Sunday, April 3, 2011

मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

        झोपली ग खुळी बाळे,
        झोप अंगाईला आली ;
         जड झाली शांततेची
         पापणी ह्या रीत्या वेळी.

            चैत्र बघतो वाकून
                निळ्या नभातून खाली;
                आणि वाऱ्याच्या धमन्या
           धुकल्या ग अंतराळी,

    शब्द अर्थाआधी यावा
    हे तो ईश्वराचे देणे ;
    पेंगणाऱ्या प्रयासाला
    उभ्या संसाराचे लेणे.

     चैत्र चालला चाटून
     वेड्या सपाट पृथ्वीला,
      आणि कोठे तरी दूर
      खुजा तारा काळा झाला,

आता भ्यावे कोणीं कोणा !
भले होवो होणाऱ्याचे;
तीरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे.

   चैत्र चढे आकाशात
   नी़ट नक्षत्र पावली;
   आणि निळ्या वायूतून
   वाट कापी विश्ववाली.

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती;
चाळणीत चाळणी अन्
विचारात तरी माती.
        चैत्रबापा, उद्या या हो
         घेउनीया वैशाखाला;
         -- आंबोणीच्या मागे कां ग
           तुझा माझा चंद्र गेला ? –

  आंबोणीच्या मागे पण
  अवेळी का चंद्र गेला ?

बा. सी. मर्ढेकर

    ही कविता मर्ढेकरांच्या दूर्बोध कवितांपैकी एक मानली जाते.  पहील्या दोन ओळी वरून असा समज होतो की ह्या ओळी अंगाई गीत ऐकून झोपी जाणाऱ्या  कुणा बाळांच्या संदर्भात आहेत. ही अशी कोण बाळे आहेत की जी झोपल्यावर प्रत्यक्ष अंगाईलाच झोप आली आणि शांततेचीच पापणी जड झाली. अशी ही बाळे खुळी का आहेत ?
      ह्या कवितेतील  चैत्राची प्रतिमा कशाकरीता वापरली आहे ? 
     तसेच कवितेत उल्लेख केलेले वे़डे विद्रे मन कोणाचे आहे ?  हे वेचे काय आहेत आणि ते कोण हाकारत आहे व ही चिंचोळी तीरीमीरी कोणाची आहे ?
     ह्या कवितेतील प्रतिमांचा व संदर्भांचा शोध घेताना मी एका वेगळ्याच अर्थापाशी पोहोचलो.

     एक सामान्य वाचक  म्हणून , ह्या कवितेचा मला समजलेला अर्थ काय आहे हे पुढील लेखात  देणार  आहे. माझा अर्थ बरोबरच असेल असा माझा दावा नाही. व इतरांनी तो मानावा असा माझा आग्रह नाही. अखेर कवितेचा अर्थ हा एखाद्या कॅलिडोस्कोपमधून (शोभादर्शक यंत्र) दिसणाऱ्या दृष्याप्रमाणे असतो. कॅलिडोस्कोप फिरवावा तशी त्यातील दृष्ये वेगळी दिसतात. प्रत्येकाचा कॅलिडोस्कोप वेगळा असतो.
      मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट   (बॅलिस्टीक मिसाइल)  आहेत. भारतीय , अमेरीकन  शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे.  जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
      ह्या कवितेवरील विस्तृत लेख दि. ४ एप्रिल २०११ ला ह्या ब्लॉगवर प्रसिघ्द करण्यात येईल.
    

1 comment:

  1. म.वा.धोंड ह्यांनी ललितच्या एका दिवाळी अंकात (१९९० चे दशक) ह्या कवितेची मीमांसा केली होती। त्यानुसार ह्या कवितेला मर्ढेकरांच्या (दुरावलेल्या) बायकोचा आणि संसाराचा संदर्भ आहे असं प्रतिपादन केलं होतं.

    ReplyDelete