अभ्रांच्या
ये कुंद अफूने
पानांना ह्या हिरवी गुंगी;
वैशाखातिल फांदीवरती
आषाढातील गाजर पुंगी.
मिटून
बसली पंख पाखरे,
पर्युत्सुक
नच पीसही फुलते;
मूक गरोदर गायीची अन्
गळ्यांतली पण घंटा
झुरते.
तिंबुनी
झाली कणिक काळी
मऊ
मोकळी ह्या रस्त्याची;
उष्टया अन्नामध्ये थबकली
चोंच कोरडी बघ घारीची.
ब्रेक
लागला चाकांवरती,
श्वासहि
तुटला आगगाडीचा;
उन उसासा धरणीच्या अन्
उरांत अडला इथे मघाचा.
शिरेल
तेव्हा शिरो बिचारें
हवेंत
असल्या पाउस-पाते;
जगास
तोंवर वैशाखाच्या
मृगाविनाही
मृगजळ चढते.
बा.सी.
मर्ढेकर
ह्या कवितेतील अभ्र , कुंद , पाने,
पाखरे , गायीच्या गळ्यातील घंटा , पाउस-पाते वगैरे शब्दांमुळे ही कवितेत एखाद्या
खेड्यातील निसर्गाचे वर्णन असावे असे वाटते. परंतु ह्या कवितेला दुसरे
महायुध्दकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे
संदर्भ आहेत. दुसरे महायुध्द संपत आले असताना अमेरीकेने पुढाकार घेउन कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिस्को
येथे संयुक्त राष्ट्र महासंघाची स्थापना करण्याकरीता जगातील सर्व देशांची परीषद
बोलाविली होती. त्यात अमेरीका, रशिया, ब्रिटन व चीन हे प्रायोजक देश होते. त्यांचे
प्रतिनिधी व ४६ आमंत्रीत देशांचे प्रतिनिधी ह्या परीषदेला उपस्थित होते. जगातील ८०
टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व हे निमंत्रीत करीत होते. ह्या परीषदेचे उद्दीष्ट
असे होते की एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापना करणे , की जी जागतीक शांतीता
प्रस्थापित करण्यास मदत करेल. हे सर्व निमंत्रीत सॅनफ्रॅन्सिस्कोतील गोल्डन गेट सिटी मध्ये जमले
होते. ही परीषद २५ एप्रिल १९४२ रोजी सुरु झाली. ह्या परीषदेवर पाच बडया राष्ट्रांचा
प्रभाव होता. ह्या बडया राष्ट्रांना सुरक्षा परीषदेत नकाराधिकाराचा हक्क हवा होता.
बऱ्याच लहान राष्ट्रांना हे मान्य नव्हते. अखेर ह्या नकाराधीकारावर खूप चर्चा व वादविवाद झाले. अखेर
नकाराधिकारावरची थोडीफार बंधने बडया राष्ट्रांनी मान्य केली व एकमत होउन
युनायटेड नेशन्स चार्टरला सर्व राष्ट्रांनी मान्यता दिली. व ही परीषद २६ जून १९४५
रोजी संपली.
कवितेतील “ अभ्रांच्या ये कुंद अफूने “ ह्या ओळींना सॅनफ्रॅन्सिस्कोतील एप्रिल महीन्यात
असलेल्या हवामानाचा संदर्भ आहे. तेथील हवामान नेहमीच म्हणजेच उन्हाळ्यात सुघ्दा
थंड व आल्हाददायक असते. नोव्हेंबर ते एप्रिल तेथे पाउस असतो. समुद्रावरील धुके हे
सॅनफ्रॅन्सिस्कोच्या हवामानाचे वैशिष्ठ्य आहे. हे धुके उन्हाळ्यात नेहमीच असते. ही
परीषद एप्रिल महीन्यातच चालू झाली होती. त्यावेळचे वातावरण धुक्यामुळे कुंद असे
असावे.
