Saturday, December 10, 2011

मर्ढेकरांच्या पिंपात मेले ओल्या उंदिर कवितेवरील लेखातील संदर्भ

 ह्या ब्लॉगवरील  मर्ढेकरांच्या पिंपात मेले ओल्या उंदिर ह्या कवितेवरील लेखात उल्लेख केलेल्या नाझी कॉन्सट्रेशन कँप्स्  1945 ह्या डॉक्युमेंटरीचा संदर्भ आलेला आहे.  ही चित्रफित पहाण्याकरीता खालील फोटोवर क्लिक करा.

ह्या ब्लॉगवरील पिंपात मेले ओल्या उंदिर कवितेवरील लेखासाठी येथे क्लिक करा

                                          नाझी कॉन्सट्रेशन कँप्स् 1945 डॉक्युमेंटरी 

Nazi Concentration Camps Documentary Shotlist

Reel 1:

Army Lt. Col. George C. Stevens, Navy Lt. E. Ray Kellogg and U.S. Chief of Counsel Robert H. Jackson read exhibited affidavits which attest to authenticity of scenes in film. Map of Europe shows locations of concentration camps in Austria, Belgium, Bulgaria, Czechoslovokia, Danzing, Denmark, France, Germany, Isle of Jersey, Latvia, Netherlands, Poland and Yugoslavia. At Leipsig Concentration Camp, there are piles of dead bodies, and many living Russian, Czechoslovakian, Polish and French prisoners. At Penig Concentration Camp, Hungarian women and others display wounds. Doctors treat patients and U.S. Red Cross workers move them to German Air Force hospital where their former captors are forced to care for them.

Reel 2:

At Ohrdruf Concentration Camp, inspection team composed of Allied military leaders, members of U.S. Congress and local townspeople tours camp. Among them are Generals Dwight David Eisenhower, Supreme Headquaters Allied Expeditionary Forces commander; Omar Nelson Bradley; and George S. Patten. General Eisenhower speaks with Congressmen. They see bodies heaped on grill at crematorium and Polish, Czechoslovakian, Russian, Belgian, German Jews and German political prisoners. Col. Heyden Sears, Combat Command A, 4th Armored Division commander, forces local townspeople to tour camp. U.S. officers arrive at Hadamar Concentration Camp, where Polish, Russian and German political and religious dissidents were murdered. Maj. Herman Boelke of U.S. War Crimes Investigation Team (WCIT) examines survivors. Bodies are exhumed from mass graves for examination, identification and burial. Four-man panel interviews facility director Dr. Waldman and chief male nurse Karl Wille.

Reel 3:

At Breendonck Concentration Camp, Belgium, methods of torture are demonstrated. At Harlan Concentration Camp near Hannover, U.S. Red Cross aides Polish survivors. Allied troops and able-bodied survivors bury dead. At Arnstadt Concentration Camp, German villagers are forced to exhume Polish and Russian bodies from mass graves.

Reel 4:

At Nordhausen Concentration Camp, there are piles of bodies. Troops treat, feed and remove survivors who are mainly Polish, Russian and French. At Mauthausen Concentration Camp, Navy Lt. Jack H. Taylor stands with fellow survivors and describes his capture, imprisonment and conditions at Mauthausen. Volunteers bathe victims.

Reel 5: 
At Buchenwald Concentration Camp, Army trucks arrive with aid for survivors. Piles of dead, mutilated and emaciated bodies. Some survivors among dead. Huge ovens and piles of bone ash on floor of crematorium. Civilians from nearby Weimar are forced to tour camp. They see exhibits of lampshades made of human skin, and two shrunken heads.

Reel 6:
British commander of Royal Artillery describes conditions at Bergen-Belsen Concentration Camp. German Army Schutzstaffel (SS) troops are forced to bury dead and aid survivors. Woman doctor, former prisoner, describes conditions in female section of camp. Belson commander Kramer is taken into custody. German guards bury dead. Bulldozer pushes piles of bodies into mass graves.



Sunday, October 16, 2011

मर्ढेकरांची कविता - पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी

मर्ढेकरांच्या कवितांत प्रतिमांचा वापर मुक्तपणे केलेला आहे. किंबहुना कवितेत प्रतिमांचा वापर ही मर्ढेकरांची मराठी काव्याला देणगी आहे.  "पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी "  ही कविता तशी दुर्बोधच मानली जाते.  मर्ढेकरांच्या अशा कवितांची त्या काळात टीकाकार व समीक्षकांकडून  खिल्ली उडवण्यात आली होती. व काही कवितांवर अश्लीलतेच्या नावाखाली खटला भरण्यात आला होता.  ह्या संदर्भात कवितेतील प्रतिमांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.

पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी,
तरी पंपतो कुणि काळोख ;
     हसण्याचे जरी वेड लागलें,
     भुंकतात तरी अश्रू चोख.

फतकन् बसली रबरी रात्र ;
 दुजी न टायर ह्या अवकाशीं ;
         राठ मनाच्या चाटित बसलीं
      पापुद्र्यांच्या कुत्री राशी.

खांद्यावरती न्यावी रात्र
जमेल ज्याला त्याने त्याने ;
     डोळ्यावरती जरा कातडें
     ओढावे, - पण हसतमुखाने.
पंक्चरलेल्या रबरी रात्रीं
गुरगुरवावीं रबरी कुत्रीं ! !



ही कविता मर्ढेकरांनी त्यांच्या कवितेवर होणाऱ्या टीकाकारांना उद्देशून केली असावी. मर्ढेकरांची कविता दुर्बोध व अश्लील आहे अशी त्या काळातील समीक्षक व टीकाकारांनी टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांच्या कवितेची खिल्ली उडवण्यात येत होती व त्यांच्या कवितेला अनेक साहीत्यीक हसत होते.

पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी,
तरी पंपतो कुणि काळोख

ह्या ओळीतील रात्र म्हणजे मर्ढेकरांची कविता आहे. त्यांची कविता दुर्बोध असून सहजासहजी समजण्यासारखी नाही ह्याची मर्ढेकरांना कल्पना आहे ती कविता रात्रीच्या अंधारासारखी गूढ आहे. हया कवितेचा थोडाफार अर्थ लावण्याचा प्रयत्न काही  दिव्यांनी म्हणजेच अभ्यासकांनी केला.पण ह्याचा परीणाम असा झाला की त्यांची कविता मूळ अर्थच हरवून बसली. तीचा खरा अर्थ कोणालाही समजला नाही. पंक्चरली ह्या शब्दाचा अर्थ असा असावा. तर काही टीकाकारांनी कवितेत काळोख पंपण्याचा उद्योग केला.  ह्याचा अर्थ असा असावा की दुर्बोध असलेली कवितेवर अनेक प्रकारे टीका करून आणखी दुर्बोध बनवली व अभ्यासकांना खऱ्या अर्थापासुन दूर नेले. सामान्य वाचकांचा टीकाकार व समीक्षकांवर विश्वास असल्यामुळे, ह्या कवितांचा अर्थ , ते सांगतील तोच समजण्यात आला. त्यामुळे कवितेच्या खऱ्या अर्थापासून वाचक वंचित राहीले.

     हसण्याचे जरी वेड लागलें,
     भुंकतात तरी अश्रू चोख.

मर्ढेकरांच्या अनेक कवितांची खिल्ली उडविण्यात येऊन त्यांना हास्यास्पद ठरविण्यात आले होते. कसलाही अर्थ समजून न घेता, त्यांच्या कवितांची टर उडविण्याच्या वृत्तीला हसण्याचे वेड म्हणले आहे. काही टीकाकारांनी त्याच्या कवितांना अश्लील ठरवून नक्राश्रू ढाळले व मराठी साहित्यात अश्लीलतेचा प्रवेश झाल्यावध्दल गळा काढला. त्यांनी मर्ढेकरांना मराठी साहित्यातील खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. अशा टीकाकारांच्या भुंकण्याचा परीणाम मात्र चोख झाला. मर्ढेकरावर त्यांच्या कवितेत असलेल्या अश्लीलतेवरून खटला भरण्यात आला.

