हाडांचे सापळे हासती
झडणाऱ्या मांसास पाहुनी ;
किती लपविले तरी शेवटी
दातांचे दिसणारच पाणी.
पहा विचारुनि त्यांना कसली
मैथुनात रे असते झिंग ;
दाखवितिल ते भोक रिकामे
जिथे असावे मांसल लिंग.
पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुध्दीचे ;
घुमेल डमरूंतुन डोक्यांच्या
हास्य वाळलेल्या मज्जांचे.
अखेर होतां, किती विशाल
पुसेल कुणि जर त्यांचे अंगण ;
दिसेल थोडे सफेद काही,
जिथे असावे मांसल ढुंगण.
असशिल भोळ्या कुठे भैरवा,
उघड तुझे तर तिनही डोळे ;
भस्म करी गा अता तरी हे –
हे हाडांचे खडे सापऴे !
बा.सी. मर्ढेकर
कवीवर्य ग. दि. माडगुळकरांचा एक लेख वाचनात आला.
त्याचा सारांश असा की, एकदा एक कविता ते
वाचत असताना, त्या कवितेत कावळ्याचा, कडूलिंबाचे झाडाचा उल्लेख आढळला. त्यांना आश्चर्य
वाटले की ती कविता त्यांनी स्वतःच लिहीलेली आहे. ते विचारात पडले की त्यांनी
कावळा, कडूलिंबाचे झाड त्यांच्या कवितेत कसे काय आले. त्याचा शोध त्यांनी त्या
लेखात घेतला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ते ज्या माणदेशात वाढले, तेथे
कडूलिंबाची झाडेच मुबलक होती व कावळेही खुप होते. भोवतालच्या त्या वातावरणाचा
परिणाम कवीच्या अबोध मनावर होत
असतो. म्हणून त्यांच्या कवितात ही झाडे व कावळे आले असावेत असे त्यांनी प्रतिपादन
केले आहे. त्या लेखात त्यांनी असेही म्हणले आहे की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलीं
सारख्या तत्वज्ञ कवीनेही “ उड उड रे काउ, तुझे सोन्यने
मढवीन काउ “ असा कावळ्याचा उल्लेख, पंढरीनाथ घरी
पाहुणे येण्याच्या संदर्भात केला आहे. त्चांच्या लेखाचा सारांश असा आहे की, कवीच्या
आजुबाजुच्या वातावरणाचा परिणाम त्याच्या कवितेत वापरलेल्या रुपकांवर, प्रतिमांवर
होत असतो.
असे असेल तर मर्ढेकरांच्या कवितेत
हे हाडांचे सापळे कोठून आले. ज्या कवीची स्त्रीविषयीची भावना “ थाब उद्याचे माउली तीर्थ
पायाचे घेईतो “ अशी आहे, तिच्या विषयी “ भोक रीकामे “ असा ग्राम्य शब्द कसा काय
वापरु शकतो ? ही हाडांच्या सापळ्यांची दुनिया
मर्ढेकरांनी कुठे पाहीली असावी ? का हाडांचे सापऴे
ही एक प्रतिमा आहे ? विचार करता
करता असे अनेक प्रश्न डोक्यात पिंगा घालत
होते. . अशातच जी. ए. कुलकर्णींनी “वैऱ्याची एक रात्र” हे मराठीत भाषांतर केलेले एक पुस्तक वाचायला
मिळाले. आणि हाडांच्या सापऴयांच्या दुनियेचा संदर्भ लक्षात येउ लागला.
