Sunday, December 1, 2013

मर्ढेकरांची कविता - अभ्रांच्या ये कुंद अफूने



अभ्रांच्या ये कुंद अफूने
           पानांना ह्या हिरवी गुंगी;
           वैशाखातिल फांदीवरती
            आषाढातील गाजर पुंगी.

मिटून बसली पंख पाखरे,
पर्युत्सुक नच पीसही फुलते;
                       मूक गरोदर गायीची अन्
                       गळ्यांतली पण घंटा झुरते.
तिंबुनी झाली कणिक काळी
मऊ मोकळी ह्या रस्त्याची;
                     उष्टया अन्नामध्ये थबकली
                     चोंच कोरडी बघ घारीची.
ब्रेक लागला चाकांवरती,
श्वासहि तुटला आगगाडीचा;
                    उन उसासा धरणीच्या अन्
                    उरांत अडला इथे मघाचा.
शिरेल तेव्हा शिरो बिचारें
हवेंत असल्या पाउस-पाते;
जगास तोंवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजळ चढते.


बा.सी. मर्ढेकर


ह्या कवितेतील अभ्र , कुंद , पाने, पाखरे , गायीच्या गळ्यातील घंटा , पाउस-पाते वगैरे शब्दांमुळे ही कवितेत एखाद्या खेड्यातील निसर्गाचे वर्णन असावे असे वाटते. परंतु ह्या कवितेला दुसरे महायुध्दकालीन आंतरराष्ट्रीय  राजकारणाचे संदर्भ आहेत. दुसरे महायुध्द संपत आले असताना अमेरीकेने  पुढाकार घेउन कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिस्को येथे संयुक्त राष्ट्र महासंघाची स्थापना करण्याकरीता जगातील सर्व देशांची परीषद बोलाविली होती. त्यात अमेरीका, रशिया, ब्रिटन व चीन हे प्रायोजक देश होते. त्यांचे प्रतिनिधी व ४६ आमंत्रीत देशांचे प्रतिनिधी ह्या परीषदेला उपस्थित होते. जगातील ८० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व हे निमंत्रीत करीत होते. ह्या परीषदेचे उद्दीष्ट असे होते की एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापना करणे , की जी जागतीक शांतीता प्रस्थापित करण्यास मदत करेल. हे सर्व निमंत्रीत  सॅनफ्रॅन्सिस्कोतील गोल्डन गेट सिटी मध्ये जमले होते. ही परीषद २५ एप्रिल १९४२ रोजी सुरु झाली. ह्या परीषदेवर पाच बडया राष्ट्रांचा प्रभाव होता. ह्या बडया राष्ट्रांना सुरक्षा परीषदेत नकाराधिकाराचा हक्क हवा होता. बऱ्याच लहान राष्ट्रांना हे मान्य नव्हते. अखेर     ह्या नकाराधीकारावर  खूप चर्चा व वादविवाद झाले. अखेर नकाराधिकारावरची थोडीफार  बंधने  बडया राष्ट्रांनी मान्य केली व एकमत होउन युनायटेड नेशन्स चार्टरला सर्व राष्ट्रांनी मान्यता दिली. व ही परीषद २६ जून १९४५ रोजी संपली.

कवितेतील अभ्रांच्या ये कुंद अफूने  ह्या ओळींना सॅनफ्रॅन्सिस्कोतील एप्रिल महीन्यात असलेल्या हवामानाचा संदर्भ आहे. तेथील हवामान नेहमीच म्हणजेच उन्हाळ्यात सुघ्दा थंड व आल्हाददायक असते. नोव्हेंबर ते एप्रिल तेथे पाउस असतो. समुद्रावरील धुके हे सॅनफ्रॅन्सिस्कोच्या हवामानाचे वैशिष्ठ्य आहे. हे धुके उन्हाळ्यात नेहमीच असते. ही परीषद एप्रिल महीन्यातच चालू झाली होती. त्यावेळचे वातावरण धुक्यामुळे कुंद असे असावे.
 अफू व सॅनफ्रॅन्सिस्को ह्याचे नाते खूपच जुने आहे. गोल्ड रशच्या काळात म्हणजेच १८५० च्या सुमारास चिनी लोक सुघ्दा सोन्याच्या शोधाकरीता कॅलिफोर्नियामध्ये आले. चिनी लोकांनी त्यांच्या वसाहतीत म्हणजेच चायना टाउनमध्ये अफूचे अड्डे ( Opium Dens) चालू केले. काही वर्षातच स्थानिक अमेरीकन लोक सुध्दा अफूच्या नादी लागले व अड्डयांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. ह्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी     सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये कायद्याने  अफू सेवनावर बंदी घालण्यात आली. ह्याचा परीणाम एवढाच झाला की अफूंचे अड्डे गुप्तपणे चालू राहीले व हे अड्डे दुसरे महायुध्द संपेपर्यंत सर्रास चालू होते.
कवितेतील पानांना हिरवी गुंगी आलेली आहे. ही कसली पाने आहेत. आणि त्यांना आलेली  हिरवी गुंगी कसली आहे.  अमेरीकेतील पर्यावरण वाचवण्याची व संवर्धनाची चळवळीची सुरूवात  सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये १८९२ साली चालू झाली. काही पर्य़ावरणवाद्यांनी एकत्र येउन तेथे प्रसिध्द सिएरा क्लब स्थापन केला. ह्या चळवळीला ग्रीन पॉलिटीक्स असे नाव पडले.

                                            वैशाखातिल फांदीवरती
                         आषाढातील गाजर पुंगी

सॅनफ्रॅन्सिस्कोतील  संयुक्त राष्ट्र परीषद  एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात चालू झाली. हे दिवस मराठी कॅलेंडरप्रमाणे वैशाख महीन्याच्या आसपास येतात. ह्या परीषदेत मानवी हक्क व जागतीक शांतते राखण्या बध्दलचे ठराव सर्व राष्ट्रांनी मंजूर केल्यानंतर काही दिवसातच म्हणजेच ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरीकेने जपान मधील हिरोशीमा व नागासकी ह्या शहरांवर अणुबाँब टाकले. त्यात लाखो माणसे मारली गेली. ऑगस्ट महीना मराठी कॅलेंडरप्रमाणे आषाढ महीन्याच्या सुमारास येतो. ह्या ओळीतील फांदीवरती व गाजर ह्या शब्दांचा संदर्भ इंग्रजीतील कॅरट ऑन ए स्टीक ( Carrot on a Stick)  ह्या अलंकाराशी ( Idiom) आहे. एखादे उद्दीष्ट साध्य करण्याकरीता काही बक्षिसाचे नुसतेच आमीष दाखवण्यात येते, पण प्रत्यक्ष बक्षिस कधीच देण्यात येत नाही. अशा परीस्थितीचे वर्णन करण्यासाठी हा भाषेचा अलंकार वापरण्यात येतो. अमेरीकेने जागतीक शांततेचा पुरस्कार करत लहान राष्ट्रांना नादी लावून शरण येत असलेल्या जपानवर अणुबाँब टाकले, असा ह्या ओळींचा अर्थ असावा. ह्याचा असाही अर्थ होवू शकतो की ही परीषदेचा जागतीक परीषदेचा उद्देश फारसा गंभीर नाही आहे. ही परीषद म्हणजे गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली.

