ख्रिश्चन धर्माची सुरवात झाली. नागासकीत ख्रिश्चन लोकांची संख्या बरीच होती. 9  ऑगस्ट 1945 ला सकाऴी 9 वाजता नागासकीतील  ऊराक्रामी कॅथेड्रल मध्ये अनेक ख्रिश्चन धर्मीय लोक प्रार्थने करीता जमले होते.  तेथुन अवघ्या 500 मीटर्सवर  वर ( Ground  Zero) अणुबाँबचा स्फोट झाला. त्यामुऴे हे प्रार्थनास्थळ उध्वस्त झाले व प्रार्थनेस जमलेले सर्व लोक मरण पावले. नागासकी हे अणुबाँब टाकण्यासाठीचे टारगेट ठरविताना अमेरीकेच्या सरकार ला नागासकीत ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे व उराक्रामी कॅथेड्रल हे पूर्व आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्माचे स्थान आहे याची पूर्ण कल्पना होती. अमेरीकेची लोकसंख्येत सुध्दा ख्रिश्चन धर्मीय जास्त होते. तरीसुध्दा नागासकी हे लक्ष्य ठरविण्यात आले. त्यावेळी राजकीय स्वार्थापुढे कोणत्याही दिशा-पंथाचा विचार गौण ठरला. निवतात दिशा-पंथ या ओऴीचा संदर्भ वरील घटनेशी असावा.

बी.बी.सी. च्या संकेतस्थऴावरील "विनाशाच्या पावसाची " दिनांक 6 ऑगस्ट 1945 ला प्रसिध्द झालेल्या बातमीकरीता खालील दुव्यावर टिचकी मारा.

1945 : A Rain of ruin from air