ह्या पुस्तकांचे मुळ
लेखिकेचे नाव ओल्गा लेंग्येल (Olga Lengyel) असे आहे व इंग्रजी पुस्तकाचे नाव “I
survived Hitler’s Ovens” असे आहे. ही लेखिका
ऑश्विझ (Auschwitz ) ह्या पोलंडमध्ये असलेल्या हिटलरने दुसऱ्या महायुध्द काळात
निर्माण केलेल्या छळछावणीत (Concentration Camp) कैद होती. तिला आलेल्या छळछावणीतील प्रत्यक्ष अनुभवांवर आधारीत हे
पुस्तक आहे. जी. ए. कुलकर्णींनी त्यांच्या खास शैलीत ह्या पुस्तकाचे सुंदर भाषातर
केले आहे. हे पुस्तक मुळातच वाचण्यासारखे आहे. रुमानीयन वंशाची ही लेखिका व्यवसायाने डॉक्टर असलेल्या तिच्या नवऱ्याला
रुमानीयामधील रुज नावाच्या शहरात इस्पीतऴ चालवण्या करीता मदत करत असते. कोणताही
गुन्हा केलेला नसताना, अचानक एके रात्री
ती, तिचा नवरा , तिची दोन मुले व नवऱ्याचे म्हातारे आई वडील ह्यांना रहात्या
घरातुन पकडुन नेउन हजारो किलोमीटर दूर असलेल्या ऑश्विझ येथील छळछावणीत आगगाडीने
नेण्यात येते. तिथे गेल्यावर त्या सर्वांची ताटातूट होते. मुलांची व तिची आयुष्यात
कधीही भेट होत नाही. ह्या पुस्तकात तिने छळछावणीतील कैद्यांना मिळणारी क्रूर अमानुष वागणुक , त्यांना मिळणाऱ्या शिक्षा ,
त्यांना छऴणारे नाझी एस. एस. गार्डस, गॅस चेंवर मध्ये त्यांची होणारी सामुदायिक
हत्या, त्यांचा उदासवाणा दिनक्रम , त्यांना मिळणारे अपुरे निकृष्ट दर्जाचे अन्न व
कपडे , आजारी व दुर्बळ झालेल्या जगण्यास लायक नकलेल्या कैद्यांची गॅस चेंबरकडे
पाठविण्याकरीता होणारी “ निवड परेड“ वगैरेचे विस्त्रूत वर्णन
पुस्तकात आहे. कुप्रसिध्द नाझी स्त्री एस्. एस. गार्ड इर्मा ग्रीस हीच्या विकृत व
सॅडीस्ट मनोवृत्तीतून ती कैद्यांना देत असलेल्या अमानुष वागणुकीचे विस्त्रुत वर्णन
पुस्तकात आहे. पुस्तकात केवळ हाडाचे सापळे झालेल्या कैद्यांचे व ऑश्विझ छळछावणीतील
इतर छायाचित्रे आहेत.
ह्या पुस्तकात
प्रकरण क्रमांक 23 “दुसरी भूक” या नावाचे एक प्रकरण आहे. हे प्रकरण वाचल्यावर
कवितेतील हाडांच्या सापळ्यांवर प्रकाश पडतो. ऑश्विझ छऴछावणीतील कैद्यांचा बाहेरील
जगाशी कोणताही संबंध नसतो. त्याचा तेथील जीवनक्रम अतिशय कंटाऴवाणा असतो. खायला
मिऴणारे अपुरे बेचव निकृष्ट दर्जाचे अऩ्ऩ, थंडी पासून बचाव करता न येणारे अपुरे
कपडे, रोज करायला लागणारे कष्ट , सतत टांगत्या तलवारीसारखी असणारी मरणाची भिती अशा
स्थितीत सुध्दा त्यांची लैंगिक भूक सर्व नीतीअनीतीचे नियम झुगारुन देउन प्रबळ
होते. अशा वेऴेला शिक्षण , संस्कार वगैरे सर्व बाजूला पडते . एका सुशील प्राध्यापक
तरुण स्त्री चे उदाहरण दिलेले आहे. त्या तरुण स्त्रीचे तिच्या नवऱ्यावर व मुलांवर
अतिशय प्रेम असते. त्यांच्याशी ताटातूट होउन ती ऑश्विझच्या छणछावणीत पाठवली गेलेली
असते. ती कधीच तिच्या नवऱ्याला व मुलांना विसरु शकणार नाही असे तिच्या सहकारी
स्त्री कैद्यांना सांगत असते. परंतु सहा महीन्यातच ती एका पुरूष कैद्याशी सुत
जुळविते व आता त्याच्या शिवाय ती राहू शकणार नाही असे सांगू लागते. अनेक स्त्रीया
पुरुष कैद्यांशी सुत जुळवतात. काही स्त्रीया स्त्री कैद्यांशीच समलिंगी संबंघ प्रस्थापित
करतात. केवळ एका उकडलेल्या बटाट्याच्या बदल्यात स्त्री कैदी स्वतःचे शरीर विकण्यास
तयार होतात. भुकेने खंगलेल्या व शरीरातील हाडे दिसणाऱ्या ह्या स्त्रीयांच्या
समुदायात, ज्या स्त्रीयांच्या अंगावर मास आहे अशा स्त्रीयांचा भाव वाढतो. एरवी
बाहेरील जगात ह्या स्त्रीयांना बेढब मानले गेले असते. कुप्रसिध्द एस्. एस्. गार्ड ईर्मा
ग्रीसला तर उभयलिंगी संबंध चालत असतात. छऴछावणीतील स्त्रीया सुसंकृत व सुशीक्षीत
असून सुध्दा लैंगीतकेवर आधारलेले ग्राम्य विनोद करीत असतात. काही स्त्रीया
तेथे वेश्या व्यवसाय करु लागतात. तेथील वातावरणात त्यांच्या शारीरीक गरजा
भागविण्या करीता तेथील स्त्रीया काहीही करण्यास उद्युक्त होतात . लेखिकेने असेही
नमूद केले आहे की तेथे असलेल्या बहुतेक स्त्री पुरूष कैद्यात अतिशय बेशरम असा लिंगपिसाट पणा निर्माण झाला होता. तेथील
कैद्यांची अशी लाचार शूद्रावस्था होण्यासाठी
नाझी व त्यांची निर्बुध्द पाशवी शिस्तच जबाबदार होती. लेखिकेच्या मते तेथील
कैद्यांना तसे नीच पातळीवर आणून ठेवणे हेच नाझींचे उद्दीष्ट होते व त्यात ते
कमालीचे यशस्वी झाले होते. लेखिकेच्याच शब्दात सांगायचे तर, “ त्या वेळची परीस्थिती
पाहिली, की मला वाटणारी शिसारी अस्थानी व असंमजस होती असे मला वाटते. त्या
किळसवाण्या क्षणिक सुखामुळे स्त्री-पुरूष कैद्यांना काही काळ तरी सतत हजर असलेल्या
मृत्यूच्या दाट सावलीचा विसर पडत असे आणि त्या गोष्टीची तर छावणीमध्ये फार जरूरी
होती.” “बर्केनाचे सारे जगच असे
दूषित, नासलेले होते. या ठिकाणी जर्मनांनी मानवाचा अत्यंत वैयक्तिक हक्कच तुडवून
नष्ट केला होता. या ठिकाणी प्रेम म्हणजे गुलाम कैद्यांना फसफसलेली क्षणिक झिंग आणि
त्यांच्या मालकांना क्षणिक मनोरंजन होऊन बसले होते.”