      फतकन् बसली रबरी रात्र ;
        दुजी न टायर ह्या अवकाशीं ;

टीकाकारांच्या अशा दृष्टीकोनामुळे त्यांची कविता मूळ अर्थच गमावून बसली. एखादी रबरी टायर ट्युब पंक्चर झाल्यानंतर खाली बसते, त्याप्रमाणे त्यांच्या कवितेची स्थिती झाली. असे असली तरी मर्ढेकरांना स्वतःच्या कवितांबध्दल सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कवितेसारखी कविता, मराठी साहित्याच्या अवकाशात दुसरी कोणतीही नाही असे त्यांना म्हणायचे आहे.. दुजी न टायर ह्या अवकाशीं ह्या वाक्याचा अर्थ असा असावा..

             राठ मनाच्या चाटित बसलीं
            पापुद्र्यांच्या कुत्री राशी.

ह्या ओळीतील कुत्री म्हणजे कवितेची निंदा करणारे टीकाकार असावेत. त्याची मने संवेदनाहीन आहेत म्हणजेच राठ आहेत. ही कुत्री पापुद्र्यांच्या राशी चाटत आहेत म्हणजेच हे लोक कवितेतील शब्दरूपी पापुद्रेच बघत आहेत. ह्या शब्दांच्या मागे कोणता अर्थ दडलेला आहे ह्याचा कोणीही शोध घेतलेला नाही.
     खांद्यावरती न्यावी रात्र
    जमेल ज्याला त्याने त्याने

 मर्ढेकरांच्या ह्या ओळी कवितेच्या वाचकांना उद्देशून आहेत. ज्या वाचकांना जमेल, त्यांनी स्वतः कवितेचा अर्थ स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करावा. खांद्यावर न्यावी रात्र ह्या ओळीचा अर्थ असा आहे. मर्ढेकरांना कल्पना आहे की ही कविता सर्वांना समजेलच असे नाही. म्हणून ज्याला जमेल अशा वाचकाने कवितेचा शब्दापलीकडला अर्थ जाणून घ्यावा.

     डोळ्यावरती जरा कातडें
        ओढावे, - पण हसतमुखाने.

ह्या कविता समजून घेण्यासाठी  डोळ्यावरती कातडे ओढावे म्हणजेच टीकाकारांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करावे . ह्याचा दुसरा असाही अर्थ होतो की ह्या कवितेला दुसऱ्या कवितांचे मापदंड लावू नयेत. ही कविता वेगळीच आहे. कविता समजावून घेण्याकरीता तिचा विचारही वेगळाच करावा. मर्ढेकरांनी असेही सांगीतले आहे की ह्या कवितेला हसतमुखाने सामोरे जा म्हणजेच मोकळ्या मनाने कवितेवर विचार करा. ज्याप्रमाणे रात्र पडल्यानंतर अंधाराची सवय होउन, हळू हळू अंधारातही दिसू लागते, त्याप्रमाणे कोणत्याही टीकाकाररूपी दिव्याच्या उजेडाशिवाय ही कविता समजू लागेल. - पण हसतमुखाने   “ ही कविता समजण्याकरीता पूर्व अट आहे. उगाच सतत एरंडेल पील्यासारखा  चेहरा करून कुठल्यातरी गंभीर विषयावर तात्वीक चर्चा करत बसणाऱ्यांकरीता ही कविता नाही.

       पंक्चरलेल्या रबरी रात्रीं
          गुरगुरवावीं रबरी कुत्रीं ! !

वरील ओळींचा संदर्भ मर्ढेकरांच्या कवितेवर झालेल्या समीक्षकांच्या वादविवादांशी आहे. अनेक टीकाकारांनी मर्ढेकरांच्या कवितेवर टीका केली. मर्ढेकर या टीकांकारांना उत्तर देण्याच्या फंदात कधीही पडले नाहीत. त्यांनी त्यांच्या कवितांचा अर्थ ही कधी सागितला नाही. मर्ढेकरांनी टीकेला भीक न घालता, कविता स्वतःला पाहिजे तशाच लिहील्या व आणखी टीका ओढवून घेतली. मर्ढेकरांना त्या टीकेची मजा वाटत असावी. ह्यातली  कु्त्री म्हणजे टीकाकार आहेत. हे टीकाकार तज्ञाच्या आवेशात टीका करत आहेत पण त्यांना कवितेचा गाभाच कळलेला नाही. ते सुडोइंटलेक्चुअलस् आहेत. रबरी हे विशेषण ह्या अर्थाने वापरले असावे. गुरगुरवावी ह्या शब्दाला खास अर्थ आहे. ह्या कुत्र्यांना कोणीतरी गुरगुर करायला उत्तेजन देतो आहे. हे कुत्र्यांना गुरगुरवणारे कोण आहे. हे स्वतः मर्ढेकरच आहेत. तेच शातपणे त्यांच्यावर होणाऱ्या निरर्थक टीकेकडे मजेने बघत आहेत. मर्ढेकर त्याच्या टीकाकारांना उत्तर देउन कधीही गप्प बसवू शकले असते. पण त्यात कसलीच मजा राहीली नसती. ओळीच्या शेवटी असलेल्या दोन उदगारवाचक चिन्हांचा बहुधा हा अर्थ असावा.

Sunday, April 3, 2011

मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

   झोपली ग खुळी बाळे,
   झोप अंगाईला आली ;
   जड झाली शांततेची
   पापणी ह्या रीत्या वेळी.

         चैत्र बघतो वाकून
           निळ्या नभातून खाली;
           आणि वाऱ्याच्या धमन्या
        धुकल्या ग अंतराळी,

   शब्द अर्थाआधी यावा
   हे तो ईश्वराचे देणे ;
   पेंगणाऱ्या प्रयासाला
   उभ्या संसाराचे लेणे.

       चैत्र चालला चाटून
        वेड्या सपाट पृथ्वीला,
       आणि कोठे तरी दूर
        खुजा तारा काळा झाला,

   आता भ्यावे कोणीं कोणा !
   भले होवो होणाऱ्याचे;
   तीरीमिरीत चिंचोळ्या
   काय हाकारावे वेचे.

      चैत्र चढे आकाशात
      नी़ट नक्षत्र पावली;
      आणि निळ्या वायूतून
      वाट कापी विश्ववाली.

   वेड्याविद्र्या नि वाकड्या
  मनाआड मने किती;
  चाळणीत चाळणी अन्
  विचारात तरी माती.
        चैत्रबापा, उद्या या हो
         घेउनीया वैशाखाला;
         -- आंबोणीच्या मागे कां ग
           तुझा माझा चंद्र गेला ? –

  आंबोणीच्या मागे पण
  अवेळी का चंद्र गेला ?

बा. सी. मर्ढेकर


मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट   (बॅलिस्टीक मिसाइल)  आहेत. भारतीय , अमेरीकन  शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
     पहील्या दोन ओळी वरून असा समज होतो की ह्या ओळी अंगाई गीत ऐकून झोपी जाणाऱ्या  कुणा बाळांच्या संदर्भात आहेत. ही अशी कोण बाळे आहेत की जी झोपल्यावर प्रत्यक्ष अंगाईलाच झोप आली आणि शांततेचीच पापणी जड झाली. अशी ही बाळे खुळी का आहेत ?
       ही बाळे म्हणजे चक्क अणुबाँब आहेत. ही कविता समजण्याकरीता खालील संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. हे सर्व संदर्भ दुसरे महायुध्द संपतानाचे म्हणजेच १९४५ सालातील आहेत. दुसऱ्या महायुध्दाचे पाऱडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत चालले होते. अशा वेळी दोन्ही बाजू विजयाकडे नेउ शकणाऱ्या शस्त्राच्या संशोधनात मग्न होत्या. १६ जुलै १९४५ या दिवशी, अमेरीकेने  न्यू  मेक्सीकोत जगातील पहील्या अणुबाँबचा चाचणीकरीता स्फोट केला. ही अणुचाचणी यशस्वी रीत्या पार पडली. ही बातमी अमेरीकेचे तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्ऱुमन यांनी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना एका संदेशाद्वारे कळवली. ही बातमी कळविताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. ट्ऱुमन यांच्या संदेशात अणुचाचणीचा  उल्लेख सुध्दा नव्हता. तो संदेश सांकेतीक होता. त्यात एवढेच लिहीले होते  की  बाळे सुखरूप जन्माला आली आहेत. (Babies are born satisfactorily).  चर्चिल यांच्या सचिवाने त्यांना ह्या सांकेतीक संदेशाचा अर्थ समजावून सांगीतला.