                                                मिटून बसली पंख पाखरे,
                                       पर्युत्सुक नच पीसही फुलते

ह्या परीषदेत अनेक लहान राष्ट्रांच्या प्रतिनीधींनी भाग घेतला होता. परंतु बडया राष्ट्रांसमोर ते आवाज उठवू शकत नव्हते. त्यांच्यावर दबाव आणून बडया राष्ट्रांनी सुरक्षा परीषदेतील नकाराधिकाराचा ठराव संमत करुन घेतला. पंख मिटून बसलेल्या  पाखरांची प्रतिमा ह्या लहान राष्ट्रांकरीता वापरली असावी. पर्युत्सुक हा शब्द पर्युषण ह्या शब्दापासून आलेला असावा.  पर्युषण हा जैन धर्मींयांचा महत्वाचा सण आहे. पर्युषण ह्या शब्दाचा अर्थ एकत्र येणे असा आहे. हे देश पर्युत्सुक होते. म्हणजेच जागतीक शांततेच्या प्रश्नावर  एकत्र येण्यास उत्सुक होते. परंतु बड्या राष्ट्रंच्या प्रभावामुळे मोकळेपणी चर्चा करु शकत नव्हते. नच पीसही फुलते चा अर्थ असा असावा.

                      मूक गरोदर गायीची अन्
                                  गळ्यांतली पण घंटा झुरते.

ही मूक गरोदर गाय कोण आहे ?  तिच्या गळ्यातली घंटा का झुरते आहे ? घंटे सारखी निर्जीव वस्तु कशी काय झुरेल ?  ती झुरत असेल तर ती नक्कीच सजीव आणि मानवी भावभावना असलेली आहे. ही घंटा म्हणजे लॉरेन्स बेल हा तत्कालीन अमेरीकन लढाउ विमाने तयार करणाऱ्या बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ह्या करणाऱ्या कारखान्याचा मालक आहे. १९३७ सालापासून तो अमेरीकन वायुसेनेला बाँबर व इतर लढाउ विमाने पुरवायचा. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अमेरीकन वायुदलाची विमानांची गरज खुपच वाढली. तसेच अमेरीकन वायुदल इतर देशांनाही लढाउ विमाने भाडेतत्वावर ( लीज अँड लेंड करार) वापरायला द्यायचे. ती विमाने सुध्दा हा पुरवायचा. तो अमेरीकन सरकारचा खूप मोठा विमांनाचा पुरवठेदार बनला होता. युध्दकाळात त्याचा धंदा चांगलाच बरकतीला आला होता. सर्व राष्ट्रांनी एकत्र येउन जर जागतीक शांततेचा पुरस्कार करण्याचे ठरविले तर युध्दच होणार नाहीत व लढाउ विमांनांची गरज भासणार नाही. असे झाले तर लॉरेन्स   बेलचा धंदाच बसेल ह्या काळजीने तो झुरायला लागला आहे. मर्ढेकरानी इंग्रजी बेल ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ घंटा हा येथे वापरला आहे.  कवितेतील  मूक गरोदर गाय ह्या शब्दांचा संदर्भ अमेरीकन राष्ट्राध्यक्षांच्या वापराकरीता खास बनविलेल्या सॅक्रेड काऊ(Sacred Cow) असे नाव असलेल्या विमानाशी आहे. सॅक्रेड काऊ ह्या इंग्रजी शब्दांचा अर्थ पवित्र गाय असा होतो. ह्याच विमानाने अमेरीकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट फेब्रुवारी १९४५ मध्ये रशियामध्ये याल्टा परीषदेला उपस्थित रहाण्यासाठी गेले होते. हे विमान अमेरीकन वायुदलाने खास बनवून घेतले होते. लॉरेन्स   बेल हा ह्याच गायीच्या गळ्यातील घंटा आहे म्हणजेच अमेरीकन सत्ताधीशांच्या व वायुदळाच्या अधिकाऱ्यांच्य जवळचा माणूस आहे, असे मर्ढेकरांना म्हणायचे असावे. ही गाय मूक आहे कारण ती खरी गाय नाही आहे. ही गाय गरोदर आहे कारण ह्या विमानाला अमेरीकन वायुदळाचे जन्मस्थळ समजले जाते. अमेरीकन वायुदळाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्रदान करणारा नॅशनल सिक्युरीटी अॅक्ट  नावाचा कायदा , २२ जूलै १९४७ साली , तत्कालीन अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन ह्यांनी ह्या विमानातून प्रवास करत असताना पास केला. ह्या कवितेत जो काल वर्णन केला आहे त्या काळात, म्हणजेच १९४५ च्या सुमारास ही गाय   त्या अर्थाने    गरोदर  होती.

                                         तिंबुनी झाली कणिक काळी
                                          मऊ मोकळी ह्या रस्त्याची;

ह्या ओळींचा संदर्भ ब्रिटीश व अमेरीकन वायुदलाने जर्मनीतील ड्रसडेन ह्या शहरावर केलेल्या तुफानी बाँबहल्ल्याशी आहे. १२ फेब्रुवारी  १९४५ ते १५ फेब्रुवारी  १९४५ ह्या दरम्यान ड्रसडेनवर रात्री व दिवसा बाँव हल्ले करून ते शहर अक्षरशः उधवस्त करण्यात आले. ह्या हल्ल्यात शहरातील हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या व लाखो निरपराध नागरीक मरण पावले.  ड्रसडेन हे जर्मनीमधील सांस्कृतीक महत्व असलेले शहर होते. त्याला कोणतेही लष्करी महत्व नव्हते. तरीही त्यावर हल्ला करून तेथील नागरीकांना मरणाच्या खाईत लोटले गेले. ह्या हल्ल्यात वेगळ्या प्रकारच्या अतिशक्तीशाली बाँब्सचा (Firebombs) वापर करण्यात आला.  त्यामुळे शहरातील ३९ वर्ग किलोमीटर मध्यवर्ती भाग पूर्णपणे नष्ट झाला. ह्या हल्यामुळे ब्रिटीश बुध्दीवाद्यांच्या वर्तूळात सुघ्दा अस्वस्थता निर्माण झाली व त्याचे प्रतिसाद ब्रिटीश संसदेत उमटले. ब्रिटीश वृत्तपत्रांनी सुध्दा ह्या घटनेबध्दल सरकारला जाब विचारला. त्यानंतर तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल ह्यांनी त्यांना ह्या हल्ल्याची फारशी माहीती नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. वस्तुस्थिती अशी होती की चर्चिल स्वतः त्या हल्ल्याच्या नियोजनात सहभागी होते.
 ड्रसडेन ह्या शहराकरीता मर्ढेकरांनी रस्त्याची प्रतिमा वापरली असावी, कारण ऑटो बॉन रस्ते व इतर महत्वाचे रस्ते ड्रसडेन मधून जातात. ऑटो बॉन रस्त्यांचे जर्मनीत जाळे आहे व सर्व महत्वाची शहरे ह्या रस्त्यांनी जोडलेली आहेत. हे रस्ते हिटलरच्या काळात बांधण्यात आले . ह्या रस्त्यांचा उपयोग जलद मोटार वाहतुकीसाठी आहे. युरोपमधील अनेक देशांना जोडणारा ८००० किलोमीटर लांबीचा युरोपीयन रूट E – 40  ड्रसडेन मधूनच जातो. हे रस्ते उध्वस्त करणे हे ड्रसडेनवरील बाँबहल्ल्यांचे उद्दीष्ट होते.