मर्ढेकरांना ऑल इंडिया रेडिओवरील उच्च पदावरील नोकरीमुळे नाझी छऴछावण्यात काय
चालले होते त्याची माहीती असावी. तसेच ह्या लेखिकेचे “Five
chimneys” नावाचे पुस्तक
1947 साली प्रसिध्द झाले होते. ह्याच पुस्तकाचे नाव काही काळानंतर “I
survived Hitler’s Ovens” असे बदलण्यात आले.
हाडांचे सापळे हासती
झडणाऱ्या मांसास पाहुनी ;
किती लपविले तरी शेवटी
दातांचे दिसणारच पाणी.
कवितेतील हाडाचे सापऴे झडणाऱ्या मांसास पाहून हसत आहेत. हे हाडाचे सापऴे
म्हणजे नाझी छळछावण्यातील कैदी आहेत. तेथील हालअपेष्टा व उपासमारी मुळे हे कैदी
हाडांचे सापळे झालेले आहे. व ते इतर कैद्यांच्या झडणाऱ्या मांसास पाहून हसत आहे.
येथे झडणाऱ्या मांसाची प्रतिमा, तेधील वातावरणात गऴून पडणाऱ्या सुसंस्कार, सभ्यता
, माणुसकी वगैरे सद्गुणांकरीता वापरली अंसावी. येथे येणारे कैदी सुरूवातीला ह्या
सदगुणांचे पालन करतात. परंतु काही दिवसातच ते इतर कैद्यांच्या नीच मानसिक पातळीवर
येउन पोचतात. ह्या कडव्यातील दाताचे पाणी म्हणजे भुकेमुळे तोंडात येणारी लाळ आहे.
ही लाळ गाळत बसण्याची स्थिती दोन्ही प्रकारच्या शारिरीक भुकेमुळे येत असते. ह्या
भुका संस्कारामुळे कितीही दाबल्या गेल्या , तरी अखेर त्या उफाऴून येतातच. तेथील
कैद्यांनी त्या सभ्यतेमुळे काही दिवस त्या कितीही लपवल्या, तरी शेवटी कैदी तेधील
परीस्थितीला शरण जातात व त्यांच्या त्या भुका इतर “हाडांच्या सापळ्यां” ना जाणवू लागतात. लेखिकेचे
खालील शब्द छळछावणीतील या स्थितीवर प्रकाश टाकतात.
“अवनतीचा हा भयानक खंदक नाझींनी निर्माण केला होता. त्याच्या
काठावर अस्थिरपणे उभे रहावे, पण कधीही आत पडू नये हे कठोर व्रत संभाळायला असामान्य
नैतिक धैर्याची आवश्यकता होती.
आणि आमच्यापैकी बहुतेकांकडे ते नव्हतेच !”
पहा विचारुनि त्यांना कसली
मैथुनात रे असते झिंग ;
दाखवितिल ते भोक रिकामे
जिथे असावे मांसल लिंग.
वरील ओळींचा अर्थ समजण्याकरीता लेखिकेचे खालील शब्द पुरेसे
आहेत
“त्या वेळची परीस्थिती पाहिली, की मला वाटणारी
शिसारी अस्थानी व असंमजस होती असे मला वाटते. त्या किळसवाण्या क्षणिक सुखामुळे
स्त्री-पुरूष कैद्यांना काही काळ तरी सतत हजर असलेल्या मृत्यूच्या दाट सावलीचा
विसर पडत असे आणि त्या गोष्टीची तर छावणीमध्ये फार जरूरी होती.”