    ह्या कवितेचा अर्थ लक्षात येण्यासाठी खालील व्यक्ती , घटना व काही संदर्भांची माहीती असणे आवश्यक आहे.

जे. रॉबर्ट ऑपेनहायमर -  हा एक अमेरीकीन सैध्दांतीक भौतीकी शास्त्रज्ञ ( Theoretical  Physicist) होता. तो कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतीकी शास्त्राचा प्रध्यापक होता. तो दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अमेरीकेच्या मॅनहॅटन प्रकल्पाचा संचालक होता. मॅनहॅटन प्रकल्पात जगातील पहीले अण्वस्त्र विकसीत करण्यात आले. त्यामुळे ऑपेनहायमरला अण्वस्त्रांचा जन्मदाता मानण्यात येते. जेव्हा मेक्सीकोच्या वाळवंटात पहीली अणुचाचणी यशस्वी झाली तेव्हा त्याला भगवतगीतेतील प्रसिध्द  श्लोकाची आठवण झाली होती. ( हा संदर्भ कवितेचा अर्थ समजावून घेताना येइल.) ह्याच्याक़डे असाधारण विद्वत्ता होती. त्याचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क मधील प्रसिध्द  एथिकल कल्चर फिल्डस्टोन स्कूल या शाळेत झाले.  ह्या शाळेच्या संस्थापकाच्या मते ह्या शाळेचे धेय्य़ असे होते की , विद्यार्थ्यांचा अशा रीतीने विकास करणे की ते आजूबाजूच्या समाजात  उच्च  नैतिक बदल घडवून आणण्यास सक्षम बनतील . त्याला मानव्यशास्त्र , मानसशास्त्र , तत्वज्ञान, विज्ञान इत्यादी विषयात गती होती. त्याला ग्रीक वास्तुकला, वाग्मय , कला इत्यादी विषयात रस होता. त्याने १९३३ साली संस्कृतचा अभ्यास केला. त्यानंतर तो गीता संस्कृतमधून शिकला. त्याच्या आयुष्यावर गीतेतील तत्वज्ञानाचा खोल परीणाम झाल्याचे , त्याने एका व्याख्यानात सांगीतले होते. हारवर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तो इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पदव्यूत्तर अभ्यासासाठी गेला. तेथे त्याच्या प्राध्यापका बरोबर त्याचा वारंवार विसंवाद होत असे. हा प्राध्यापक त्याच्यापेक्षा काही वर्षांनीच मोठा होता. एके दिवशी ऑपेनहायमरने ह्या प्राध्यापकास अमली पदार्थ घातलेले सफरचंद खायला दिले. त्या प्राध्यापकाने ते खाल्ले नाही. ह्या घटनेनंतर ऑपेनहायमरला लंडनमध्ये मानसोपचार तज्ञाकडे उपचाराकरीता पाठवण्यात आले. त्यानंतर तो जर्मनीतील गॉटीनजेन विद्यापीठात शिकण्याकरीता गेला. १९२७ साली वयाच्या २३ व्या वर्षी डॉक्टरेट मिळाली. त्या पदवीच्या तोंडी परीक्षेनंतर त्याच्या प्राध्यापकांनी सुटकेचा निश्वास टाकला. कारण तो प्राध्यापकांनाच प्रतिप्रश्न करायला लागला होता. त्यानंतर त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले येथे अध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्याच्या तेथील कार्यामुळे त्याला अमेरीकन सैध्दांतीक भौतीकी शास्त्राचा जनक मानण्यात येउ लागले.
       परंतु तो आयुष्यभर भावनीक रीत्या अस्थिर होता. त्याला वारंवार नैराश्याने ग्रासलेले असायचे. त्याला मित्रांपेक्षा भौतीक शास्त्राची जास्त गरज आहे असे त्याने एकदा सांगितले होते. त्याला नेहमी असुरक्षित वाटत असे. तो  सतत धुम्रपान करत असे व खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करत असे.  त्याच्या मित्रांना व सहकाऱ्यांना त्याच्या अशा वागण्याची काळजी वाटायची. त्याच्या  सहकाऱ्यांच्यात दोन मतप्रवाह होते. काहींना तो अती बुध्दीमान व कलाप्रेमी वाटायचा. तर काहींना तो ढोंगी व ना़टकी वाटायचा. तो केब्रीजमध्ये शिकत असताना पॅरीसला मित्राला भेटायला गेला होता. तेव्हा मित्राला स्वतःच्या निराश अनुभवा बध्दल सांगताना तो त्या मित्राच्याच अंगावर धावून गेला.  तेव्हा त्याच्या मित्राच्या लक्षात आले की , ह्याचे मानसीक संतुलन बिघडले आहे.
          त्याचे राजकीय विचार साम्यवादाकडे झुकलेले होते. १९३० साली त्या काळातील अनेक बुध्दीवाद्या प्रमाणे तो सामाजिक सुधारणांचा पुरस्कर्ता झाला. याच सामाजिक सुधारणांवर पुढील काळात साम्यवादी कल्पना असल्याचा आरोप झाला. १९३७ साली त्याच्या वडिलांच्या मृत्युनंतर त्याला वारसाहक्काने मिळालेली लाखो डॉलर्सची संपत्ती त्याने अनेक प्रगतीशील उपक्रमांना दान केली. त्यामुळे त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा शिक्का बसला. तो कम्युनिस्ट पक्षाचा कधीही सदस्य झाला नाही. परतु त्याने अप्रत्यक्षपणे त्याच्या मित्रांकरवी पक्षकार्याला आर्थिक मदत केली.
त्याचा भाऊ , त्याची पत्नी व त्याचे अनेक मित्र आणि विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. त्याची राजकीय विचारसरणी  रॅडिकल होती.


सुब्रह्मण्यन चंद्रशेखर (चंद्रा) हा एक जन्माने भारतीय पण अमेरीकेन नागरीकत्व स्वीकारलेला भौतिकी शास्त्रज्ञ होता. जन्म  १९ ऑक्टोबर,१९१० , मृत्यू २१ ऑगस्ट,१९९५. हा त्याच्या मित्र मंडळीत चंद्रा या नावाने प्रसिध्द होता.   ह्याला १९८३ साली भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हे  पारितोषिक ताऱ्यांची सैध्दांतीक रचना व उगमा बध्दल होते. हा, भारतीय शास्रज्ञ सर सी. व्ही. रामन ह्यांचा पुतण्या होता. १९३० साली मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेज मधून पदवी मिळाल्या नंतर, त्याला इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. १९३३ साली त्याला केंब्रिज विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी मिळाली. १९३३ ते १९३७ या काळात केंब्रिज मधील प्रसिध्द ट्रीनीटी कॉलेज मध्ये प्राइझ फेलोशिप मिळाली. १९३७ साली तो अमेरीकेतील शिकागो विद्यापीठात प्राध्यापक झाला. त्याला १९५३ साली अमेरीकन नागरीकत्व मिळाले. तो शेवटपर्यंत म्हणजे १९९५ पर्यंत शिकागो विद्यापीठात शिकवत होता.
       ह्याने १९३५ साली केंब्रिजमध्ये शिकत असताना रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सभेत एक क्रांतीकारी शोधनिबंध सादर केला. हा शोधनिबंध श्वेत बटू (White Dwarf)  अथवा खुज्या ताऱ्या  बध्दल  होता. जेव्हा एखाद्या ताऱ्याच्या केंद्रस्थानातून अणु विभाजनामुळे निर्माण होणाऱ्या उर्जेचे उत्सर्जन थाबते तेव्हा अशा ताऱ्याला खुजा तारा म्हणतात. हा तारा त्याच्या मृत्युकडे वाटचाल करीत असतो. हा तारा थंड झाल्यानंतर प्रकाश व उर्जा उत्सर्जन करण्याचे थांववतो. त्यानंतर तो केवळ अवकाशातील अवशेषाच्या रूपात अस्तीत्वात आहे असे मानले जाते.  अशा ताऱ्याला काळा खुजा तारा (Black Dwarf)  म्हणतात. हा काळा तारा प्रत्यक्षात अस्तीत्वात नसतो. त्याचे अस्तित्व हे केवळ गृहीतक (hypothesis) आहे.   खुज्या ताऱ्याचे वस्तुमान एका विशिष्ठ मर्यादेच्यावर असू शकत नाही हा शोध चंद्रशेखरने लावला. ह्या मर्यादेला खगोल शास्त्रीय जगतात चंद्रशेखर मर्यादा (Chandrashekhar Limit) या नावाने ओळखले जाते. हा शोधनिबंध जेव्हा सभेपुढे सादर करण्यात आला, तेव्हा या सभेत सर ऑर्थर एडिंगटन या तत्कालीन प्रसिध्द ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञाने केवळ अहंकार व आकसापोटी ह्या सिध्दांताला विरोध केला. सर ऑर्थर एडिंगटन ह्यांचा शब्द , शास्रज्ञांच्या वर्तुळातील दबदब्यामुळे अखेरचा मानला जात असे. या घटनेचा चंद्रशेखरच्या व्यक्तीगत आयुष्यावर खोल परीणाम झाला. पुढील काळात हा सिध्दांत सर्व  जगाने  मान्य केला. ह्या सिध्दांताबध्दल १९८४ साली त्याला नोबेल पारितोषिक मिळाले.