                          उष्टया अन्नामध्ये थबकली
                     चोंच कोरडी बघ घारीची

कवितेतील ह्या ओळींचा रोख रशियाने ९ ऑगस्ट १९४५ ला  जपानव्याप्त मांचुरीयावर केलेल्या आक्रमणाकडे आहे. मांचुरीया हा पूर्वी चीनचा एक प्रांत होता. तो जपानने १९३१ मध्ये  कपटनीतीने वेगळा काढून तेथे जपानच्या प्रभावाखाली असलेले बाहुले सरकार आणले. नंतर तेथील नैसर्गिक साधनसामुग्रीवर डोळा ठेवुन अनेक जपानी लोकांना तेथे स्थलांतरीत होण्यासाठी जपान सरकारने उत्तेजन दिले. त्यानंतर तेथे जपानी लोकसंख्या बरीच वाढली व जपानी लोकांचा उद्योगधंदे व अर्थव्यवस्थेवरील प्रभाव वाढला. ह्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मदत झाली. एप्रिल १९४१ मध्ये रशियाने जपानशी अनाक्रमण करार केला होता. परंतु त्यानंतर रशियाच्या भुमिकेत बदल झाला. याल्टा येथे फेब्रुवारी १९४५ मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परीषदेत रशियन राष्ट्रप्रमुख स्टॅलिनने इतर दोस्त राष्ट्रांच्या नेत्यांना असे आश्वासन दिले की , जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतर तीन महीन्यानंतर रशिया जपानवर आक्रमण करेल. ९ ऑगस्ट १९४५ ला जर्मनीने शरणागती पत्करल्याला बरोब्बर तीन महीने होत होते. म्हणून रशियाने आक्रमणाकरीता हा मुहूर्त साधला. वास्तविकतः  जपानला रशियाबरोबर युध्द नको होते. ह्याउलट दोस्त राष्ट्रांबरोबर युध्द संपूष्टात आणून शांतता प्रस्थापित करण्या साठी रशियाने मध्यस्ती करावी असे जपानी नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्याबदल्यात जपानने रशियाला अनेक आकर्षक प्रादेशीक सवलती (Territorial Concessions) देउ केल्या होत्या. रशियाने एकीकडे ही बोलणी चालू ठेवत, युध्दाची तयारी केली होती. जपानला ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. ६ ऑगस्ट १९४५ ला जपानमधील हिरोशिमावर व ९ ऑगस्ट १९४५ ला नागासकीवर अमेरीकेने अणुबाँब टाकले. व त्याचवेळी ऱशियाने जपानशी विश्वासघाताने युध्द पुकारले. जपानला रशियाच्या आक्रमणाची गंधवार्तासुध्दा नव्हती.
ह्या घटनांचा कवितेतील ओळींशी काय संदर्भ आहे हे बघू. ह्यातील घारीची प्रतिमा रशियाकरीता वापरली असावी. रशियाच्या बोधचिन्हावर द्विमुखी गरुडाचे (Twin Headed Eagle) चित्र आहे. ह्या घटनेतील रशियाची वागणूक गरुडासारखी नसून घारीसारखी आहे. ह्या घारीची चोच कोरडी आहे कारण जपानशी रशियाच्या असलेल्या संबंधांची कोणतीही फिकीर न करता हे आक्रमण केले आहे. ह्या कोरडया चोचीचा रोख स्टॅलिनकडे सुध्दा असू शकतो. कारण स्टॅलिन हा भावनीकरीत्या अतिशय कोरडा माणूस होता. उष्टया अन्नाची प्रतिमा माचुरीयाकरीता वापरली असावी. कारण जपानी लोक मांचुरीयात उपरे होते. व त्यांचा मांचुरीयातील नैसर्गिक साधनसंपत्ती व कारखानदारीवर ताबा होता. रशियाचा या संपत्तीवर डोळा होता. ही साधनसंपत्ती म्हणजे उष्टे अन्न असावे. वास्तवीकतः मांचुरीया हा चीनचा भाग होता. त्याच्यावर ना जपानचा हक्क होता ना रशियाचा. रशियाकडे माचुरीयाचा ताबा काही वर्षे होता. नंतर तो चीनच्या ताब्यात गेला. अन्न व माचुरीयाचा दुसरा संबंध म्हणजे चीनमधल्या पाककलेमधील बरेच प्रकार माचुरीयात खाल्ला जाणाऱ्या मांचु डीशेस पासून आलेले आहेत.

                       ब्रेक लागला चाकांवरती,
                       श्वासहि तुटला आगगाडीचा;

वरील ओळी मांचुरीयातून जाणाऱ्या ट्रान्स सैबेरीयन रेल्वे जाळ्याच्या संदर्भात असाव्यात. ही रेल्वे लांबीने जगात मोठी असून ती अती पूर्व रशिया , मॉस्को , चीन , मंगोलिया, माचुरीया ह्या प्रदेशातील महत्वाच्या  शहरांना जोडते. ह्या रेल्वेचा मांचुरीयातील भाग १९०५ सालापासुन जपानच्या ताब्यात होता. जपान सरकारने ह्या रेल्वेच्या व्यवस्थापनाकरीता साउथ मांचुरीयन रेल्वे कंपनी स्थापन केली होते. ह्या रेल्वेचे रशिया व जपानव्याप्त मांचुरीयाच्या  सीमारेषेवरील चँगचुन नावाचे स्टेशन होते. येथे रेल्वेच्या गेजमध्ये बदल व्हायचा. रशियन व जपानी रेल्वे मार्गाच्या रूंदी (गेज) मध्ये फरक होता. त्यामुळे ह्या स्टेशन मध्ये रेल्वे काही तांत्रीक पध्दती अनुसरून एका गेजमधुन आलेल्या मालाचे व प्रवाशांची  दुसऱ्या गेजमधे वाहतूक केली जायची. ह्या पध्दतीला इंग्रजी मध्ये ब्रेक ऑफ गेज असे नाव आहे.  रशियाने ऑगस्ट १९४५ मध्ये मांचुरीयावर आक्रमण केल्यानंतर ह्या रेल्वेचा जपान्यांकडून ताबा घेतला. त्यानंतर ही रेल्वे कंपनी अमेरीकच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली. कारण जपानने अमेरीकेशी शरणागती पत्करली होती.