अफू व सॅनफ्रॅन्सिस्को ह्याचे नाते खूपच जुने
आहे. गोल्ड रशच्या काळात म्हणजेच १८५० च्या सुमारास चिनी लोक सुघ्दा सोन्याच्या
शोधाकरीता कॅलिफोर्नियामध्ये आले. चिनी लोकांनी त्यांच्या वसाहतीत म्हणजेच चायना
टाउनमध्ये अफूचे अड्डे ( Opium Dens) चालू केले. काही वर्षातच स्थानिक अमेरीकन लोक सुध्दा अफूच्या
नादी लागले व अड्डयांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. ह्या व्यसनाधीनतेला आळा
घालण्यासाठी सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये
कायद्याने अफू सेवनावर बंदी घालण्यात आली.
ह्याचा परीणाम एवढाच झाला की अफूंचे अड्डे गुप्तपणे चालू राहीले व हे अड्डे दुसरे
महायुध्द संपेपर्यंत सर्रास चालू होते.
कवितेतील पानांना
हिरवी गुंगी आलेली आहे. ही कसली पाने आहेत. आणि त्यांना आलेली हिरवी गुंगी कसली आहे. अमेरीकेतील
पर्यावरण वाचवण्याची व संवर्धनाची चळवळीची सुरूवात सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये १८९२ साली चालू झाली.
काही पर्य़ावरणवाद्यांनी एकत्र येउन तेथे प्रसिध्द सिएरा क्लब स्थापन केला. ह्या
चळवळीला ग्रीन पॉलिटीक्स असे नाव पडले.
वैशाखातिल फांदीवरती
आषाढातील गाजर पुंगी
सॅनफ्रॅन्सिस्कोतील संयुक्त राष्ट्र परीषद एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात चालू झाली. हे दिवस
मराठी कॅलेंडरप्रमाणे वैशाख महीन्याच्या आसपास येतात. ह्या परीषदेत मानवी हक्क व
जागतीक शांतते राखण्या बध्दलचे ठराव सर्व राष्ट्रांनी मंजूर केल्यानंतर काही
दिवसातच म्हणजेच ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरीकेने जपान मधील हिरोशीमा व नागासकी ह्या
शहरांवर अणुबाँब टाकले. त्यात लाखो माणसे मारली गेली. ऑगस्ट महीना मराठी
कॅलेंडरप्रमाणे आषाढ महीन्याच्या सुमारास येतो. ह्या ओळीतील फांदीवरती व गाजर ह्या
शब्दांचा संदर्भ इंग्रजीतील कॅरट ऑन ए स्टीक ( Carrot on a Stick) ह्या अलंकाराशी ( Idiom) आहे. एखादे उद्दीष्ट साध्य करण्याकरीता
काही बक्षिसाचे नुसतेच आमीष दाखवण्यात येते, पण प्रत्यक्ष बक्षिस कधीच देण्यात येत
नाही. अशा परीस्थितीचे वर्णन करण्यासाठी हा भाषेचा अलंकार वापरण्यात येतो. अमेरीकेने
जागतीक शांततेचा पुरस्कार करत लहान राष्ट्रांना नादी लावून शरण येत असलेल्या
जपानवर अणुबाँब टाकले, असा ह्या ओळींचा अर्थ असावा. ह्याचा असाही अर्थ होवू शकतो
की ही परीषदेचा जागतीक परीषदेचा उद्देश फारसा गंभीर नाही आहे. ही परीषद म्हणजे
गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली.
मिटून बसली पंख पाखरे,
पर्युत्सुक नच पीसही फुलते
ह्या परीषदेत अनेक
लहान राष्ट्रांच्या प्रतिनीधींनी भाग घेतला होता. परंतु बडया राष्ट्रांसमोर ते
आवाज उठवू शकत नव्हते. त्यांच्यावर दबाव आणून बडया राष्ट्रांनी सुरक्षा परीषदेतील
नकाराधिकाराचा ठराव संमत करुन घेतला. पंख मिटून बसलेल्या पाखरांची प्रतिमा ह्या लहान राष्ट्रांकरीता
वापरली असावी. पर्युत्सुक हा शब्द पर्युषण ह्या शब्दापासून आलेला असावा. पर्युषण हा जैन धर्मींयांचा महत्वाचा सण आहे.