“बर्केनाचे सारे जगच असे
दूषित, नासलेले होते. या ठिकाणी जर्मनांनी मानवाचा अत्यंत वैयक्तिक हक्कच तुडवून
नष्ट केला होता. या ठिकाणी प्रेम म्हणजे गुलाम कैद्यांना फसफसलेली क्षणिक झिंग
आणि त्यांच्या मालकांना क्षणिक मनोरंजन होऊन बसले होते.”
योगायोगाने जी. ए.
कुलकर्णींनी भाषांतरात सुध्दा ” फसफसलेली क्षणिक झिंग ” असे शब्द वापरलेले
आहेत.
ह्या कडव्यातील “मांसल लिंग “ व “भोक “ हे शब्द केवळ शारिरीक
पातळीवर असलेले नर मादी तील आकर्षण दर्शविण्याकरीता वापरले असावे.
पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुध्दीचे ;
घुमेल डमरूंतुन डोक्यांच्या
हास्य वाळलेल्या मज्जांचे.
अखेर होतां, किती विशाल
पुसेल कुणि जर त्यांचे अंगण ;
दिसेल थोडे सफेद काही,
जिथे असावे मांसल ढुंगण.
अशा परिस्थितीला जे हाडांचे
सापळे (कैदी) शरण गेलेले नाहीत व ज्यांच्यात नितीमत्ता, संस्कार टिकून आहेत, ते
कैदी इतर कैद्यांना म्हणत असावेत की स्वतःलाच प्रश्न विचारा की केवळ शारिरीक
पातळीवरच्या भुका कोणत्याही मार्गाने भागवणे, हेच तुमच्या बुध्दीचे, विचारशक्तीचे
लक्षण आहे का ? हे तर पशुंचे लक्षण आहे.
इतर कैद्यांकडे ह्या प्रश्नाला काहीच
उत्तर नसल्या मुळे, ते उत्तरा दाखल केवळ हसतात. त्यांचे डोके डमरूसारखे पोकळ झाले
आहे म्हणजेच त्यांच्यात विचार करण्याची शक्तीच राहीलेली नाही. मानवी मेंदूकडे
जाणाऱ्या संदेशाचे वहन मज्जातंतूव्दारे होते.
यातील मज्जा वाळलेल्या आहेत, म्हणजेच संवेदना गोठलेल्या आहेत. ह्या
गोठलेल्या संवेदना, फक्त भेसूर हास्याची प्रतिक्रीया देऊ शकतात. या हाडांच्या
सापळ्यांचे अंगण म्हणजेच त्यांचे विश्व त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. त्यांच्या
दृष्टीने अंगण म्हणजे केवळ त्यांचे ढुंगण टेकण्यापुरती जागा.
असशिल भोळ्या कुठे भैरवा,
उघड तुझे तर तिनही डोळे ;
भस्म करी गा अता तरी हे –
हे हाडांचे खडे सापऴे !
या कडव्यात भोळ्या भैरवास आवाहन केले आहे. भैरव म्हणचेच शंकर. हा शंकर भोळा
आहे. हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे शंकर हा संहारकर्ता आहे. ब्रम्हा सृष्टीचा
निर्माता आहे, विष्णु पालनकर्ता आहे, तर महेश संहारकर्ता आहे. असशील कोठे या
शब्दांवरुन असे ध्वनित होते की भैरवाचे म्हणजेच शंकराचे ह्या हाडांच्या
सापळ्यांच्या विकृत दुनियेकडे लक्ष गेले नसावे किंवा कदाचित त्याच्या
अस्तित्वाबध्दलच शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भैरव जेव्हा कृध्द
होतो तेव्हा तो तिसरा डोळा उघडतो. त्या तिसऱ्या डोळ्यात चराचराला भस्म करण्याची
शक्ती असते. अशा त्या भैरवाला आवाहन करून, त्याच्या तिनही डोळ्यांनी हाडांच्या सापळ्यांचे
हे दूषित, नासलेले जग भस्म करण्याची आळवणी केली आहे. हे सापळे खडे आहेत म्हणजेच ते
जिवंत आहेत.
मर्ढेकरांच्या या कवितेवर अश्लील म्हणून खटला भरण्यात आला होता. त्या कवितेचा
अर्थ त्यांना न्यायालयात सांगावा लागला
होता. तो अर्ध पूर्णपणे वेगळा होता. त्यांनी न्यायालयात दिलेल्या
स्पष्टीकरणाप्रमाणे ही कविता यंत्रयुगातील कामगारांवर असून हाडांचे सापळे हे
निसःत्व कामगारांचे , मांसल लिंग हे पौरुषाचे, डोके हे बुध्दीमत्तेचे आणि अंगण हे
आकांक्षांचे प्रतिक आहे. हा अर्थ त्यांच्या बचावाच्या कैफियतीत सांगितला होता.