                                                       उन उसासा धरणीच्या अन्
                                                          उरांत अडला इथे मघाचा

वरील ओळीतील मघाचा हा शब्द आधीच्या कडव्यात आलेल्या (तिंबुनी झाली कणिक काळी) ड्रसडेन शहरावरील बाँबफेकीला अनुसरून वापरला आहे. उन उसासा धरणीचा ह्या शब्दांचा संदर्भ ह्या शहरावर टाकलेल्या वेगळ्या प्रकारच्या शक्तीशाली बाँब ( Firebombs)  व ह्या बाँबस् मुळे निर्माण होणाऱया आगीच्या वादळांशी (Firestorms) आहे.  ह्या आगीच्या वादळांमुळे तेथील तपमान १५०० सेंटीग्रेड पर्यंत गेले होते. ह्या वादळात तप्त झालेल्या हवेचा मध्यवर्ती स्तंभ उभा रहातो. त्या स्तंभामुळे जोराचे गरम वारे वाहू लागतात. हे वारे आगीला ऑक्सिजन वायुचा पुरवठा करतात. त्यामुळे आगीचा जोर वाढून तपमानात आणखी वाढ होते. ह्या आगीत हजारो माणसे आगीत होरपळून व घुसमटून मेली.
  
                    शिरेल तेव्हा शिरो बिचारें
                    हवेंत असल्या पाउस-पाते;
                    जगास तोंवर वैशाखाच्या
                    मृगाविनाही मृगजळ चढते.

वरील कडव्यांमधये  वर्णन केलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व परीस्थितीच्या हवेत जागतीक शांतता रूपी पाउस-पाते शिरेल तेव्हा शिरेल. ते पाउस पाते सुध्दा बिचारेच आहे. कारण बड्या राष्ट्रांना त्यांच्या व्याख्येप्रमाणे जागतीक शांतता हवी आहे. तेव्हा खरी जागतीक शातता प्रस्थापित होइल तेंव्हा होइल. तो पर्यंत लहान देश जागतीक शांततेच्या तत्वांच्या गुगीखाली रहातील. ही जागतीक शांतता मृगजळासारखी आहे.

Tuesday, December 18, 2012

मर्ढेकरांची कविता - बन बांबूचे पिवळ्या गाते



बन बांबूचे पिवळ्या गाते
  आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
  जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
  जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली
  नवी पाउले, पण मेलेली
शतशतकांच्या पायलन्स वरती
  किती कावळे टिंबे देती
उभा जागृती क्रियापदांचा
 खडा पहारा, पण रोबोंचा
अढळ धृवाचा ढळला तारा
 सप्तर्षींचा चुकला प्रश्न
गारठल्यावीण गळती गारा
 अन् रेडिओवर राधेकृष्ण
 
               बा.सी. मर्ढेकर

मर्ढेकरांची ह्या कवितेला  दुसऱ्या महायुध्दाची पार्श्वभूमी आहे. ह्या कवितेत सम्राट,  सेनापती, शास्त्रज्ञ आहेत. फसलेले कट आहेत. आणखी बरेच काही आहे. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूचे बन कसले आहे ? ते कोठे आहे? ते  का गात आहे? आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे ?  कवितेतील ह्या ओळींवरून आपला असा समज होतो की ही कविता निसर्गवर्णनपर आहे. परंतु जरी आपल्याला असे वाटले तरी ही कवितेचा अर्थ जर त्या काळातील (दुसऱ्या महायुध्दाच्या) संदर्भांवरून लावायचा झाला, तर तो खूपच वेगळा आहे. मर्ढेकरानीच असे म्हणले आहे की
शब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण भूमिकेचा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही. 
 ह्या कवितेत शब्दापलीकडले बरेच काही आहे. किंबहुना सर्वच काही शब्दा पलीकडले आहे. कारण केवळ कवितेतील शब्दांचा अर्थ पाहीला तर फारसा अर्थबोध होत नाही. त्यात मर्ढेकरांनी अशा काही प्रतिमा वापरलेल्या आहेत की संदर्भ माहीत असल्याशीवाय त्यांचे आकलन होणेच शक्य नाही. ही कविता समजण्याकरीता दुसऱे महायुध्द समाप्तीचा काळ, त्या काळातील घटना, आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरेची माहीती पाहीजे.
हया घटना १९४३ ते १९४५ सालातल्या आहेत. दुसऱया महायुध्दात दोस्त राष्ट्रांची निर्णायक विजयाक़डे वाटचाल चालू होती. जर्मनीचा संपूर्ण पाडाव दृष्टीपथात आला होता. जर्मन सैन्याचा रशिया व आफ्रीकेत मोठी पिछेहाट होत होती. दोन्ही आघाड्यांवरील सेनापतींच्या लक्ष्यात आले होते की पराभव अटळ आहे. त्यांनी सैन्य वाचविण्याकरीता माघार घेण्याची परवानगी मागीतली होती. परंतु हिटलरने ती दिली नाही. उलट त्याने सेनापतींना अशी आज्ञा दिली की लढता लढता मरण पत्करा पण माघार घेउ नका. रशियातील हिवाळ्यातील  हाडे फोडणारी थंडी, अन्न व ईतर रसदीची टंचाई ,रशियन सैन्याचे वारंवार होणारे हल्ले अशा परीस्थितीमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. रशियन सेनांनीनी जर्मन सैन्यास रशियनांसमोर शरणागती पत्करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्याची शिफारस जर्मन सेनांनीनी हिटलरकडे केली होती. परंतु   केवळ हिटलरच्या युध्द चालू ठेवण्याच्या हट्टापायी लाखो सैनिकांना मरण पत्करावे लागले. जे वाचले ते रशियाचे युध्दकैदी झाले. त्यांना सैबेरीयात पाठविण्यात आले. जर्मन जनतेत व सेनाधिकाऱ्यांमध्ये हिटलरबध्दल असंतोष पसरला. त्याची परीणीती हिटलरला मारण्याच्या कटात झाली. परंतु तो कट फसला.  त्यानंतर काही महीन्यातच दोस्त राष्ट्रांच्या सेना बर्लिनच्या सीमेपर्यंत येउन ठेपल्यानंतर हिटलरने आत्महत्या केली व  जर्मनीने शरणागती पत्करली. परंतु जपानने युध्द चालूच ठेवले होते. जपानने शरणागती पत्करावी असा प्रस्ताव दोस्त राष्ट्रांनी जपानसमोर ठेवला होता. परंतु जपानने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरीकेने जपानमधील हिरोशिमा व नागासकी ह्या शहरांवर अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली.  ह्या कवितेतील पिवळ्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानशी आहे. आता प्रत्यक्ष कवितेकडे वळुया.