पर्युषण ह्या शब्दाचा अर्थ एकत्र येणे असा आहे. हे देश पर्युत्सुक होते. म्हणजेच
जागतीक शांततेच्या प्रश्नावर एकत्र
येण्यास उत्सुक होते. परंतु बड्या राष्ट्रंच्या प्रभावामुळे मोकळेपणी चर्चा करु
शकत नव्हते. नच पीसही फुलते चा अर्थ असा असावा.
मूक गरोदर गायीची अन्
गळ्यांतली पण घंटा झुरते.
ही मूक गरोदर गाय कोण आहे ? तिच्या गळ्यातली घंटा का झुरते आहे ? घंटे सारखी निर्जीव वस्तु कशी काय झुरेल
? ती
झुरत असेल तर ती नक्कीच सजीव आणि मानवी भावभावना असलेली आहे. ही घंटा म्हणजे
लॉरेन्स बेल हा तत्कालीन अमेरीकन लढाउ विमाने तयार करणाऱ्या बेल एअरक्राफ्ट
कॉर्पोरेशन ह्या करणाऱ्या कारखान्याचा मालक आहे. १९३७ सालापासून तो अमेरीकन
वायुसेनेला बाँबर व इतर लढाउ विमाने पुरवायचा. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात
अमेरीकन वायुदलाची विमानांची गरज खुपच वाढली. तसेच अमेरीकन वायुदल इतर देशांनाही
लढाउ विमाने भाडेतत्वावर ( लीज अँड लेंड करार) वापरायला द्यायचे. ती विमाने सुध्दा
हा पुरवायचा. तो अमेरीकन सरकारचा खूप मोठा विमांनाचा पुरवठेदार बनला होता.
युध्दकाळात त्याचा धंदा चांगलाच बरकतीला आला होता. सर्व राष्ट्रांनी एकत्र येउन जर
जागतीक शांततेचा पुरस्कार करण्याचे ठरविले तर युध्दच होणार नाहीत व लढाउ
विमांनांची गरज भासणार नाही. असे झाले तर लॉरेन्स बेलचा धंदाच बसेल ह्या काळजीने तो झुरायला
लागला आहे. मर्ढेकरानी इंग्रजी बेल ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ घंटा हा येथे वापरला
आहे. कवितेतील मूक
गरोदर गाय ह्या शब्दांचा संदर्भ अमेरीकन राष्ट्राध्यक्षांच्या वापराकरीता खास
बनविलेल्या “ सॅक्रेड
काऊ “ (Sacred Cow) असे नाव असलेल्या विमानाशी आहे.
सॅक्रेड काऊ ह्या इंग्रजी शब्दांचा अर्थ पवित्र गाय असा होतो. ह्याच विमानाने
अमेरीकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट फेब्रुवारी १९४५ मध्ये रशियामध्ये याल्टा
परीषदेला उपस्थित रहाण्यासाठी गेले होते. हे विमान अमेरीकन वायुदलाने खास बनवून
घेतले होते. लॉरेन्स बेल हा ह्याच
गायीच्या गळ्यातील घंटा आहे म्हणजेच अमेरीकन सत्ताधीशांच्या व वायुदळाच्या अधिकाऱ्यांच्य
जवळचा माणूस आहे, असे मर्ढेकरांना म्हणायचे असावे. ही गाय मूक आहे कारण ती खरी गाय
नाही आहे. ही गाय गरोदर आहे कारण ह्या विमानाला अमेरीकन वायुदळाचे जन्मस्थळ समजले
जाते. अमेरीकन वायुदळाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्रदान करणारा नॅशनल
सिक्युरीटी अॅक्ट नावाचा कायदा , २२ जूलै
१९४७ साली , तत्कालीन अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन ह्यांनी ह्या विमानातून
प्रवास करत असताना पास केला. ह्या कवितेत जो काल वर्णन केला आहे त्या काळात, म्हणजेच
१९४५ च्या सुमारास ही “गाय “ त्या अर्थाने “गरोदर “
होती.