मर्ढेकरांच्या बाकी कविता व त्यांची पार्श्वभूमी बघता हा अर्थ पटण्यासारखा नाही.
बहुधा वकीलांच्या सल्ल्यावरून त्यांनी न्यायालयाला हा अर्थ सांगितला असावा. ह्या
खटल्यात मर्ढेकर जर दोषी ठरले असते तर त्यांना शिक्षा होउन त्यांची नोकरी सुध्दा
जाऊ शकली असती. आधीच डोक्यावर इंग्लंडमधील शिक्षणाकरता घेतलेल्या कर्जाचा बोजा
मर्ढेकरांवर असल्यामुळे व नोकरी शिवाय दुसरे उपजीवीकेचे साधन नसल्यामुळे नोकरी
जाणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे वकीलांचा उद्देश त्यांचा या खटल्यात बचाव करणे हा होता. खरा
अर्थ सांगितला असता तर सरकारी गोपनीयतेचा भंग केला असा ठपका त्यांच्यावर येउ शकला
असता. त्यात ते नोकरी करत असलेल्या सरकारी खात्यात त्यांचे अनेक हितशत्रू होते.
त्यांनी या गोष्टीचा नक्कीच फायदा उठवला असता. त्यामुळे त्यांनी हा कातडीबचाउ अर्ध
न्यायालयातील कैफियतीत सादर केला असावा. या संदर्भात, त्यांच्या पाणी या कादंबरीत
त्यातील नायक दुसऱ्या महायुध्दात कोणत्या रणभूमीवर लढला हे कळू नये म्हणून मर्ढेकरांनी
काही शक्कल लढविली आहे , असे काहींचे मत विशेष नोंद
घेण्यासारखे आहे. त्यावरून मर्ढेकर सरकारी कामाबध्दल किती गोपनीयता बाळगत हे
लक्षात येते.
वर उल्लेख केलेल्या जी.ए. कुलकर्णी यांनी भाषातरीत केलेल्या “ एक रात्र वैऱ्याची ” या पुस्तकातील काही परीच्छेद संदर्भ म्हणून खाली दिलेले
आहेत.
पान क्र. 210.
आमची अशी लाचार शुद्रावस्था करण्यासाठी त्यांनी (नाझींनी ) अतिशय निर्बुध्द पण
पाशवी शिस्तीचा अवलंब केला. लहरी मृत्यूची छाया आमच्यावर सतत ठेवली. विशेष म्हणजे
आमच्यापैकी बहुसंख्य कैदी स्त्री पुरुषांत अत्यंत बेशरम असा लिंगपिसाटपणा निर्माण
केला. आम्हा सगळ्याना अगदी नीच पातळीवर आणून हाच त्यांच्या साऱ्या धोरणाचा हेतू
होता, आणि त्यांच्या प्रयत्नात त्यांना मन थक्क करणारे यश मिळाले. साऱ्या आयुष्यभर
एकमेकांचे जिवलग असणारी माणसे आता एकमेकांचा जहरी द्वेष करू लागली. ब्रेडच्या एका
तुकड्यासाठी दोन सख्ख्या भावांमध्ये मरणांत झगडे झाले. इतरांच्या सुतळीच्या
तोड्याला हात न लावणारी अत्यंत चोख माणसे अगदी सराईतपणे करू लागली. ज्यू
कैदी-पहारेकरी ज्यू कैद्यालाच मारपीट करण्यात आनंद मानू लागले. आणि गर्दीत कुणाचा
धक्का लागू नये म्हणून अंग चोरणाऱ्या कुलीन स्त्रीया शिजलेल्या एका बटाट्यासाठी
आपली शरीरे पाहीजे त्याला जाहीरपणे आणि अत्यंत स्वस्त भावात विकू लागल्या होत्या.
बाहेरील जगाप्रमाणे बर्केनामध्ये नाझींची अत्यंत आवडती – “सत्ता म्हणजेच सत्य, बळी
तो कान पिळी “ हीच शिकवण अमलात होती. “ हातात सत्ता असली तरच आदर
प्राप्त होतो. जे दूर्बळ आहेत, वयस्क आहेत त्यांना दया मागण्याचा कसलाही हक्क
नाही. राष्ट्राला त्यांची बिलकुल गरज नाही, इतकेत नव्हे तर त्यांच्यापासून
राष्ट्राला सतत धोकाच आहे, कारण तसली माणसे राष्ट्राची रक्तशोषक असतात. “
छावणीतील प्रत्येक विभाग, प्रत्येक बराक, प्रत्येक गट म्हणजे एकेक भीषण जंगल
होते. इतर बाबतीत ती कितीही वेगळी असली तरी त्या सगळ्यात “ माणूस खातो माणूस “ हे एक सूत्र समानच होते.