       बन बांबूचे पिवळ्या गाते
          आकाशातील अघोरेखिते
 
 
जपानच्या लोकजीवनात बांबूला असाधारण महत्व आहे. घरबांधणीपासून ते अनेक नित्योपयोगी वस्तु बनवण्याकरीता बांबूचा उपयोग केला जातो. दहाव्या शतकात लिहीलेली पहिली ज्ञात जपानी लोककथा बांबू तोडणाऱ्या माणसावर आहे. बांबूला जपानमध्ये दैवी महत्व आहे. तेथील प्राचीन  शिंटो धर्माच्या अनेक देवळांभोवती बांबूची बने आहेत. ही बने देवळांना दृष्ट शक्तीपासून दूर ठेवतात असा समज आहे. तसेच बुध्द मंदिरांच्या भोवती ही बांबूची बने आहेत. जपान मधील क्योटो ह्या शहराच्या परीसरात सुमारे २००० प्राचीन शिंटो व बुध्द मंदिरे आहेत. तसेच जपानच्या सम्राटाचे राजवाडे आहेत. पू्र्वी क्योटो ही जपानची राजधानी होती व जपानच्या सम्राटाचे अनेक शतकांचे निवासस्थान होते. अजूनही हे शहर जपानची सांस्कृतीक राजधानी समजले जाते. दुसऱ्या महायुध्दात सुध्दा ह्या शहराचे धार्मिक व सांस्कृतीक महत्व लक्षात घेउन अमेरीकन विमानांनी कधीही बाँबफेक केली नाही. ह्या शहराच्या जवळ सॅगॅनो या नावाचे बांबूचे बन आहे.(SAGANO BAMBOO FOREST)  ह्या बनातून येणाऱ्या वाऱ्याचा आवाजाची गणना जपानमधील सर्वोत्कृष्ट आवाजात होते. १८७० मध्ये वि़जेचा बल्ब मधील तंतूकरीता याच बनातील बांबूपासून बनविलेला तंतूचा वापर केला होता. हे सर्व लक्ष्यात घेता मर्ढेकरांनी जपानकरीता बांबूच्या बनाची प्रतिमा वापरली असावी. ह्या बनाच्या पिवळेपणाचा संबंध जपानी लोकांच्या पीतवर्णाशी असावा. तसेच ह्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानच्या सम्राटाशी पण आहे. हे समजण्याकरीता  कवितेतील पुढील ओळीतील अवकाशातील अधोरेखीते चा अर्थ काय  आहे, हे पाहिले पाहिजे.
दुसऱ्या महायुध्दात जपानवर  अमेरीकेने  टाकलेल्या अणुबाँबने केलेल्या भीषण मनुष्य संहाराचा परीणाम होउन, आणखी हानी टाळण्या साठी जपान शरण येण्यास तयार झाला. तेव्हा जपानचे सम्राट हीरोहीटो ह्यांचे  जपानी जनतेला उद्देशून भाषण , १५ ऑगस्ट, १९४५ ला  रेडीओ जपानने प्रसारीत केले. हे  भाषण इंपेरीयल रीस्क्रीप्ट ऑन सरेंडर अशा नावाने प्रसिध्द आहे. अवकाशातील अधोरेखीत म्हणजे हे भाषण असावे. अधोरेखीत हा शब्द रीस्क्रीप्ट या इंग्रजी शब्दाच्या अनुषंगाने वापरला असावा.  रीस्क्रीप्ट ह्या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ राजाने (रोमन सम्राटाने) किंवा पोपने एखादा प्रश्न औपचारीकरीत्या त्याच्याक़डे गेला असता, त्याने दिलेले उत्तर असा होतो. तर दुसरा अर्थ पुनर्लिखीत (Rewritten) असा होतो.   हे अधोरेखीत आकाशातील का आहे कारण ते जपानी रेडीओवरून म्हणजेच आकाशवाणीवरून प्रसारीत झाले होते. Gyokuon-hōsō, lit. "Jewel Voice Broadcast", was the radio broadcast in which Japanese emperor Hirohito read out the Imperial Rescript on the Termination of the War. ह्याला जपानी भाषेत ग्योकौन होसो असा शब्द आहे, त्याचा अर्थ अलंकारीक आवाजातील रेडीओ प्रसारण   असा होतो. कवितेतील गाते हया शब्दाचा संदर्भ ज्वेल व्हॉईस अथवा  अलंकारीक आवाज ह्या कल्पनेशी आहे. ह्या रेडीओ प्रसारणात जपानच्या सम्राटाने  युध्द संपले असे जाहीर केले. जपानच्या सम्राटाचा आवाज जपानी जनतेने प्रथमच ऐकला. कारण जपानच्या सम्राटाने थेट लोकांशी बोलण्याची पध्दत तेथे नाही. हे भाषण सुध्दा थेट भाषण नव्हते. जपान रेडीओच्या अघिकाऱ्यांनी सम्राटाच्या टोकिओतील राजप्रासादात जाऊन , ते भाषण दोन दिवस आधीच ध्वनीमुद्रीत केले होते.  ह्या भाषणाची ध्वनीमुद्रीका ( डीस्क) मोठया शिताफीने कपडयात लपवून राजप्रसादाच्या बाहेर काढण्यात आली. कारण राजप्रासाद जपानी बंडखोर सैनिकांच्या ताब्यात होता. जपानी सेनांनीना जपानने शरणागती पत्करावी हे  मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने शरणागती हा जपानच्या राष्ट्राभिमानाचा अवमान होता. त्या सर्वांची लढता लढता मरण पत्करण्याची तयारी होती. ह्या भूमिकेतून त्यांनी सम्राटाच्या विरोधात बंड करून त्याला ताब्यात घेतले होते व त्याला शरणागतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालला होता. पण तो यशस्वी होउ शकला नाही. युध्द संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायालयात अनेक जपानी सेनांनीना युध्द गुन्हेगार ठरवून फासावर लटकवण्यात आले. अनेकांनी शत्रुच्या हातात सापडण्याआधीच हाराकीरी केली.  परंतु जपानच्या सम्राटावर खटला भरण्याचे हेतूपुरस्पर टाळण्यात आले. कारण जपानी जनतेत सम्राटाविषयी असलेला आदर.