तिंबुनी झाली कणिक काळी
मऊ मोकळी ह्या रस्त्याची;
ह्या ओळींचा संदर्भ ब्रिटीश व अमेरीकन
वायुदलाने जर्मनीतील ड्रसडेन ह्या शहरावर केलेल्या तुफानी बाँबहल्ल्याशी आहे. १२
फेब्रुवारी १९४५ ते १५ फेब्रुवारी १९४५ ह्या दरम्यान ड्रसडेनवर रात्री व दिवसा
बाँव हल्ले करून ते शहर अक्षरशः उधवस्त करण्यात आले. ह्या हल्ल्यात शहरातील हजारो
इमारती जमीनदोस्त झाल्या व लाखो निरपराध नागरीक मरण पावले. ड्रसडेन हे जर्मनीमधील सांस्कृतीक महत्व असलेले
शहर होते. त्याला कोणतेही लष्करी महत्व नव्हते. तरीही त्यावर हल्ला करून तेथील
नागरीकांना मरणाच्या खाईत लोटले गेले. ह्या हल्ल्यात वेगळ्या प्रकारच्या
अतिशक्तीशाली बाँब्सचा (Firebombs)
वापर करण्यात आला. त्यामुळे शहरातील ३९ वर्ग किलोमीटर
मध्यवर्ती भाग पूर्णपणे नष्ट झाला. ह्या हल्यामुळे ब्रिटीश बुध्दीवाद्यांच्या
वर्तूळात सुघ्दा अस्वस्थता निर्माण झाली व त्याचे प्रतिसाद ब्रिटीश संसदेत उमटले.
ब्रिटीश वृत्तपत्रांनी सुध्दा ह्या घटनेबध्दल सरकारला जाब विचारला. त्यानंतर
तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल ह्यांनी त्यांना ह्या हल्ल्याची फारशी माहीती
नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. वस्तुस्थिती अशी होती की चर्चिल स्वतः त्या
हल्ल्याच्या नियोजनात सहभागी होते.
ड्रसडेन ह्या शहराकरीता मर्ढेकरांनी रस्त्याची
प्रतिमा वापरली असावी, कारण ऑटो बॉन रस्ते व इतर महत्वाचे रस्ते ड्रसडेन मधून
जातात. ऑटो बॉन रस्त्यांचे जर्मनीत जाळे आहे व सर्व महत्वाची शहरे ह्या रस्त्यांनी
जोडलेली आहेत. हे रस्ते हिटलरच्या काळात बांधण्यात आले . ह्या रस्त्यांचा उपयोग जलद
मोटार वाहतुकीसाठी आहे. युरोपमधील अनेक देशांना जोडणारा ८००० किलोमीटर लांबीचा
युरोपीयन रूट E – 40 ड्रसडेन मधूनच जातो. हे रस्ते उध्वस्त करणे हे
ड्रसडेनवरील बाँबहल्ल्यांचे उद्दीष्ट होते.
उष्टया
अन्नामध्ये थबकली
चोंच कोरडी बघ घारीची
कवितेतील ह्या ओळींचा
रोख रशियाने ९ ऑगस्ट १९४५ ला जपानव्याप्त मांचुरीयावर
केलेल्या आक्रमणाकडे आहे. मांचुरीया हा पूर्वी चीनचा एक प्रांत होता. तो जपानने
१९३१ मध्ये कपटनीतीने वेगळा काढून तेथे
जपानच्या प्रभावाखाली असलेले बाहुले सरकार आणले. नंतर तेथील नैसर्गिक
साधनसामुग्रीवर डोळा ठेवुन अनेक जपानी लोकांना तेथे स्थलांतरीत होण्यासाठी जपान
सरकारने उत्तेजन दिले. त्यानंतर तेथे जपानी लोकसंख्या बरीच वाढली व जपानी लोकांचा