या ठिकाणी उच्च स्थानी पोचायचे म्हणजे नाझींच्या आदर्श चित्राप्रमाणे व्हायचे अशी
महत्वाकांक्षा दिसत असे. आणि या मार्गात सद्सद्विवेकबुध्दी, कारूण्य, स्नेह,
विश्वास, मानवता असल्या कोणत्याही गुणांची अडगळ ठेवून हा प्रवास होऊ शकत नाही.
इजिप्तमध्ये पिरामिड बांधत असता हजारो गुलाम श्रमाने अगर उपासमारीने मेले
असतील. पण त्यांना निदान एक सुख तरी मिळाले असेल. आपण ज्या पिरामिडसाठी राबत आहोत,
तो आपण नेलेल्या दगडामुळे हातहात उच होत चालला आहे, ते तरी त्यांना पहायला मिळे पण
बर्केनामधील गुलामांना मात्र एका ठिकाणाहून नेलेले दगड पुन्हा त्याच ठिकाणी माघारी
आणावे लागत. त्यांना एकच गोष्ट तीव्रतेने
जाणवत असावी; असले निर्बुध्द, निष्फळ श्रम ! कैद्यांपैकी जे मनाने आणि शरीराने दुर्बळ होते त्याच्यात
दररोज ऱ्हास दिसू लागला, आणि शेवटी तर त्यांचे जीवन अगदी जनावराच्या पातळीवर गेले
व पोटभर ब्रेड खाणे हे एकच स्वप्न त्यांना अर्थपूर्ण वाटू लागले. आणि शेवटी तर
त्यांच्या अत्यंत प्रबळ अशा आकांक्षा तरी कोणत्या उरल्या ? …. अंगातील थंडी थोडी तरी
कमी व्हावी, मारपीट थोडी तरी टळावी, फळकुटे अंगात रूतू नयेत म्हणून आणखी मूठभर गवत
मिळावे आणि छावणीतील जुनाट, दूषित हौदामधीलच का होईना, आपल्याला एकट्यालाच
समाधानाने पिता येईल असे एक पूर्ण ग्लासभर पाणी मिळावे – एवढ्याच !
अवनतीचा हा भयानक खंदक नाझींनी निर्माण केला होता. त्याच्या काठावर अस्थिरपणे
उभे रहावे, पण कधीही आत पडू नये हे कठोर व्रत संभाळायला असामान्य नैतिक धैर्याची
आवश्यकता होती.
आणि आमच्यापैकी बहुतेकांकडे ते नव्हतेच !
पान क्र 178
प्रकरण 23 - दुसरी भूक
ज्या ज्या ठिकाणी स्त्री-पुरुष एकत्र येतात तेथे परस्पराविषयी आकर्षण निर्माण
व्हावे रा रक्ताचा धर्म आहे. बाजूला आगखाना धडाडत असतानादेखील या नैसर्गिक भावना
दडपल्या जाउ शकत नाहीत. बाजूला आगखाना धडाडत असतानादेखील या नैसर्गिक भावना
दडपल्या जाऊ शकत नाहीत. येथील प्रेम किंवा असल्या दूषित जागी त्याचे जे वेडेवाकडे
स्वरूप दिसते ते, नेहमीच्या जीवनात दिसणाऱ्या भावनेपेक्षा निराळे होते. आमच्यावर
सत्ता गाजवणाऱ्यांनी कैद्यांमधील किंचितशी असली भावनाही पूर्णपणे नष्ट करण्यासाठी
फार प्रयत्न केले. आमच्या अन्नात कसलीशी
पूड मिसळून आमच्या लैंगिक भावना मारण्याचे पध्दतशीर प्रयत्न झाले, अशी कुजबुज
सर्वत्र होती. छावणीतील अनेक तरूण, देखण्या व बहुधा नग्न कैद्यांना पाहून जर्मन
पहारेकरी व सैनिक चळू नयेत म्हणून त्यांच्या साठी खास जर्मन वेश्यागृहे होती.
वंशभेदाबध्दलची त्यांची खुळचट मते जगजाहीर होती, तरीही अनेक ज्यू स्त्री कैद्यांना
तशा ठिकाणी भरती करण्यात आले होते. अशा गृहांचा फायदा काही वेळा पुरूष – कैद्यांना
देखील मिळत असे, पण ती एक अतिशय दुर्मिळ अशी सवलत होती.
या बाबतीत असलेले विविध नियम आणि नियंत्रणे यांचा आमच्यावर कधी फारसा परीणाम
होत नसे. उलट आम्हाला सतत ज्या मानसिक दडपणाखाली रहावे लागे, त्यामुळे त्याबाबतीत
आम्हाला उत्तेजनच मिळाल्यासारखे होत असे.