             चराचरातील दळते संज्ञा
          जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
जपानी रे़डीओवरचे सम्राटाचे हे भाषण जुनाट राजदरबारी जपानी भाषेत होते. त्यात प्रत्यक्ष शरणागती स्वीकारल्याचा उल्लेख नव्हता. त्याने जपान सरकारला दोस्त राष्ट्रांच्या अटी स्वीकारण्याची आज्ञा केल्याचे सांगितले.. ह्या भाषणाची भाषा औपचारीक व संदीग्ध  होती. त्यामुळे ऐकणारांच्या मनात जपानने खरोखर शरणागती पत्करली की नाही ह्याबध्दल संदेह निर्माण झाला.    युध्दाबध्दलचा उल्लेख, युध्द परीस्थितीने जपानला फायदेशीर असे वळण घेतले नाही, असा करण्यात आला.  तसेच हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता .त्यात असे म्हणले होते की शत्रुने नवीन विध्वंसक बाँबचा वापर चालू केला आहे. ह्या बाँबची हानी करण्याची क्षमता अपरीमित आहे व त्यामुळे लाखो निरपराध माणसांचा बळी जाण्याची शक्यता आहे. भाषणातील ह्या शब्दांचा संदर्भ हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबच्या घटनेशी लावण्यात येतो. ह्या भाषणाच्या समारोपाच्या वाक्यात असे म्हटले आहे की   कालाच्या आणी नियतीच्या आज्ञेप्रमाणे आम्ही येणाऱ्या पिढ्यांकरीता सर्वंकश शांतीच्या मार्गाचा पाया रचण्याचा निर्धार केला आहे . आम्ही ह्याकरीता जी हानी व जे कष्ट सहन केले आहेत, ते कोणाच्याही सहनशीलतेच्या पलीकडचे आहेत 
कवितेतील चराचरातील दळते संज्ञा ही ओळ ह्या भाषणातील वापर केलेल्या भाषेला उद्देशून आहे. संज्ञा म्हणजे शब्द. चराचरातील म्हणते अखिल विश्वातील. ह्या भाषणाचे दळण दळण्यासाठी अख्ख्या दुनियेतून शब्द गोळा केले आहेत तरी सुध्दा भाषणाचा अर्थ संदीग्धच आहे. ह्या भाषणात असेही म्हटले होते की जर युघ्द चालू ठेवले तर केवळ जपानच्या नाशाबरोबरच संपूर्ण मानव जातीचा नाश होइल. म्हणून जपानच्या कोट्यावधी प्रजाजनांचे प्राण वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कवितेतील जगण्याची प्रतिज्ञा ह्या शब्दांचा अर्थ असा असावा. पण (उद्या ) हे शब्द सूचक आहेत. उद्या हा शब्द कंसात सहेतुक टाकला आहे.   ह्या शब्दांनी या ओळीचा अर्थ  वेगळाच होतो. जगायची तर प्रतिज्ञा केली आहे पण आज नाही. आज न जगता उद्या कसे जगता येईल ?  ह्याचे उत्तर ,अनेक जपानी सैनिक, सेनाधिकारी, व नागरीकांनी शरणागती पत्करण्यापेक्षा हाराकीरीच्या मार्गाने सन्मानाने मरणाला जवळ केले, ह्या घटनेत आहे. हाराकीरी ह्या जपानमधील आत्महत्त्येच्या प्रकाराला हजारो वर्षांची परंपरा आहे. जपानमधील सामुराई योध्दे पुरातन कालापासून  आत्मसन्मान राखण्या करीता ह्या प्रकारानी विधीवत आत्महत्त्या करत. ह्या प्रकाराला जपानी भाषेत सेप्पुकू असेही नाव आहे. अशा  आत्महत्त्येपूर्वी ती करणाऱ्या माणसाने कविता लिहून ठेवण्याची पध्दत आहे. ह्या कवितेला मरणपूर्व कविता (isei no ku) म्हणतात. ह्या कवितेत मरणाचा थेट उल्लेख न करता प्रतीकरूपी उल्लेख करण्याची पध्दत आहे. अशा अनेक कविता हाराकीरी करण्याऱ्या सैनिकांच्या खिशात सापडल्या होत्या. जपानचा जनरल टो़जो हा जपानने अमेरीकेच्या पर्ल हार्बर बंदरावर अचानक केलेल्या  हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार होता. ह्या जनरल टोजोचा हाराकीरी करण्याचा प्रयत्न फसला. त्याला  न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अमेरीकन सेनाधिकाऱ्यांना उद्देशून त्याने काढलेले  उदगार  असे आहेत.  तुम्ही आज जिंकला आहात आणि म्हणून युध्दाला जबाबदार कोण हे ठरवणे तुमच्या हातात आहे  परंतु चारपाचशे वर्षांनी इतिहासकारांचा निर्णय कदाचित वेगळा असेल . फाशी जाण्यापूर्वी त्याने खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिहून ठेवल्या आहेत.

        “ It is goodbye
Over the mountains I go today
   To the bosom of Buddha
     So, happy I am,



लिंब कोरतो सांबरशिंगी
  जुनी भाकीते नपुसकलिंगी

ह्या कडव्यातील लिंब म्हणजे जर्मन सेनानी फिल्डमार्शल विलहेल्म रीटर व्हॉन लीब. ह्याने पहील्या महायुध्दात भाग घेतला होता. हा नाझी पक्षाचा विरोधक असल्यामुळे हिटलर त्याच्यावर नाराज होता. त्यामुळे १९३८ साली त्याला बढती देउन त्याला हिटलरने निवृत्त केले. परंतु १९३९ साली त्याला परत बोलावण्यात येउन, सैन्याचा मोठा विभाग त्याच्या अधिपत्त्याखाली देण्यात आला. जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी बेल्जीयम सारख्या लहान देशाच्या भूमीचा वापर करण्यास उघडपणे विरोध करणारा तो एकमेव जर्मन सेनानी होता. त्याने असा ईशारा दिला होता की जर जर्मनीने कोणाच्याही बाजूने नसणाऱ्या तटस्थ बेल्जीयमवर हल्ला केला, तर सर्व जग जर्मनीच्या विरोधात जाइल. कारण बेल्जीयमच्या तटस्थ भूमिकेचा मान राखण्याची व त्या देशाचे संरक्षण करण्याची ग्वाही जर्मन सरकारने काही आठवड्यापूर्वीच दिली होती. त्यानंतर जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या चढाईत लीबने फ्रान्सची प्रसिध्द मॅजीनो तटबंदी भेदण्याची कामगिरी बजावली. ह्या कामगिरी बध्दल हिटलरने लीबला फिल्डमार्शल च्या पदावर बढती दिली व त्याला जर्मन सैन्यातील नाईट्स क्रॉस ऑफ द आयर्न क्रॉस हे मानाचे पदक देउन त्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर त्याने रशियातील आघाडीवर महत्वाची भूमिका बजावली. लीब हा जुन्या पठडीतील सेनानी असल्यामुळे हिटलरच्या अनेक व्युहात्मक योजना त्याला मान्य नसत. त्यामुळे १९४२ मध्ये लीबने हिटलरला, त्याला सेवामुक्त करण्याची विनंती केली व हिटलरनी ती मान्य केली. लीबची नाझी राजवटीबध्दलची भूमिका नेहमीच अनिश्चित होती. तो हिटलर व त्याच्या पाठीराख्यां बध्दल उघडपणे अपमानास्पद भाषा वापरायचा. पण त्याने नाझी पक्षाला त्याच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर २० जुलै १९४४ ला हिटलरला मारण्याचा कट फसल्यानंतर त्याने हिटलरवर निष्ठा व्यक्त केली होती. हे कृत्य त्याने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्याकरीता केले असावे असे मानले जाते. युध्द संपल्यानंतर न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने लीबला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली.
कवितेतील जुनी भाकिते म्हणजे लीबने केलेले, सर्व जग जर्मनीविरूध्द जाईल हे  भाकीत आहे .ही भाकीते सांबरशिंगी आहेत. सांबर जेव्हा जंगली श्वापदाच्या किंवा  शिकाऱ्याच्या पाठलागापासून बचावासाठी जंगलातून पळू लागते, तेव्हा त्याची  मोठी शिंगे झाडात अडकल्यामुळे त्याला पुढे पळता येत नाही. ते अलगद जंगली श्वापदाच्या भक्षस्थानी पडते. त्याप्रमाणे लीबने केलेली ही भाकीते त्याला न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयात त्याला  युध्दगुन्हेगार शाबीत करण्याकरीता वापरण्यात आली. हा खटला जर्मन हाय कमांड ट्रायल ह्या नावाने प्रसिध्द आहे. ह्या खटल्याचे कामकाजात लष्करी न्यायालयाच्या एका सदस्याने लीबला असे विचारले की, हिटलरने तुमचा तुमच्या मनाविरूध्द वापर केला. हिटलरला तुम्ही युघ्दापासून परावृत्त का केले नाही ? त्यावेळी  जर्मनीतील लष्करी नेतृत्व पौरूषहीन ( impotent)  झाले होते का ?    (Von Leeb was asked by a member of the Tribunal why it was that this leadership was impotent and helpless against Hitler)  कवितेतील  भाकीतांकरीता नपुसकलिंगी हे विशेषण वरील संदर्भास अनुसरून वापरले असावे.