उद्योगधंदे व अर्थव्यवस्थेवरील प्रभाव वाढला. ह्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला
मदत झाली. एप्रिल १९४१ मध्ये रशियाने जपानशी अनाक्रमण करार केला होता. परंतु
त्यानंतर रशियाच्या भुमिकेत बदल झाला. याल्टा येथे फेब्रुवारी १९४५ मध्ये झालेल्या
दोस्त राष्ट्रांच्या परीषदेत रशियन राष्ट्रप्रमुख स्टॅलिनने इतर दोस्त
राष्ट्रांच्या नेत्यांना असे आश्वासन दिले की , जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतर
तीन महीन्यानंतर रशिया जपानवर आक्रमण करेल. ९ ऑगस्ट १९४५ ला जर्मनीने शरणागती
पत्करल्याला बरोब्बर तीन महीने होत होते. म्हणून रशियाने आक्रमणाकरीता हा मुहूर्त
साधला. वास्तविकतः जपानला रशियाबरोबर
युध्द नको होते. ह्याउलट दोस्त राष्ट्रांबरोबर युध्द संपूष्टात आणून शांतता
प्रस्थापित करण्या साठी रशियाने मध्यस्ती करावी असे जपानी नेत्यांचे प्रयत्न चालू
होते. त्याबदल्यात जपानने रशियाला अनेक आकर्षक प्रादेशीक सवलती (Territorial
Concessions) देउ केल्या होत्या. रशियाने एकीकडे ही
बोलणी चालू ठेवत, युध्दाची तयारी केली होती. जपानला ह्या गोष्टींची काहीच कल्पना
नव्हती. ६ ऑगस्ट १९४५ ला जपानमधील हिरोशिमावर व ९ ऑगस्ट १९४५ ला नागासकीवर
अमेरीकेने अणुबाँब टाकले. व त्याचवेळी ऱशियाने जपानशी विश्वासघाताने युध्द
पुकारले. जपानला रशियाच्या आक्रमणाची गंधवार्तासुध्दा नव्हती.
ह्या घटनांचा
कवितेतील ओळींशी काय संदर्भ आहे हे बघू. ह्यातील घारीची प्रतिमा रशियाकरीता वापरली
असावी. रशियाच्या बोधचिन्हावर द्विमुखी गरुडाचे (Twin Headed Eagle) चित्र आहे. ह्या घटनेतील रशियाची वागणूक गरुडासारखी
नसून घारीसारखी आहे. ह्या घारीची चोच कोरडी आहे कारण जपानशी रशियाच्या असलेल्या
संबंधांची कोणतीही फिकीर न करता हे आक्रमण केले आहे. ह्या कोरडया चोचीचा रोख
स्टॅलिनकडे सुध्दा असू शकतो. कारण स्टॅलिन हा भावनीकरीत्या अतिशय कोरडा माणूस
होता. उष्टया अन्नाची प्रतिमा माचुरीयाकरीता वापरली असावी. कारण जपानी लोक
मांचुरीयात उपरे होते. व त्यांचा मांचुरीयातील नैसर्गिक साधनसंपत्ती व
कारखानदारीवर ताबा होता. रशियाचा या संपत्तीवर डोळा होता. ही साधनसंपत्ती म्हणजे
उष्टे अन्न असावे. वास्तवीकतः मांचुरीया हा चीनचा भाग होता. त्याच्यावर ना जपानचा
हक्क होता ना रशियाचा. रशियाकडे माचुरीयाचा ताबा काही वर्षे होता. नंतर तो चीनच्या
ताब्यात गेला. अन्न व माचुरीयाचा दुसरा संबंध म्हणजे चीनमधल्या पाककलेमधील बरेच
प्रकार माचुरीयात खाल्ला जाणाऱ्या मांचु डीशेस पासून आलेले आहेत.