छावणीतील स्त्री- पुरूषांच्या संबंधात बोलायचे झाल्यास येथे संस्कार, रूढी,
सामजिक सवयी यांचे कसलेच बंधन उरले नव्हते. प्रत्येकजण दुसऱ्या कैद्याला “ तू “ या सलगीच्या सर्वनामाने
संबोधत असे, आणि तेदेखील सरळ पहिले नाव घेऊन. ही सलगी म्हणजे आमच्यातील एकीचे
उदाहरण नव्हते. शिवाय तिच्यात ग्राम्यपणा कधीही नसे असेही नाही. जर्मन पहारेकरी
आणि सैनिक यांच्याखेरीज आम्हाला दिसणारे पुरूष म्हणजे छावणीत खड्डे खणणे, रस्ते
दुरूस्त करणे, लाकूडकाम असली कामे करणारे कामगार कैदी. आणि खरे म्हणजे मधल्या सुट्टीतच
काय ते एकत्र येण्याला आम्हाला संधी व वेळ मिळे. हे पुरूष कैदी शौचकूप अगर
अंघोळकोठड्या यांच्यासमोर बसून जेवण करत, आणि त्या वेळी एखाददुसऱ्या तुकड्याची
याचना करत निरनिराळ्या वयांच्या स्त्रीयांचा त्यांच्या भोवती एक घोळकाच घोंगावत
असे. या स्त्रिया तीनचार वर्तुळे करुन उभ्या रहात व भिकाऱ्याप्रमाणे हात पुढे करत.
काही देखण्या तरूणी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी गाणीसुध्दा म्हणत. अनेकदा कामगार
कैदी कनवाळूपणाने एखादा तुकडा त्यांच्यापुढे फेकत. त्यावेळी कुठे त्यांच्यापैकी
एखादीला बटाटा खायला मिळे. नाहीतर ती अत्यंत चैनीची चविष्ट वस्तू गटप्रमुख आणि
भटारखान्यात काम करणाऱ्या स्त्री – कैदी यांच्याखेरीज इतरांना अशक्य असे.
आपल्या तुटपुंज्या जेवणातील थोडा भाग देण्यामागे पुरूष-कैद्यांमध्ये केवळ
दयेचीच भावना होती असे नाही. या ठिकाणी अन्न हे दुसरी भूक भागवण्यासाठी वापरण्यात
येत असे. इतक्या हीन अवस्थेला पोचल्याबध्दल त्या बायकांना दोष देण्यात फारसा अर्थ
नाही. या साऱ्याची जबाबदारी मुख्यत्वे करून छावणीतील व्यवस्थेवरच पडते. ते काही का
असेना, छावणीत उघडपणे वेश्याव्यवसाय होताच, त्याशिवाय जवळजवळ तितक्याच उघडपणे
शरीरविक्रयदेखील चालत असे. आणि हे अस्तित्वात आले की मग गुप्त रोग, असले व्यवहार
पटवून देणारे मध्यस्थ, इत्यादी विशेष आलेच. “कॅनडा ” मध्ये ज्या वस्तू चोरल्या जात, त्यांचा उपयोग मुख्यत्वे
करून अशा स्त्रीयांना खूष करून सौदा पटविण्याकरीताच होई. स्नेह आणि निःस्वार्थी
प्रेम यांची उदाहरणेदेखील आहेत. परंतु प्रेमात कोवळीक अगर कुलीनता नसली, तरी
एखाद्या स्त्रीला प्रियकर मिळाला की तिला बराकीत बऱ्याच ऐटीचे स्थान प्राप्त होत
असे, कारण छावणीतील या विभागात फारच थोडे पुरूष उपलब्ध असत.
बहुतेक तरूण स्त्रिया फाजिल चावटपणा करण्याइतकी मजल गाठत. त्यांच्यात गटप्रमुख
असलेल्या स्त्रियांना जास्त संधी मिळे, कारण त्यांना रहाण्यासाठी लहान का होईना,
पण स्वतंत्र जागा असे आणि असल्या संधीचा उपयोग करण्यास त्यांना कसलाही संकोच वाटत
नसे. त्या आपल्या मर्जीतील कैद्यांना थोडा वेळ पहारा करण्यास सांगत व मग आपण स्वतः
पाहुण्यांची बडदास्त ठेवत. असल्या गुप्त भेटीत व्यत्यय येत नसे असे नाही. एखादा
जर्मन पहारेकरी येत असलेला दिसला की मैत्रिणीकडून इशारा येत असे. काही दिवशी तर
असे तीन चार अडथळे येत. पण त्यामुळे स्त्री काय, पुरूष काय, कुणी त्रस्त होऊन असले
मार्ग सोडले असे मात्र कधी घडले नाही. गटप्रमुख काही वेळा थोडा मोबदला घेऊन इतर
कुणाला तरी आपली जागा वापरायला देत असे.
