मर्ढेकरांच्या कवितांत प्रतिमांचा वापर मुक्तपणे केलेला आहे. किंबहुना कवितेत प्रतिमांचा वापर ही मर्ढेकरांची मराठी काव्याला देणगी आहे. "पंक्चरली
जरि रात्र दिव्यांनी " ही कविता तशी दुर्बोधच मानली जाते. मर्ढेकरांच्या अशा कवितांची त्या काळात टीकाकार व समीक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. व काही कवितांवर अश्लीलतेच्या नावाखाली खटला भरण्यात आला होता. ह्या संदर्भात कवितेतील प्रतिमांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
पंक्चरली
जरि रात्र दिव्यांनी,
तरी
पंपतो कुणि काळोख ;
हसण्याचे जरी वेड लागलें,
भुंकतात तरी अश्रू चोख.
फतकन्
बसली रबरी रात्र ;
दुजी न टायर ह्या अवकाशीं ;
राठ मनाच्या चाटित बसलीं
पापुद्र्यांच्या कुत्री राशी.
खांद्यावरती
न्यावी रात्र
जमेल
ज्याला त्याने त्याने ;
डोळ्यावरती जरा कातडें
ओढावे, - पण हसतमुखाने.
पंक्चरलेल्या
रबरी रात्रीं
गुरगुरवावीं
रबरी कुत्रीं ! !
ही कविता मर्ढेकरांनी त्यांच्या कवितेवर
होणाऱ्या टीकाकारांना उद्देशून केली असावी. मर्ढेकरांची कविता दुर्बोध व अश्लील आहे
अशी त्या काळातील समीक्षक व टीकाकारांनी टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांच्या
कवितेची खिल्ली उडवण्यात येत होती व त्यांच्या कवितेला अनेक साहीत्यीक हसत होते.
पंक्चरली
जरि रात्र दिव्यांनी,
तरी पंपतो कुणि काळोख
ह्या ओळीतील रात्र म्हणजे मर्ढेकरांची कविता
आहे. त्यांची कविता दुर्बोध असून सहजासहजी समजण्यासारखी नाही ह्याची मर्ढेकरांना
कल्पना आहे ती कविता रात्रीच्या अंधारासारखी गूढ आहे. हया कवितेचा थोडाफार अर्थ
लावण्याचा प्रयत्न काही “ दिव्यांनी ” म्हणजेच अभ्यासकांनी केला.पण ह्याचा
परीणाम असा झाला की त्यांची कविता मूळ अर्थच हरवून बसली. तीचा खरा अर्थ कोणालाही
समजला नाही. “ पंक्चरली” ह्या शब्दाचा अर्थ असा असावा. तर काही
टीकाकारांनी कवितेत काळोख “ पंपण्याचा”
उद्योग केला. ह्याचा अर्थ असा असावा की दुर्बोध असलेली
कवितेवर अनेक प्रकारे टीका करून आणखी दुर्बोध बनवली व अभ्यासकांना खऱ्या
अर्थापासुन दूर नेले. सामान्य वाचकांचा टीकाकार व समीक्षकांवर विश्वास असल्यामुळे,
ह्या कवितांचा अर्थ , ते सांगतील तोच समजण्यात आला. त्यामुळे कवितेच्या खऱ्या
अर्थापासून वाचक वंचित राहीले.
हसण्याचे जरी वेड लागलें,
भुंकतात तरी अश्रू चोख.
मर्ढेकरांच्या अनेक कवितांची खिल्ली
उडविण्यात येऊन त्यांना हास्यास्पद ठरविण्यात आले होते. कसलाही अर्थ समजून न घेता,
त्यांच्या कवितांची टर उडविण्याच्या वृत्तीला हसण्याचे वेड म्हणले आहे. काही
टीकाकारांनी त्याच्या कवितांना अश्लील ठरवून नक्राश्रू ढाळले व मराठी साहित्यात
अश्लीलतेचा प्रवेश झाल्यावध्दल गळा काढला. त्यांनी मर्ढेकरांना मराठी साहित्यातील
खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. अशा टीकाकारांच्या “भुंकण्याचा ” परीणाम मात्र चोख झाला. मर्ढेकरावर
त्यांच्या कवितेत असलेल्या अश्लीलतेवरून खटला भरण्यात आला.
फतकन् बसली रबरी रात्र ;
दुजी न टायर ह्या अवकाशीं ;
टीकाकारांच्या अशा दृष्टीकोनामुळे
त्यांची कविता मूळ अर्थच गमावून बसली. एखादी रबरी टायर ट्युब पंक्चर झाल्यानंतर
खाली बसते, त्याप्रमाणे त्यांच्या कवितेची स्थिती झाली. असे असली तरी मर्ढेकरांना
स्वतःच्या कवितांबध्दल सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कवितेसारखी कविता, मराठी
साहित्याच्या अवकाशात दुसरी कोणतीही नाही असे त्यांना म्हणायचे आहे.. दुजी न टायर
ह्या अवकाशीं ह्या वाक्याचा अर्थ असा असावा..