   दुसऱे महायुध्द चालू असताना त्याला अमेरीकेतील मॅरीलँड येथील  बॅलिस्टीक संशोधन प्रयोगशाळेत संशोधनाकरीता आमंत्रीत करण्यात आले. ह्या प्रयोगशाळेत अमेरीकन लष्कराकरीता रॉकेट्स, क्षेपणास्त्रे इत्यादी अतिसंहारक व विध्वंसक  शस्त्रास्त्रांवर गुप्त संशोधन चालत असे. त्याचा जरी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानावर विश्वास होता, तरीही त्याला असे वाटत होते की नाझी जर्मनीचा पराभव करणे हेच योग्य उद्दीष्ट आहे. त्यामुळे हे आमंत्रण त्याने स्वीकारले व युध्दकाळात तेथे संशोधन चालू ठेवले. त्यानंतर त्याला लॉस आलामॉस प्रयोगशाळेत अण्वस्त्रांवरील संशोधना करीता बोलाविण्यत आले. या प्रयोगशाळेत ऑपेनहायमरच्या मार्गदर्शनाखाली  जगातील पहील्या अणुबॉंबच्या निर्मिती बध्दल संशोधन अतीशय गुप्तपणे  चालू होते. परंतु काही सुरक्षा चाचण्यामुळे तो तेथे जाउ शकला नाही. अमेरीकेत त्याला वर्णद्वेषाला तोंड द्यावे लागले.त्याच्या वडीलांनी तो भारतात परत यावा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. अखेर १९५३ साली त्याला अमेरीकेचे नागरीकत्व मिळाले. अमेरीकेच्या अंतरीक्ष संशोधन संस्थेने (NASA) चंद्रशेखरच्या सन्मानार्थ अवकाशात संशोधनाकरीता  सोडलेल्या एका उपग्रहावरील प्रयोगशाळेला  चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी (वेधशाळा) असे नाव दिले आहे. ही वेधशाळा अवकाशात भ्रमण करत असून त्या प्रयोगशाळेत असलेल्या शक्तीशाली एक्सरे दुर्बीणीला चंद्रा एक्सरे टेलीस्कोप या नावाने ओळखले जाते.

व्ही वन रॉकेट हिटलरला दुसऱ्या महायुध्दात निर्णायक विजय मिळवण्यासाठी अशा एका अस्राची गरज होती की त्या अस्राला घाबरून ब्रिटन शरणागती पत्करेल. अशा अस्राचा शोध लावण्यासाठी जर्मन शास्रज्ञ अहोरात्र झटत होते. अखेर या संशोधनातून व्ही वन हे अस्त्र जन्माला आले. ह्या रॉकेटसचा लंडन शहरावर सतत मारा करण्यात आला. हे रॉकेट लंडनमध्ये फ्लाइंग बाँब किंवा बझ बाँब म्हणून ओळखले जायचे. हया रॉकेटसमुळे लंडनमध्ये सुमारे २५००० निरपराध माणसे मारली गेली व लाखो घराचे नुकसान झाले. हे रॉकेट एखाद्या विमानासारखे दीसायचे. ते पायलट विरहीत होते.  त्याला जेट इंजीन बसवलेले होते. त्यात सुमारे एक टन वजनाचा दारूगोळा भरलेला असायचा.  ते एखाद्या बाँबर विमानातून डागले जायचे किंवा खास बनविलेल्या लाँचींग पॅडवरून उडवले जायचे. त्यात बसविलेली ऑटोपायलट यंत्रणा त्याला निर्देशीत लक्ष्यापर्यंत घेउन जायची. हे रॉकेट जमिनीपासून सुमारे ३००० फूट उंचीवरून उडायचे. लक्ष्यापर्यंत आल्यावर त्याचे इंजीन ऑटोपायलटच्या सहाय्याने बंद केले जायचे. इंजीन बंद झाल्यानंतर हे ऱॉकेट जमिनीच्या दिशेने खाली जाउ लागायचे. जमिनीपासून विविक्षीत उंचीवर आल्यावर त्यातील बाँबसचा स्फोट व्हायचा. असा जमिनीपासून वर स्फोट होत असल्यामुळे त्याची विध्वंसकक्षमता खूपच जास्त होती. त्याच्या वर विमानविरोधी तोफांचा काहीही परीणाम व्हायचा नाही. तसेच ब्रिटीश फायटर विमाने पण त्याच्यापुढे निष्प्रभ ठरत होती. ह्या रॉकेटसच्या हल्ल्यापासून बचावाकरीता लंडन शहरावर बलून्सच्या सहाय्याने लोखंडी जाळी टांगण्याचा प्रयोग करण्यात आला होता.

व्ही टू क्षेपणास्त्र  - व्ही वन रॉकेटनंतर जर्मन शास्त्रज्ञांनी या क्षेपणास्राचा शोध लावला. हे जगातील पहीले बॅलिस्टीक तत्वावर चालणारे क्षेपणास्र होते. हे पृथ्वी पासून ८५ किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या वातावरणाबाहेर   अवकाशात  जायचे. एक ठराविक उंची गाठल्यानंतर ते त्याच्या लक्ष्याच्या दिशेने खाली पृथ्वीक़डे येउ लागायचे व पृथ्वीच्या वातावरणात परत प्रवेश करायचे. व त्यानंतर लक्ष्यावर आदळायचे.  याचे वजन १३ टन होते. त्याची संहारक शक्ती व्ही वन पेक्षा अनेक पटी ने जास्त होती. हे क्षेपणास्र  दुसरे महायुध्द संपण्याच्या वेळी प्रत्यक्ष उपयोगात आल्यामुळे त्याचा फारसा प्रभाव पडू शकला नाही. लंडनवर अशा अनेक रॉकेटसचा हल्ला झाला. या हल्लयात लंडनमधील सुमारे ३००० नागरीक मृत्युमुखी पडले व ६००० जखमी झाले.