ज्या वाऱ्यातून त्यात उमटली
  नवी पाउले, पण मेलेली

हिटलरच्या युध्दविषयक धोरणाच्या  विरोधात अनेक जर्मन सेनानी होते, परंतु हिटलरच्या लोकप्रियतेमुळे ते फारसे काही करू शकत नव्हते. लीबच्या भाकीतात हिटलरची हत्त्या करण्याच्या कटाची बीजे रोवली गेली. १९४३ च्या मध्यावर, युध्दाचे पारडे निर्णायकपणे जर्मनीच्या पराभवाकडे झुकू लागले होते. जर्मन सेनानी आणि त्यांचे  साथीदार यांच्या असे लक्षात आले की जर्मनीला वाचवायचे असेल तर हिटलरला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सर्व कटवाले सक्रीय झाले व त्यांनी हिटलरला मारण्याचा कट रचला. हिटलरला मारल्यानंतर पुढील लष्करी व राजकीय व्यवस्था कशी लावायची, ह्याची विस्तृत योजना आखण्यात आली.  आधीची जी योजना होती त्यात बरेच बदल करून, नवीन योजना आखण्यात आली. ह्या योजनेला ऑपरेशन वाल्केरी (Valkyrie) असे नाव होते. कवितेतील नवी पावले म्हणजे ही नवीन योजना. ही पावले मेलेली का आहेत ? कारण हिटलरची हत्त्या करण्याचा कट फसला. त्यामुळे ही योजना कार्यान्वीत होउ शकली नाही. २० जुलै, १९४४ ला हिटलरच्या बंकरमधील कार्यालयात बाँबस्फोट घडवून आणून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कटवाल्यांनी केला.. परंतु हिटलर केवळ जखमी झाल्यामुळे हा कट अयशस्वी झाला. ह्या प्रसंगावर आधारीत वाल्केरी हा इंग्रजी चित्रपट नुकताच येउन गेला.

   शतशतकांच्या पायलन्स वरती
     किती कावळे टिंबे देती

पायलन्स (Pylon) ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कवितेतील पायलन्स ह्या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत आहे. ह्या शब्दाचा अर्थ ईजिप्तमधील देवळाचे स्मारकासारखे प्रवेशद्वार असा होतो. ईजिप्तच्या वास्तुकलेत हे पायलन्स प्राचीन  ईजिप्शियन संस्कृती , पंथ  यांचे प्रतीक म्हणून वापरले गेले. ह्या पायलन्स वर ईजिप्तच्या राजाची अधिकार दर्शवणारी चित्रे काढलेली असत. कवितेतील शतशतकांचा अर्थ प्राचीन असा असावा. शतशतकांचा म्हणजे शंभर शतकांचा. ईजिप्तची संस्कृती ही ख्रिस्तपूर्व काळातील असून ती हजारो वर्षापूर्वीची आहे. कवितेतील कावळे ह्या शब्दाचा संदर्भ दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ईजिप्तच्या भूमीवर झालेल्या लढायांशी आहे. तेव्हा ईजिप्तमध्ये अनेक देशांची सैन्ये लढत होती.  ईजिप्त हा देश पू्र्वी ब्रिटीशांच्या अंकीत होता. स्वतंत्र झाल्यानंतर सुध्दा सुएझ कालव्याच्या रक्षणाकरीता ब्रिटीश सैन्य तेथे होते. सुएझ कालव्यावर ताबा मिळवण्यासाठी इटलीने इजिप्तवर चढाई केली. इटालियन सैन्याच्या मदतीसाठी जर्मन सैन्य तेथे गेले. इजिप्तमधील अल् अलामेन येथे दोस्त राष्ट्रे व जर्मनी मित्र राष्ट्रे ह्याच्यात दोन ईतिहासप्रसिध्द लढाया झाल्या. ह्या लढाईत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फ्रान्स, अमेरीका, ग्रीस, पोलंड, भारत वगैरे देशाची सैन्ये होती. तर विरूध्द बाजूस जर्मनी व इटलीचे सैन्य होते. कवितेतील कावळे म्हणजे हे  देश व त्यांची सैन्ये आहेत. ह्या देशांना इजिप्तच्या लोकांशी व तेथील प्राचीन संस्कृतीशी काही एक देणे घेणे नाही. हे इजिप्तमध्ये कावळ्यांसारखे  उपरे आहेत. टिंबे टाकती म्हणजे ह्याच्या युध्दात इजिप्तच्या साधनसंपत्तीचा नाश होत आहे आणि सामान्य इजिप्शियन जनतेचे हाल होत आहेत. सध्या अल अलामेनमध्ये जर्मन, इटालियन सैनिकांच्या वॉर सिमेट्री बरोबरच कॉमनवेल्थ देशातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशांच्या सैनिकांच्या पण वॉर सिमेट्री आहेत. एकमेकांविरूध्द लढून मरण पत्करलेल्या सैनिकांनी ह्या युघ्द स्मारकात चिरनिद्रा त्याच उपऱ्या भूमीवर घेतली आहे .
       