सौंदर्यांच्या कल्पना ठिकठिकाणी बदलत असतात. बर्केना येथील जग तर सर्वच
दृष्टींनी इतरांपेक्षा वेगळे होते. या ठिकाणी जिचा बांधा चांगला ऐसपैस आहे आणि
जिच्यात प्रशस्त गुबगुबीतपणा आहे ती स्त्री सौंदर्य परिपूर्ण मानली जात असे. पुरूष
कैदी स्वतःच अगदी सांगाड्याप्रमाणे असत, आणि मग समोरदेखील तसलीच एखादी खंगलेली,
खोलगट गालांची व्यक्ती पहाताच त्यांची सारी इच्छा मरून जात असे. त्यामुळे ज्यांनी –
त्या फारच थोड्या होत्या -- आपले अंग थोडे
तरी अंग राखले आहे, त्याचा इतरांना अतिशय हेवा वाटे. असले ऐसपैस, मोकाट अंग कमी करण्यासाठी याच
स्त्रीयांनी एक वर्षांपूर्वी स्वतःवर खाण्याच्या बाबतीत अनेक जाचक नियम आनंदाने
घालून घेतले असते. सगळ्याच तुरुंगाप्रमाणे बर्केनात देखील विकृत सवयीची माणसे
होती. स्त्रियांपुरते बोलायचे झाल्यास त्यांच्यात तीन प्रकार दिसत. स्वभावतःच
समलिंगी सवयीच्या स्त्रिया, त्याचा एक लहानसा गट होता व त्यांच्याविषयी कोणालाही
कुतुहल नव्हते. दुसऱ्या गटातील स्त्रिया थोड्या त्रासदायक होत्या. येथील विशिष्ट
परीस्थितीमुळे त्यांच्या लैंगिक दृष्टीकोनात फरक गेला होता व आता त्या अनिवार अशा
शारीर गरजेपुढे हतबल झाल्या होत्या.
एके काळी फिजिक्सची प्रोफेसर असलेली एक पोलिश स्त्री आमच्या विभागात होती.
नाझींनी तिच्या नवऱ्याची हत्या केली होती, आणि तिच्या मुलांनादेखील तिच्यापासून
दूर ठेवण्यात आले होते. कदाचित त्यांचीदेखील कत्तल झाली असेल. येथील एका किरकोळ
अधिकाऱ्याने या नाजूक, सुरेख व बुध्दीमान स्त्रीकडे आपली नजर वळवली. त्याला होकार
दिला तर भूक भागवण्यासाठी आणखी थोडे अन्न मिळेल हे तिला समजत होते. तिने मोह
आवरण्याचा बराच प्रयत्नदेखील केला असेल, पण अखेर तिने मान्यता दिली. सहा
आठवड्यांनंतर ती आपल्या दोस्ताविषयी फार उत्साहाने बोलू लागली, आणि दोन
महीन्यांनंतर तर त्याच्याशिवाय जगणे अगदी अशक्य आहे असे तिने जाहीरपणे सांगितले.
पान क्र. 182
त्या वेळची परीस्थिती पाहिली, की मला वाटणारी
शिसारी अस्थानी व असंमजस होती असे मला वाटते. त्या किळसवाण्या क्षणिक सुखामुळे
स्त्री-पुरूष कैद्यांना काही काळ तरी सतत हजर असलेल्या मृत्यूच्या दाट सावलीचा
विसर पडत असे आणि त्या गोष्टीची तर छावणीमध्ये फार जरूरी होती.
पान क्र. 183
बर्केनाचे सारे जगच असे दूषित, नासलेले होते.
या ठिकाणी जर्मनांनी मानवाचा अत्यंत वैयक्तिक हक्कच तुडवून नष्ट केला होता. या
ठिकाणी प्रेम म्हणजे गुलाम कैद्यांना फसफसलेली क्षणिक झिंग आणि त्यांच्या मालकांना
क्षणिक मनोरंजन होऊन बसले होते.
पान क्र. 94
“ होय का ? आणि तुझे नाव काय ? “
ऑश्विझसारख्या
ठिकाणी असला प्रश्न फार विलक्षण होता. येथे आल्यावर आम्ही सगळ्याजणी नंबरवाले
सांगाडे झालो होतो. आज सांगाडे, व कुणाची लहर फिरताच होणारी तात्काळ प्रेते ! आम्ही माणसे आहोत, आम्हाला नावे देखील आहेत,
याची कधी कुणि दखलच घेतली नव्हती !
पान क्र. 43
आम्ही आता छावणीतील इतक्या दिवसांनंतर एखाद्या
टॉनिकच्या जाहिरीतीप्रमाणे गुटगुटीत गुलाबी दिसत नव्हतो. झिजून गेलेल्या
सांगाड्यांची रांग समोरून सरकत असता ते निवड कशी करत, कुणास ठाऊक !
पान क्र. 84
छावणीत आल्यावर अगदी थोड्या दिवसात बहुतेक कैदी
सांगाड्याप्रमाणे दिसत असत.
No comments:
Post a Comment