आता आपण प्रत्यक्ष कवितेकडे वळू
झोपली ग खुळी बाळे,
झोप अंगाईला आली ;
जड झाली शांततेची
पापणी ह्या रीत्या वेळी.
अणुबॉंब करीता मर्ढेकरांनी खुळ्या बाळांची प्रतिमा वापरली आहे. ही बाळे म्हणजे अणुबाँब आहेत हे गृहीत धरले तर या बाळांना खुळी असे का म्हणले आहे हे लक्षात येते. ही बाळे कृत्रीम असल्यामुळे त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या विध्वंसक शक्तीची कल्पना नाही. लहान बाळांना झोपविण्यासाठी अंगाई गीत गाइले जाते. अशा बाळांना झोपवताना प्रत्यक्ष अंगाईलाच झोप आली.  अशा ह्या वेळेला शांततेची पापणी जड झाली म्हणजेच अशांतता निर्माण होण्यासारखी परीस्थीती निर्माण झाली. ही वेळ रीती आहे. अमंगल आहे.
चैत्र बघतो वाकून
 निळ्या नभातून खाली;
 आणि वाऱ्याच्या धमन्या
 धुकल्या ग अंतराळी,
ह्या कडव्यातील चैत्र हा शब्द चैत्र महीना ह्या अर्थाने वापरलेला नाही. चैत्र ही प्रतिमा रॉकेटकरीता वापरली आहे. जर्मनीने व्ही वन रॉकेटला विजयाकडे नेणारे अस्त्र असे म्हणले होते. चैत्र हा महीना विजयाचा महीना आहे.. तसेच चैत्र हे नाव चित्रा ह्या नक्षत्रापासून आले आहे. चित्रा नक्षत्र रात्रीच्या आरंभी क्षितिजावर दिसू लागते. त्यानंतर ते हळू हळू ते माथ्यावर येते. तेथून ते खाली येते. रॉकेटचा आकाशातील प्रवास असाच असतो.   या कडव्यातील चैत्राचे वर्णन व्ही वन रॉकेटला लागू पडणारे आहे.  व्ही वन रॉकेट डागण्याच्या वेळी त्याला बाँबर विमानातून आकाशात नेण्यात येत असे. चैत्र निळ्या नभातून वाकून बघतो आहे ह्या ओळीचा आशय असा आहे. ठराविक उंचीवर आकाशात गेल्यावर, ह्या रॉकेटची इंजीन्स चालू करण्यात येत असत. वाऱ्याच्या धमन्या धुकल्या ग अंतराळी, हे जेट इंजीनचे वर्णन आहे. जेट इंजीनच्या तत्वाप्रमाणे, नळ्यांमधून गरम हवा जोरात बाहेर फेकली जाते व ती हवा रॉकेटला ( किंवा विमानाला) पुढे ढकलते. वाऱ्याच्या धमन्या म्हणजेच जेट इंजीन मध्ये असणाऱ्या गरम हवा जोरात बाहेर फेकणाऱ्या नळ्या. ह्या नळ्यांच्या काही प्रकारांना  इंग्रजी भाषेत  ”Vanes”  असा शब्द आहे. इंग्रजी भाषेतील “Veins” ह्या शब्दाचा अर्थ धमन्या असा आहे. दोन्ही शब्दांचा (vanes -  veins)  उच्चार एकच आहे. धमन्या हा शब्द त्या अनुषंगाने वापरला असावा. धुकल्या चा अर्थ धुर सोडणाऱ्या असा होउ शकतो.
शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणे ;
आधी शब्द येतो मग त्याचा अर्थ समजतो . येथे खुळी बाळे या शब्दांचा सामान्य भाषेत अर्थ काय होतो व त्याचा सांकेतीक अर्थ अणु बाँब हा  किती  उलटा आहे. बाळे ह्या शब्दावरून नवनिर्माण असा आशय ध्वनीत होतो. तर अणु बाँब हा अर्थ संपूर्ण विनाश दर्शविणारा आहे.
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे

अणु बाँबचा युध्दात वापर करण्याआधी त्या स्फोटाचे सर्व स्तरांवरील परीणामांचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञांची समिती अमेरीकेने नेमली होती. त्या समितीने असा अहवाल दिला होता की ह्या स्फोटामुळे फार मोठी मनुष्यहानी होइल. तसेच ह्या  अस्त्राचे गुपित फार  दिवस अमेरीकेकडे राहू शकणार नाही. जगातील इतर राष्ट्रे सुध्दा अणु बाँब तयार करण्यात यशस्वी होतील. आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र स्पर्धेला सुरूवात होइल व जागतीक शांततेला धोका निर्माण होइल. तरी ह्या अस्त्राचा उपयोग युध्दात करू नये. ह्या अणुबाँबचा प्रत्यक्ष उपयोग युध्दात करण्यापेक्षा
एखाद्या निर्जन वाळवंटात स्फोट करून शत्रुराष्ट्रांना व इतर त्याच्या संहारक शक्तीची कल्पना द्यावी. ह्या समितीच्या बैठका अतीशय गुप्तपणे रात्रीच्या वेळी होत. ह्या शास्त्रज्ञांनी अणु बाँबचा वापर थांबविण्या करीता जागतीक शांतता व भविष्यातील आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धेचा मुद्दाही उपस्थित केला होता. उभ्या संसाराचे लेणे ह्या शब्दांचा अर्थ असा असावा.
 लिओ झीराल्ड (Leó Szilárd) हया हंगेरीयन शास्त्रज्ञाने मॅनहटन प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने त्या प्रकल्पातील ७० शास्त्रज्ञांच्या सह्या घेउन अमेरीकचे अध्यक्षांना एक निवेदन (Leó Szilárd Petition) सादर केले होते. त्यात त्याने जपानवर अणु बाँब टाकू नये अशी विनंती केली होती. (ह्या शास्त्रज्ञात ऑपेनहायमर नव्हता. तो अणुबाँब टाकण्यास अनुकूल होता.) पेंगणारा प्रयास म्हणजे ह्या शास्त्रज्ञांनी केलेला अयशस्वी प्रयत्न. ह्या शास्त्रज्ञांनी असा अहवाल देउनसुध्दा, अमेरीकेने जपानमधील हिरोशिमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब टाकलेच. कदाचित या समितीच्या बैठका रात्रीच होत असल्यामुळे पेंगणाऱ्या हा शब्द वापरला असावा.

     चैत्र चालला चाटून
     वेड्या सपाट पृथ्वीला,
      आणि कोठे तरी दूर
      खुजा तारा काळा झाला,

चैत्र सपाट पृथ्वीला चाटून चालला आहे हे  वरीलप्रमाणे व्ही वन रॉकेटचे वर्णन आहे. हे रॉकेट जमिनीपासून ३००० फूटावरून जात असे. लक्ष्याच्या जवळ आल्यानंतर ते जमिनीच्या दिशेने सूर मारल्यासारखे खाली येत असे. ह्या रॉकेटचा प्रवास जमिनीला समांतर असा होत असे म्हणजेच ते सपाट पृथ्वीला चाटून जात असे. ह्यात पृथ्वीला वेडी म्हणले आहे कारण पृथ्वीला हे विध्वंसक रॉकेट तीच्या एवढे जवळून चालले आहे याची काहीच कल्पना नाही. ह्या कडव्यातील खुजा तारा हा शास्त्रज्ञ चंद्रशेखर असावा. त्याचे संशोधन खुज्या ताऱ्यावरचे होते. त्यामुळे खुज्या ताऱ्याची प्रतिमा चंद्रशेखर करीता वापरली असावी. चंद्रशेखर जरी संशोधकांमधील चमकता तारा असला, तरी अखेर तो खुजा होता. कारण त्याला अमेरीकन लष्कराकरीता रॉकेट्स, क्षेपणास्त्रे इत्यादी अतिसंहारक व विध्वंसक  शस्त्रास्त्रांवर गुप्त संशोधनाला मदत करायला तो तयार झाला होता. कोठे तरी दूर या शब्दांचा संदर्भ चंद्रशेखर त्या काळात अमेरीकेत वास्तव्यास होता ह्या घटनेशी आहे. खुजा तारा काळा होतो म्हणजेच त्याचे अवकाशातील खरे अस्तीत्व संपते. त्याचे अवशेषरूपी (Stellar Remnants) अस्तीत्व हे केवळ गृहीतक (Hypothesis) असते. त्याप्रमाणेच चंद्रशेखरचे अस्तीत्व भारतीयांच्या दृष्टीने संपलेले होते.(मर्ढेकरांचा चंद्रशेखर बध्दलचा अंदाज पुढे खरा ठरला कारण चंद्रशेखर १९५३ साली अमेरीकन नागरीक झाला व मरेपर्यंत अमेरीकन नागरीकच राहीला.)

आता भ्यावे कोणीं कोणा
भले होवो होणाऱ्याचे;

एवढी विनाशकारी शस्त्रे हातात असताना कोण कुणाला भिणार आहे. ह्यात ज्याचे भले होण्याची शक्यता आहे त्यांचे भले होइलच. ह्या ओळींचा संदर्भ तत्कालीन अमेरीकन अध्यक्ष हॅरी टऱूमन ह्यांनी जपानवरील आण्विक हल्ल्यानंतर अमेरीकन राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाशी आहे.

तीरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे.