      उभा जागृती क्रियापदांचा
               खडा पहारा, पण रोबोंचा

ह्या ओळीतील क्रियापद ह्या शब्दाचा अर्थ व्याकरणातील क्रियापद असा नसून हा शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाने वापरला आहे. इंग्रजी मध्ये व्हर्बोटेन ( Verboten ) असा शब्द आहे. त्याचा एक अर्थ प्रतिबंध करणे (Forbidden)  असा आहे . हा शब्द जर्मन भाषेतून आलेला आहे. हा शब्द बोलण्यात वापरताना नाझी जर्मनीच्या  एकछत्री अंमलाचा निर्देश करण्याकरीता वापरला जातो. व्हर्बोटेन मधील व्हर्ब हा शब्द इंग्रजी भाषेत आहे व त्याचा अर्थ क्रियापद असा आहे. ह्या कडव्यातील क्रियापद म्हणजे हिटलरने जनरल रोमेलला पाठविलेली कुप्रसिध्द  आज्ञा आहे. जनरल रोमेल हा गाजलेला जर्मन सेनानी आफ्रीका कॉर्पस ह्या जर्मन सैन्य विभागाचा प्रमुख होता. तो डेझर्ट फॉक्स ( वाळवंटातील कोल्हा) या नावाने प्रसिध्द होता कारण त्याच्या रणनीतीमुळे जर्मन सैन्याला आफ्रीकेत विजय मिळाला होता. अल अलामेनच्या दुसऱ्या लढाईत विजयाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागले होते. ब्रिटीश जनरल मॉंटगोमरी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा प्रमुख सेनापती होता. दोस्त राष्ट्रांच्या सतत चाललेल्या रणगाड्यांच्या व विमान हल्लयांमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. दोस्त राष्ट्रांकडे जर्मन सैन्याच्या तिप्पट सैन्य होते. रणगाडे, तोफा व इतर सामुग्रीच्या बाबतीत सुध्दा दोस्तांचे सैन्य वरचढ होते.  रोमेलसारख्या कसलेल्या सेनापतीच्या लक्षात आले की आता पराभव अटळ आहे. त्याने हिटलरला या सर्व गोष्टींची कल्पना दिली व सैन्य वाचवण्याकरीता माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगीतले. तेव्हा हिटलरने रोमेलला ती कुप्रसिध्द आज्ञा पाठवली. त्या आज्ञेत असे लिहीले होते की माघार घेण्यास बंदी आहे. तुमच्या समोर विजय किंवा मरण हे दोनच पर्याय आहेत. ( Retreat is forbidden. “ Victory or Death”) . पराभव व सैन्याचा विनाश डोळ्यासमोर दिसत असतानाही रोमेलने हिटलरची आज्ञा पाळण्यासाठी लढाईची तयारी सुरू केली उभा जागृती क्रियापदांचा हे कवितेतील शब्द रोमेलला उद्देशून आहेत. जागृती म्हणजे जागणारा . क्रियापद म्हणजे हिटलरची आज्ञा . रोमेल हिटलरच्या आज्ञेला किंवा हुकूमाला.जागून युध्दास उभा राहीला. रोमेल क़डे सैन्य कमी असल्यामुळे, दोस्त सैन्याला रोखण्याकरीता त्याने वेगळा उपाय योजला. त्याच्या सैन्याने त्या प्रदेशात भुसुरूंग (landmines) पेरून ठेवले व काटेरी ताराची कुंपणे घातली. लढाईपूर्वी  तीस लाखांच्यावर भुसुरूंग ह्या भागात पेरण्याच आले. रोमेलने ह्या भागाचे नाव डेव्हील्स गार्डन असे ठेवले होते. खडा पहारा पण रोबोंचा ह्या ओळीचा संदर्भ रोमेलच्या ह्या कृतीशी असावा. रोबो म्हणजे यंत्रमानव. भुसुरूंगांना रोबोची उपमा दिली आहे. हे भुसुरूंग ओला़डून येणे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला व रणगाड्यांना अवघड पडत होते.  खडा पहारा करत होते म्हणजे भुसुरूंग २४ तास कार्यरत होते. सैनिकांना झोप वगैरे असते तशी या भुसुरूंगाना नसते, म्हणून त्यांना ख़डा पहारा करणाऱ्या रोबोंची ऊपमा दिली आहे. हे भुसुरूंग आजही अल अलामेनच्या प्रदेशात जमीनीखाली पेरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे हा भाग निर्मनुष्य आहे. चुकून ह्या भागात गेल्यामुळे अनेक सामान्य नागरीकांवर प्राण गमावण्याची पाळी आली आहे.

अढळ धृवाचा ढळला तारा
       सप्तर्षींचा चुकला प्रश्न

यातील अढळ धृव म्हणजे जपान आहे. दुसऱ्या महायुध्दात जपान शेवटपर्यंत शरण येत नव्हता. तो त्याच्या शरणागती न पत्करण्याच्या निर्णयापासून ढळला नव्हता. अखेर अमेरीकेने अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली व त्याच्या अढळ अशा निर्णयापासून तो ढळला. हे सप्तर्षी कोण आहेत ?  हे सात अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. अमेरीकेने अणुबाँबचा युध्दात उपयोग करण्यापूर्वी, जपानविरूध्द शरण आणण्याकरीता, अणु़बाँबच्या उपयोग करावा की नाही हे ठरवण्यासाठी  सात शास्त्रज्ञांची समिती जेम्स फ्रँक या  अणु शास्त्रज्ञाच्या अध्यक्षते खाली, नेमली होती. ह्या समितीने अणुबाँबचा उपयोग करू नये असा असा सल्ला दिला. ह्या समितीने असा सल्ला दिला होता की अणुबाँबचा स्फोट एखाद्या वैराण वाळवंटात सर्व देशांच्या प्रतिनीधीँसमोर घडवून आणून त्याची विनाशाची  क्षमता सर्व देशांना पटवून द्यावी. समितीचे असे म्हणणे होते की अणुबाँब तयार करण्याच्या कृतीचे गुपीत अमेरीका सर्व काळ, त्यांच्याकडे ठेवू शकणार नाही व यातून आतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागेल. ही स्पर्धा जगाला विनाशाकडे नेईल. अमेरीकेने जर अणुबाँबचा प्रथम जपानविरूध्द उपयोग केला तर अमेरीकेला जगातील सर्व लोकांचा विश्वास गमवावा लागेल. ह्या समितीचा सल्ला धुडकावून लावून अमेरीकेने जपानमधील हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब टाकलेच.
गारठल्यावीण गळती गारा
        अन् रेडिओवर राधेकृष्ण
गारा पाउस चालू असताना हवेतील थंडपणामुळे म्हणजेच गारठल्यावर गळतात. मग ह्या गारठल्या शिवाय गळणाऱ्या गारा कोणत्या आहेत ?  ह्या गारा अणुबाँबच्या स्फोटानंतर प़डणाऱ्या पावसाबरोबर पडणाऱ्या गारा आहेत. हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब पडल्यावर काही वेळातच तेथे काळा पाउस पडला. ह्या पावसाचे थेंब काळ्या रंगाचे होते. ते जड होते व त्याचा शरीराला मार लागत होता. त्या थेंबात राख होती व धूर होता. ह्या पावसात घातक किरणोत्सर्गी द्रव्ये होती. ह्या अणुबाँब मुळे ही दोन्ही शहरे बेचिराख झाली आणी तेथील लाखो निरपराध माणसे मरण पावली.
हे अणुबाँब टाकल्यानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी, अमेरीकन अध्यक्ष हॅरी ट्रूमन (Harry Truman) यांनी अमेरीकन जनतेला उद्देशून रेडीओवरून भाषण केले. त्यांनी या भाषणात अमेरीकेने जपानवर अणुबाँब टाकल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले व हा निर्णय घेण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट केली. ह्या भाषणात शेवटी हे नवीन अस्त्र शत्रुंच्या हातात न देता अमेरीकेच्या हातात देण्याबध्दल देवाचे आभार मानले. त्यांनी देवाची अशी प्रार्थना केली की हे अस्त्र देव कार्याकरीता, योग्य मार्गाने वापरण्याबध्दल त्याने अमेरीकेला मार्गदर्शन करावे.  (We thank God that it has come to us, instead of to our enemies; and we pray that He may guide us to use it in His ways and for His purposes.)
रे़डिओवर राधेकृष्ण हे कवितेतील शब्द ह्या भाषणाच्या संदर्भात आहेत. एकीक़डे अणुबाँबच्या भीषण परीणामांची पूर्ण कल्पना असताना अणुबाँब चा वापर करून लाखो निरपराध जपानी नागरीकांची हत्त्या घडवून आणायची आणि दूसरीकडे रेडीओवर देवाचे नाव घ्यायचे, असा हा विरोधाभास कवितेतील ह्या ओळीत दाखविला आहे.