राठ मनाच्या चाटित बसलीं
पापुद्र्यांच्या
कुत्री राशी.
ह्या ओळीतील कुत्री म्हणजे कवितेची
निंदा करणारे टीकाकार असावेत. त्याची मने संवेदनाहीन आहेत म्हणजेच राठ आहेत. ही
कुत्री पापुद्र्यांच्या राशी चाटत आहेत म्हणजेच हे लोक कवितेतील शब्दरूपी
पापुद्रेच बघत आहेत. ह्या शब्दांच्या मागे कोणता अर्थ दडलेला आहे ह्याचा कोणीही
शोध घेतलेला नाही.
खांद्यावरती न्यावी रात्र
जमेल ज्याला त्याने त्याने
मर्ढेकरांच्या ह्या ओळी कवितेच्या वाचकांना
उद्देशून आहेत. ज्या वाचकांना जमेल, त्यांनी स्वतः कवितेचा अर्थ स्वतः समजून
घेण्याचा प्रयत्न करावा. खांद्यावर न्यावी रात्र ह्या ओळीचा अर्थ असा आहे.
मर्ढेकरांना कल्पना आहे की ही कविता सर्वांना समजेलच असे नाही. म्हणून ज्याला जमेल
अशा वाचकाने कवितेचा शब्दापलीकडला अर्थ जाणून घ्यावा.
डोळ्यावरती जरा कातडें
ओढावे, - पण हसतमुखाने.
ह्या कविता समजून घेण्यासाठी डोळ्यावरती कातडे ओढावे म्हणजेच टीकाकारांनी
केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करावे . ह्याचा दुसरा असाही अर्थ होतो की ह्या कवितेला
दुसऱ्या कवितांचे मापदंड लावू नयेत. ही कविता वेगळीच आहे. कविता समजावून
घेण्याकरीता तिचा विचारही वेगळाच करावा. मर्ढेकरांनी असेही सांगीतले आहे की ह्या
कवितेला हसतमुखाने सामोरे जा म्हणजेच मोकळ्या मनाने कवितेवर विचार करा. ज्याप्रमाणे
रात्र पडल्यानंतर अंधाराची सवय होउन, हळू हळू अंधारातही दिसू लागते, त्याप्रमाणे
कोणत्याही टीकाकाररूपी दिव्याच्या उजेडाशिवाय ही कविता समजू लागेल. “ - पण हसतमुखाने “
ही कविता समजण्याकरीता पूर्व अट आहे. उगाच सतत एरंडेल पील्यासारखा चेहरा करून कुठल्यातरी गंभीर विषयावर तात्वीक
चर्चा करत बसणाऱ्यांकरीता ही कविता नाही.
पंक्चरलेल्या रबरी रात्रीं
गुरगुरवावीं रबरी कुत्रीं ! !
वरील ओळींचा संदर्भ मर्ढेकरांच्या
कवितेवर झालेल्या समीक्षकांच्या वादविवादांशी आहे. अनेक टीकाकारांनी मर्ढेकरांच्या
कवितेवर टीका केली. मर्ढेकर या टीकांकारांना उत्तर देण्याच्या फंदात कधीही पडले
नाहीत. त्यांनी त्यांच्या कवितांचा अर्थ ही कधी सागितला नाही. मर्ढेकरांनी टीकेला
भीक न घालता, कविता स्वतःला पाहिजे तशाच लिहील्या व आणखी टीका ओढवून घेतली.
मर्ढेकरांना त्या टीकेची मजा वाटत असावी. ह्यातली
कु्त्री म्हणजे टीकाकार आहेत. हे टीकाकार तज्ञाच्या आवेशात टीका करत आहेत
पण त्यांना कवितेचा गाभाच कळलेला नाही. ते सुडोइंटलेक्चुअलस् आहेत. रबरी हे विशेषण
ह्या अर्थाने वापरले असावे. “गुरगुरवावी
“ ह्या शब्दाला खास अर्थ आहे. ह्या कुत्र्यांना
कोणीतरी गुरगुर करायला उत्तेजन देतो आहे. हे कुत्र्यांना गुरगुरवणारे कोण आहे. हे स्वतः
मर्ढेकरच आहेत. तेच शातपणे त्यांच्यावर होणाऱ्या निरर्थक टीकेकडे मजेने बघत आहेत.
मर्ढेकर त्याच्या टीकाकारांना उत्तर देउन कधीही गप्प बसवू शकले असते. पण त्यात
कसलीच मजा राहीली नसती. ओळीच्या शेवटी असलेल्या दोन उदगारवाचक चिन्हांचा बहुधा हा
अर्थ असावा.
interesting interpretation...
ReplyDeleteawesome elaboration....
ReplyDelete