ह्या ओळींचा संदर्भ अमेरीकन अणुबाँबचा जनक शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ऑपेनहायमरच्या उदगारांशी आहे. वेचे हा शब्द वेचा ह्या शब्दाचे अनेकवचन आहे. वेचा म्हणजे एखाद्या पुस्तकातला महत्वाचा परीछ्येद , एखाद्या काव्यातील निवडक कडवे. ह्या संदर्भातील वेचा म्हणजे भगवतगीतेतील श्लोक आहे. हाकारणेचा शब्दशः अर्थ बोलावणे असा आहे.
     अमेरीकेची पहीली अणुचाचणी ऑपेनहायमरच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. प्रत्यक्ष अणुस्फोटाच्या वेळी ऑपेनहायमर हजर होता. स्फोट झाल्यानंतर आजुबाजूच्या आसमंतात जो प्रकाश पडला तो अनेक सूर्य एका वेळेला आकाशात असल्यावर दिसेल एवढा प्रखर होता. त्या वेळी ऑपेनहायमरला गीतेतील अकराव्या अध्यायातील खालील श्लोकांची आठवण झाली.

 दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
  यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥
(अज्ञानरूपी धृतराष्ट्राला संयमरूपी संजय म्हणाला राजन, आकाशात एक सहस्त्र सूर्यांचा एकदम उदय झाल्यावर जो प्रकाश असेल तो विश्वरूप महात्म्याच्या त्या दिव्य प्रकाशाइतका कदाचित असेल. श्रीकृष्ण योगेश्वर होतेच, येथे ते महात्मा देखील आहेत.)

श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥
(हे अर्जुना, लोकांचा संहार करणारा आणि त्यासाठी वृध्दी पावलेला मी काळ आहे. यावेळी येथे .या लोकांचा संहार करण्यासाठी  प्रवृत्त झालो आहे. प्रतिपक्षाच्या सेनेमध्ये असलेले सर्व योध्दे आता तू त्यांना मारले नाहीस तरी जीवंत रहाणार नाहीत. ते सर्व नष्ट होतील. कारण त्यांच्या संहारासाठी मी प्रवृत्त झालो आहे.)
ऑपेनहायमरचे त्यावेळेला जे आठवले ते असे होते जर हजार सूर्यांचा प्रकाश एकाच वेळेस आकाशात पसरला तर सर्वशक्तीमानाच्या दिव्य प्रकाशाइतका असेल. मी आता जगाचा विनाशकर्ता काळ झालो आहे.  (If the radiance of a thousand suns were to burst at once into the sky, that would be like the splendor of the mighty one." and "Now I am become Death, the destroyer of worlds.”) ऑपेनहायमरला असे म्हणायचे होते की नियतीनेच अणुबाँब तयार करण्यासाठी त्याची योजना केली असावी. त्याने तो तयार केला नसता तर दूसऱ्या कोणी केला असता . त्याचे असे म्हणणे होते की आपण केवळ भगवंताच्या हातातील खेळणी आहेत. ऑपेनहायमर त्याच्य़ा कृत्याला, गीतेतील श्लोकाचे उदाहरण देउन, तात्वीक मुलामा देण्याचा प्रयत्न करत होता.
ऑपेनहायमर अणुबाँबचा प्रयोग करण्यास अनुकूल होता कारण जर्मनीत ज्यूंना सातत्याने  मिळणाऱ्या वाइट वागणूकीचा १९३६ पासून  तो साक्षीदार होता. त्याचे आई व वडील ज्यू होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्याच्या मनात  जर्मनीविषयी संताप धुमसत होता. ( a continuing, smoldering fury about the treatment of Jews in Germany) . कवितेतील तीरीमीरीत हा शब्द संतापाच्या भरात या अर्थाने वापरला असावा. हा संताप चिंचोळा अथवा कोता आहे  अशा तीरीमीरीची भावना मनात असताना , ऑपेनहायमर सारख्या माणसाने तत्वज्ञाचा आव आणून, गीतेसारख्या महान ग्रंथातील श्लोकांचे उदाहरण द्यावे हा केवढा विरोधाभास आहे. कवितेतील काय हाकारावे वेचे या ओळीचा अर्थ असा आहे. श्रीकृष्णाने गीता द्वीधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनास युध्दास उद्युक्त करण्यासाठी सांगीतली होती. येथे हा स्वतःच अणुबाँब तयार करून युध्दास तयार झालेला आहे. व त्याच्या ह्या भूमिकेला अध्यात्मीक अधीष्ठान देण्यासाठी गीतेतील श्लोकांची उदाहरणे देत आहे अथवा वेचे हाकारत ”. आहे
चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली;
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली.

या कडव्यातील चैत्र हा शब्द हा वरील कडव्यांप्रमाणे रॉकेटकरीता वापरला आहे. फक्त हे रॉकेट वेगळे आहे. हे एक बॅलिस्टीक मिसाइल आहे. दुसऱ्या महायुध्दात जर्मनीने व्ही टू ह्या क्षेपणास्त्राचा शोध लावला. हे जगातील पहीले बॅलिस्टीक क्षेपणास्त्र होते.  ह्या कडव्यातील चैत्रा चे वर्णन बॅलिस्टीक क्षेपणास्त्राशी  मिळते जुळते आहे. ह्या कडव्याचा अर्थ समजण्याकरीता बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची थोडीफार शास्त्रीय माहीती असणे आवश्यक आहे. बॅलिस्टीक क्षेपणास्त्र हे एका ठरविलेल्या कक्षेतून (Trajectory) प्रवास करते. त्याच्या प्रवासाचे तीन टप्पे असतात. पहील्या टप्प्यात त्याला रॉकेट इंजीनच्या सहाय्याने गती देउन त्याला पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर अवकाशात सोडण्यात येते. त्यानंतर त्याला गती देणारे इंजीन बंद होते. त्यानंतर ते त्याला मिळालेल्या गतीमुळे दुसऱ्या टप्प्यातील प्रवास करते. या प्रवासात ते पृथ्वीच्या वातावरणाचे बाहेर असल्यामुळे त्याला वातावरणाचा विरोध होत नाही. ते गुरूत्वाकर्षणाचे नियमानुसार हा टप्पा पार करते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते पृथ्वीच्या वातावरणात परत प्रवेश करते व त्याच्या लक्ष्यावर जाउन आदळते.
या कडव्यात चैत्र चढे आकाशात या ओळी हे क्षेपणास्त्राच्या पहील्या टप्प्यातील प्रवासाचे वर्णन करतात. नीट नक्षत्र पावली हे त्या क्षेपणास्त्राच्या कक्षेचे अथवा मार्गाचे (Trajectory) चे वर्णन आहे. नक्षत्रांचा प्रवास हा अनंत कालापासून ठरलेल्या मार्गाने होत असतो. त्याप्रमाणेच ह्या क्षेपणास्त्राचा प्रवास आधी ठरविलेल्या कक्षेप्रमाणे होत असतो. ही कक्षा (Trajectory of projectile)   गणिताने आधीच ठरविता येते.. ह्या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घ्यावा म्हणून ही कक्षा नीट ठरविलेली असते व त्याच मार्गाने ते प्रवास करते. निळ्या वायुतून म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरील आवरणातून. वाट विश्ववाली म्हणजे अवकाशातील ( Space ) मधील वाट. हे वर्णन क्षेपणास्त्राच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासाचे आहे.