ब्रेक लागला चाकांवरती,
श्वासहि तुटला आगगाडीचा;
वरील ओळी मांचुरीयातून जाणाऱ्या ट्रान्स
सैबेरीयन रेल्वे जाळ्याच्या संदर्भात असाव्यात. ही रेल्वे लांबीने जगात मोठी असून ती
अती पूर्व रशिया , मॉस्को , चीन , मंगोलिया, माचुरीया ह्या प्रदेशातील
महत्वाच्या शहरांना जोडते. ह्या रेल्वेचा
मांचुरीयातील भाग १९०५ सालापासुन जपानच्या ताब्यात होता. जपान सरकारने ह्या
रेल्वेच्या व्यवस्थापनाकरीता साउथ मांचुरीयन रेल्वे कंपनी स्थापन केली होते. ह्या
रेल्वेचे रशिया व जपानव्याप्त मांचुरीयाच्या
सीमारेषेवरील चँगचुन नावाचे स्टेशन होते. येथे रेल्वेच्या गेजमध्ये बदल
व्हायचा. रशियन व जपानी रेल्वे मार्गाच्या रूंदी (गेज) मध्ये फरक होता. त्यामुळे
ह्या स्टेशन मध्ये रेल्वे काही तांत्रीक पध्दती अनुसरून एका गेजमधुन आलेल्या
मालाचे व प्रवाशांची दुसऱ्या गेजमधे
वाहतूक केली जायची. ह्या पध्दतीला इंग्रजी मध्ये ब्रेक ऑफ गेज असे नाव आहे. रशियाने ऑगस्ट १९४५ मध्ये मांचुरीयावर आक्रमण
केल्यानंतर ह्या रेल्वेचा जपान्यांकडून ताबा घेतला. त्यानंतर ही रेल्वे कंपनी
अमेरीकच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली. कारण जपानने अमेरीकेशी
शरणागती पत्करली होती.
उन उसासा धरणीच्या
अन्
उरांत अडला इथे मघाचा
वरील
ओळीतील ‘मघाचा’ हा शब्द आधीच्या कडव्यात आलेल्या
(तिंबुनी झाली कणिक काळी) ड्रसडेन शहरावरील बाँबफेकीला अनुसरून वापरला आहे. उन
उसासा धरणीचा ह्या शब्दांचा संदर्भ ह्या शहरावर टाकलेल्या वेगळ्या प्रकारच्या शक्तीशाली
बाँब ( Firebombs) व ह्या बाँबस् मुळे निर्माण होणाऱया
आगीच्या वादळांशी (Firestorms)
आहे. ह्या आगीच्या वादळांमुळे तेथील तपमान १५०० सेंटीग्रेड
पर्यंत गेले होते. ह्या वादळात तप्त झालेल्या हवेचा मध्यवर्ती स्तंभ उभा रहातो.
त्या स्तंभामुळे जोराचे गरम वारे वाहू लागतात. हे वारे आगीला ऑक्सिजन वायुचा
पुरवठा करतात. त्यामुळे आगीचा जोर वाढून तपमानात आणखी वाढ होते. ह्या आगीत हजारो
माणसे आगीत होरपळून व घुसमटून मेली.
शिरेल तेव्हा शिरो बिचारें
हवेंत असल्या पाउस-पाते;
जगास तोंवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजळ चढते.
वरील कडव्यांमधये
वर्णन केलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व परीस्थितीच्या ‘हवे’त जागतीक शांतता रूपी पाउस-पाते शिरेल
तेव्हा शिरेल. ते पाउस पाते सुध्दा बिचारेच आहे. कारण बड्या राष्ट्रांना त्यांच्या
व्याख्येप्रमाणे जागतीक शांतता हवी आहे. तेव्हा खरी जागतीक शातता प्रस्थापित होइल
तेंव्हा होइल. तो पर्यंत लहान देश जागतीक शांततेच्या तत्वांच्या गुगीखाली रहातील.
ही जागतीक शांतता मृगजळासारखी आहे.
अनेक आभार.
ReplyDeleteमराठीत आवर्जून वाचण्यासारखे जे फार थोडे ब्लॊग उरले आहेत त्यात या ब्लॊगचा क्रमांक फार वरचा आहे. जमेल तेव्हा लिहावे, वाचतो आहे हे सांगण्यासाठी ही पावती.
या कवितेला महायुद्धकालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत.हे
ReplyDeleteआपल्यासारख्या मराठीच्याअभ्यासकांमुळे सर्वसामान्य वाचकांना समजते.वैशाखातील वातावरणाचा संदर्भ देउन कवितेचा अर्थ समजला तर पहिला संदर्भ अधिक स्पष्ट होईल.
कवितेचा मतितार्थ नक्कीच खूप मोलाचा आहे। आणि बा सी मर्ढेकरांच्या कविता तर नक्कीच वर्णनात्मक ठरतात।
ReplyDeleteखूप अभ्यासपूर्ण विवेचन
ReplyDelete