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती;
चाळणीत चाळणी अन्
विचारात तरी माती.
ह्या कडव्यातील ओळी ऑपेनहायमरला उद्देशून आहेत. त्याला अनेकवेळा नैराश्याचे झटके यायचे. तो नेहमीच मानसीकदृष्टया अस्थिर असायचा. त्याने मानसोपचार तज्ञांकडून उपचारही करून घेतले होते. त्याच्या मित्रांना व सहकाऱ्यांना त्याच्या अशा वागण्याची काळजी वाटायची. त्याच्या  सहकाऱ्यांच्यात दोन मतप्रवाह होते. काहींना तो अती बुध्दीमान व कलाप्रेमी वाटायचा. तर काहींना तो ढोंगी व नाटकी वाटायचा.  त्याचा अनेक विषयांचा अभ्यास होता. गीतेतील तत्वज्ञानाचा त्याचा अभ्यास होता.  त्याच्याक़डे असाधारण विद्वत्ता होती. त्याचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क मधील प्रसिध्द  एथिकल कल्चर फिल्डस्टोन स्कूल या शाळेत झाले.  ह्या शाळेच्या संस्थापकाच्या मते ह्या शाळेचे धेय्य़ असे होते की , विद्यार्थ्यांचा अशा रीतीने विकास करणे की ते आजूबाजूच्या समाजात  उच्च  नैतिक बदल घडवून आणण्यास सक्षम बनतील . त्याला मानव्यशास्त्र , मानसशास्त्र , तत्वज्ञान, विज्ञान इत्यादी विषयात गती होती. त्याला ग्रीक वास्तुकला, वाग्मय , कला इत्यादी विषयात रस होता. त्याने १९३३ साली संस्कृतचा अभ्यास केला. त्यानंतर तो गीता संस्कृतमधून शिकला. त्याच्या आयुष्यावर गीतेतील तत्वज्ञानाचा खोल परीणाम झाल्याचे , त्याने एका व्याख्यानात सांगीतले होते. त्याचे राजकीय विचार साम्यवादाकडे झुकलेले होते. १९३० साली त्या काळातील अनेक बुध्दीवाद्या प्रमाणे तो सामाजिक सुधारणांचा पुरस्कर्ता झाला. चाळणीत चाळणी म्हणजे त्याच्या वैचारीक जडणघडणीवर परीणाम करू शकणारी तत्वज्ञाने, राजकीय विचार वगैरे. एवढे असूनसुध्दा त्याच्या विचारात माती होती कारण अणुबाँबने होणारी अपरीमीत मनुष्यहानी व इतर हानीची पूर्ण कल्पना असूनसुध्दा तो जपानवर अणुबाँब टाकावा ह्या मताचा होता. 

 चैत्रबापा, उद्या या हो
 घेउनीया वैशाखाला;

या क़डव्यातील चैत्राचा अर्थ वेगळा आहे. १२६० ते १३०९ या यादवकाळातील हेमाद्री (हेमाडपंत) या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात चैत्र महीन्याच्या महात्म्याचे  वर्णन केले आहे या संस्कृत ग्रंथाप्रमाणे ब्रह्मदेवाने चैत्र महीन्याच्या पहिल्या दिवशी विश्वाची निर्मिती केली. (असा उल्लेख ब्रह्मपुराणात सुध्दा आहे.) त्यानंतर त्याने ग्रह, तारे, विविध ऋतु, पाउस यांचा विश्वात समावेश केला.
 
चैत्रमासी जगदब्रम्हा ससर्जु प्रथमेहानी
शुक्लपक्ष समग्रंथु थदा सुर्योदये सथी
प्रवर्थयः मासा तथा कालस्य गणनामपी
ग्रहांनांगा नरुथुनमा सासवथसरा न वथसराधीपान

 चैत्रबाप म्हणजे विश्वाचा निर्माता. त्याला  उद्याचा दिवशी वैशाखाला घेउन येण्याची कवीने विनंती केली आहे. म्हणजेच जागतीक शस्त्रस्पर्धेमुळे  ह्या विश्वाचा होउ घातलेला विनाश टाळण्यास सांगीतले आहे. जर विश्वाचाच सर्वनाश झाला तर  वैशाख म्हणजेच चैत्राच्या पुढील महीना येणारच नाही.

-- आंबोणीच्या मागे कां ग
           तुझा माझा चंद्र गेला ? –

आपल्या नेहमीच्या कवितेत चंद्र हा लिंबोणीच्या झाडामागे जात असतो. हा कोणता चंद्र आहे की जो लिंबोणीच्या मागे न जाता आंबोणीच्या मागे गेला आहे. हा चंद्र तुझा माझा का आहे ?  हा चंद्र म्हणजे शास्त्रज्ञ चंद्रशेखर आहे. तो त्याच्या मित्रपरीवारात व शास्त्रीय जगतात चंद्रा या नावाने ओळखला जायचा. तो भारतीय असल्या मुळे तो तुझा माझा होता.  ही आंबोण म्हणचे काय आहे? आंबोण म्हणजे म्हशीचे खाद्य असते. हे खाल्ल्यावर म्हैस जास्त दूध देते. ह्या कवितेतील आंबोण म्हणजे चंद्रशेखरला अमेरीकेच्या सरकारने दाखवलेली आमिषे आहेत. कोणत्याही म्हशीला तिचा मालक  आंबोण केवळ तिने दूध जास्त द्यावे म्हणून घालत असतो. त्याच्या दृष्टीने म्हैस हे केवळ एक दूभते जनावर असते. चंद्रशेखरला अमेरीकेने आमिषे दाखविण्याचे कारण म्हणजे अमेरीकेला त्याच्या संशोधनापासून होणारा  फायदा.

  आंबोणीच्या मागे पण
  अवेळी का चंद्र गेला ?


दुसऱे महायुध्द चालू असताना चंद्रशेखरला अमेरीकेतील मॅरीलँड येथील  बॅलिस्टीक संशोधन प्रयोगशाळेत संशोधनाकरीता आमंत्रीत करण्यात आले. ह्या प्रयोगशाळेत अमेरीकन लष्कराकरीता रॉकेट्स, क्षेपणास्त्रे इत्यादी अतिसंहारक व विध्वंसक  शस्त्रास्त्रांवर गुप्त संशोधन चालत असे. ह्या कडव्यातील अवेळी ह्या शब्दाचा अर्थ अयोग्य किंवा भलत्या  वेळी असा आहे. ह्याचा दुसरा संदर्भ, त्यावेळी दृष्टीपथात आलेल्या भारताच्या स्वातंत्र्याशी आहे. स्वतंत्र भारताला चंद्रशेखर सारख्या बुध्दीमान शास्त्रज्ञाची गरज असताना तो अवेळी अमेरीकेत गेला याची मर्ढेकरांना खंत आहे. तेव्हा पासून चालू असलेला हा ब्रेन ड्रेन आजही चालूच आहे.

चंद्रशेखरला १९३० साली मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेज मधून पदवी मिळाल्या नंतर, इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. १९३३ साली त्याला केंब्रिज विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी मिळाली. १९३३ ते १९३७ या काळात केंब्रिज मधील प्रसिध्द ट्रीनीटी कॉलेज मध्ये प्राइझ फेलोशिप मिळाली. म्हणजेच १९३० ते १९३७ ह्या काळात चंद्रशेखर केंब्रीजला होता. मर्ढेकर १९२९ ते १९३३ ह्या काळात लंडनला होते. त्या काळातील ब्रिटनमधील हुशार भारतीय विद्यार्थी म्हणून मर्ढेकरांना चंद्रशेखर तेव्हापासूनच माहीती असणार. कवितेत तुझा माझा चंद्र असे म्हटले आहे. ह्यातील माझा हा शब्द विचारात घेतला तर मर्ढेकर व चंद्रशेखर ह्याचा काही वैयक्तीक परीचय होता का असा प्रश्न पडतो.

ह्या कवितेबध्दल मर्ढेकराची एक आठवण सांगीतली जाते. एकदा श्री. पु भागवतांनी मर्ढेकरांना गप्पांच्या ओघात ही कविता त्यांना नीटशी कळली नाही, तरी  ती कशाबध्दल आहे अशी विचारणा केली. मर्ढेकरांनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, “Then the poem does not exist for you at all”  मर्ढेकरांनी त्यांच्या कवितांचा अर्थ स्वतः कधीही सांगीतला नाही. ( त्यांच्यावर कवितांसंबंधी झालेल्या खटल्यांचा अपवाद सोडून)

ह्या कवितेतील मर्ढेकरांच्या प्रतिभेचा अनोखा अविष्कार बघून त्यांच्या  इरेस पडेन तर बच्चंमजीह्या कविते ची आठवण येते. त्यांच्या कवितेतील खालील ओळ म्हणावीशी वाटते.
                              “ म्हणाल म्हण़जे  मर्ढेकरच्या
                     अता खरी जय ह्या  कवितेकी !”

मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

        झोपली ग खुळी बाळे,
        झोप अंगाईला आली ;
         जड झाली शांततेची
         पापणी ह्या रीत्या वेळी.

            चैत्र बघतो वाकून
                निळ्या नभातून खाली;
                आणि वाऱ्याच्या धमन्या
           धुकल्या ग अंतराळी,

    शब्द अर्थाआधी यावा
    हे तो ईश्वराचे देणे ;
    पेंगणाऱ्या प्रयासाला
    उभ्या संसाराचे लेणे.

     चैत्र चालला चाटून
     वेड्या सपाट पृथ्वीला,
      आणि कोठे तरी दूर
      खुजा तारा काळा झाला,

आता भ्यावे कोणीं कोणा !
भले होवो होणाऱ्याचे;
तीरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे.

   चैत्र चढे आकाशात
   नी़ट नक्षत्र पावली;
   आणि निळ्या वायूतून
   वाट कापी विश्ववाली.

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती;
चाळणीत चाळणी अन्
विचारात तरी माती.
        चैत्रबापा, उद्या या हो
         घेउनीया वैशाखाला;
         -- आंबोणीच्या मागे कां ग
           तुझा माझा चंद्र गेला ? –

  आंबोणीच्या मागे पण
  अवेळी का चंद्र गेला ?

बा. सी. मर्ढेकर

    ही कविता मर्ढेकरांच्या दूर्बोध कवितांपैकी एक मानली जाते.  पहील्या दोन ओळी वरून असा समज होतो की ह्या ओळी अंगाई गीत ऐकून झोपी जाणाऱ्या  कुणा बाळांच्या संदर्भात आहेत. ही अशी कोण बाळे आहेत की जी झोपल्यावर प्रत्यक्ष अंगाईलाच झोप आली आणि शांततेचीच पापणी जड झाली. अशी ही बाळे खुळी का आहेत ?
      ह्या कवितेतील  चैत्राची प्रतिमा कशाकरीता वापरली आहे ? 
     तसेच कवितेत उल्लेख केलेले वे़डे विद्रे मन कोणाचे आहे ?  हे वेचे काय आहेत आणि ते कोण हाकारत आहे व ही चिंचोळी तीरीमीरी कोणाची आहे ?
     ह्या कवितेतील प्रतिमांचा व संदर्भांचा शोध घेताना मी एका वेगळ्याच अर्थापाशी पोहोचलो.

     एक सामान्य वाचक  म्हणून , ह्या कवितेचा मला समजलेला अर्थ काय आहे हे पुढील लेखात  देणार  आहे. माझा अर्थ बरोबरच असेल असा माझा दावा नाही. व इतरांनी तो मानावा असा माझा आग्रह नाही. अखेर कवितेचा अर्थ हा एखाद्या कॅलिडोस्कोपमधून (शोभादर्शक यंत्र) दिसणाऱ्या दृष्याप्रमाणे असतो. कॅलिडोस्कोप फिरवावा तशी त्यातील दृष्ये वेगळी दिसतात. प्रत्येकाचा कॅलिडोस्कोप वेगळा असतो.
      मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट   (बॅलिस्टीक मिसाइल)  आहेत. भारतीय , अमेरीकन  शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे.  जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
      ह्या कवितेवरील विस्तृत लेख दि. ४ एप्रिल २०११ ला ह्या ब्लॉगवर प्रसिघ्द करण्यात येईल.
    

Friday, April 1, 2011

पिंपात मेले उंदिर कवितेवरील लेखाबध्दल काही स्पष्टीकरणे

ह्या लेखावरील काही संकेतस्थळांवरील चर्चेवरुन असे लक्षात आले की लेखामधील संदर्भांबध्दल अधिक स्पष्टीकरणांची आवश्यकता आहे.  खालील स्पष्टीकरणांमुळे लेखातील तृटी दूर होतील अशी आशा आहे.

१. भाउ पाध्ये बऱ्याच वाचकांना भाऊ पाध्ये कोण हे माहीती नसावे. भाऊ पाध्ये हे पूर्वी गाजलेल्या वासू नाका ह्या कादंबरीचे लेखक होते.  ह्या कादंबरीवर आचार्य अत्र्यांनी अश्लीलते च्या व इतर मुद्यावरुन घणाघाती टीका केली होती. त्यांनी भाऊ पाध्यांना मराठी साहीत्यातील मवाली असे म्हणले होते.. भाउ पाध्ये हे  लेखक व पत्रकार होते. त्यांनी कामगार चळवळीतही भाग घेतला होता.  त्यांच्याविषयीच्या संकेत स्थळावर त्यांच्याविषयीची माहीती उपलब्ध आहे. ( ह्या संकेतस्थळाची माहीती प्रतीसादातून दिल्या बध्दल श्री अवधूत यांचे आभार) . दिलीप चित्रे, अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे ह्यानी भाउ पाध्यांवर लिहीलेला मजकूर ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणखी एक लक्षात घेण्या सारखी बाब म्हणजे भाउ पाध्यांच्या पत्नी, पूर्वाश्रमीच्या  शोशन्ना माजगावकर ह्या जन्माने  बेने ईद्रायली ज्यू होत्या व कामगार चळवळीतील कार्यकर्त्या होत्या.
भाउ पाध्यांच्या विषयीचे संकेतस्थळ http://bhaupadhye.blogspot.com

२. ईर्मा ग्रीस ह्या स्त्री नाझी एस् एस् गार्ड बध्दल अधिक माहीती ही दुसऱया महायुध्द काळातील सर्वात कुप्रसिध्द जर्मन स्त्री होती. ती त्या काळात  सुंदर पशु (Beautiful Beast )  व ऑस्चविझ छळछावणीतील पशु (Beast of Aushchwitz)  ह्या नावाने ओळखली जायची. ती न्युरेंबर्ग खटल्यातील
फासावर जाणाऱ्या  युध्दगुन्हेगारांपैकी फासावर जाणारी सर्वात तरूण युध्दगुन्हेगार होती. तसेच ब्रिटीश कायद्या नुसार फाशी गेलेली सर्वात तरूण स्त्री होती.  तीच्यावर अनेक पुस्तके लिहीली गेली.


विकीपीडीयावरील तीच्याविषयीची माहीती.

एका ब्रिटीश संकेतस्थळावरील माहीती

मिरर ह्या लंडनमधून प्रसिध्द होणाऱया दैनिकातील दिनाक २१ नोव्हेंबर २००५ च्या अंकात तीच्याविषयी प्रसिध्द झालेला लेख

ऑस्चविझ छळछावणी स्मारकाच्या संकेतस्थळावरील तीच्याविषयीची  माहीती



खालील संकेतस्थळावर तीच्यावरील खटल्यावर लिहीलेल्या एंजल ह्या  नाटकाविषयी माहीती आहे.


खालील संकेतस्थळावर तीच्या विषयी आजही चर्चा चालू आहे.


३. बेकलाइट हे एकप्रकारचे प्लॅस्टीक आहे. बकेलाइटचे दागीने १९३० ते १९६० सालापर्यंत युरोपात चलीत होते. ते भारतात प्रचलीत असल्याचे ऐकीवात नाही. मर्ढेकर १९२९ ते १९३३ पर्यंत लंडनमध्ये शिकायला होते. त्याच काळात ते दागिने तेथे प्रचलीत होते. त्यामुळे ह्या दागिन्यांची त्यांना माहीती असेल. बेकलाइटी ह्या विशेषणाचा संदर्भ असा असावा.

४. ज्यूंचा वंशसहार ( Holocaust)  -  दुसऱया महायुध्दाच्या काळात सुमारे साठ लाख ज्यूंना मारणयात आले. त्याचा कोणताही अपराध नसताना केवळ ज्यू म्हणून त्यांना यमसदनास पाठविण्यात आले. हा गेल्या शतकातील सर्वात मोठा वंशसंहार होता. हा संहार हिटलरच्या ज्यू वंश द्वेषामुळे व जर्मन वंशश्रेष्टत्वाच्या अहंकारापोटी घडवून आणला गेला. हिटलरच्या फायनल सोल्युशन ह्या योजनेनुसार हिटलरला ज्यू वंशाचा पूर्णपणे निप्पात करायचा होता. हा मानवी इतिहासातील अतिशय घृणास्पद घटनाक्रम आहे. असाही एक प्रवाद आहे की चर्चिल वगैरे दोस्त राष्ट्रांच्या युध्दनेत्यांना हिटलरच्या छळछावण्यात काय चालले आहे याची कल्पना होती. त्यांना हा संहार थाबविणेही शक्य होते. परंतु काही राजकीय डावपेच म्हणून ह्या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले.  हा विषयावर अनेक पुस्तके उपलब्घ आहेत. तसेच याची माहीती अनेक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यापैकी काही संकेतस्थळे खाली दिलेली आहेत.